रंजक-रोचक माहिती

दक्षिण भारतात देखील बोलली जाते मराठी. ‘दक्षिणी मराठी’ मागील मराठा साम्राजाचा गौरवशाली इतिहास

पुढे मुघल आणि ब्रिटिशांचे झालेले आक्रमण यामुळे भाषेची लिपी बदलली तरीही प्रामुख्याने भारतीय भाषांचा पाया हा बऱ्यापैकी देवनागरी लिपीतच आढळतो. हिंदी जरी आपली राष्ट्रभाषा असली तरीही सर्व राज्य भाषा या-ना-त्या प्रकारे हिंदीसोबत जोडल्या गेल्या आहेत, तरीही दक्षिणी भाषा जसं की तामिळ, तेलगू, मल्याळम यांची लिपी देवनागरीपेक्षा वेगळी मात्र परस्परांशी संबंधित आढळते. आज आपण या विविध भाषांबद्दल नाही, तर केवळ आपल्या मराठी भाषेबद्दल बोलणार आहोत.

जर का आम्ही तुम्हाला विचारलं मराठी भाषा कोणत्या राज्यात बोलली जाते? तर तुम्ही साहजिकपणे महाराष्ट्र असंच म्हणाल. बरोबर? किंवा अधिकाधिक त्यात शेजारील राज्य गोव्याचं नाव जोडलं जाईल. पण जर का आम्ही म्हणालो की महाराष्ट्र आणि गोव्याव्यतिरिक्त मराठी भाषा आणखी एका राज्यात देखील बोलली जाते तर? आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे राज्य भारताच्या दक्षिणी भागात वसलेलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्याने विस्तार करायला सुरुवात केली होती, पुढे छत्रपती संभाजीराजे, ताराराणी आणि पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठी साम्राज्य बहरलं, खुललं आणि वाढलं. इतिहासकार असंही सांगतात की नानासाहेब पेशवे राज्य सांभाळत असताना रघुनाथराव पेशव्यांनी थेट अटकेपार मराठी पताका फडकावली होती.

तंजावर मराठा पॅलेस

मराठी भाषा दक्षिणेत कशी?

दक्षिणेतील प्रसिद्ध राज्य म्हणजेच तामिळनाडूमध्ये तंजावर नावाच्या शहरात आजही लोकं मराठी बोलताना आढळतात. तुम्ही जर का या भाषिकांशी संवाद साधला तर लक्ष्यात येईल की या तंजावरच्या मराठी भाषेचे उच्चार हे तामिळ भाषेशी जुळणारे आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालाच असेल की दक्षिण भागात मराठीचा उगम झाला तरी कुठून? तर इ.स. १६४० च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे महाराष्ट्रातून कर्नाटकातील बेंगळुरू येथे स्थायिक झाले. ते इ.स. १६६४ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिले. त्यांच्या आगमनामुळे तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील कन्नड आणि तमिळ भाषिक प्रदेशात मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार होऊ लागला. अनेक मराठी घराणी कर्नाटकात स्थायिक झाली आणि तेथील समाजात मिसळली. त्यामुळे या प्रदेशात मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू म्हणजेच व्यंकोजी राजे भोसले यांनी दक्षिणेत मराठी राज्याचा विस्तार केला. कर्नाटक राज्यापासून सुरु झालेली ही मोहीम दक्षिणेत चांगलीच रंगली. वर्ष १६७४ मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावरचा राजा अळगिरी नायक याचा पराभव करून दक्षिणेत मराठी राज्याचा झेंडा रोवला.

तामिळनाडूमध्ये व्यंकोजी राजांचं राज्य सुरु झाल्यानंतर मराठी लोकांना महाराष्ट्राच्या भूमीमधून दक्षिणेत आणून वसवण्यात आलं, यामागचा केवळ उद्देश मराठीचा विस्तार असाच होता. व्यंकोजीराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे यांनी तब्बल अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला आणि दक्षिणेत दबदबा निर्माण केला. असं म्हणतात दक्षिणेत मराठ्यांनी वर्ष १८५५ पर्यंत राज्य केलं आणि या संपूर्ण कार्यकाळात दक्षिण भारतात १२ विविध राजांनी कारभाराची धुरा सांभाळली होती. इतिहासातून मिळालेली माहिती असेही दर्शवते की या कैक दशकांच्या कालावधीत इथं अठरा पगड जातींमधली पाच लाख कुटुंबं वसवण्यात आली होती, या कुटुंबांच्या मराठी भाषेवर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि दक्षिणी बोलीभाषेचा प्रभाव पडल्याने तंजावर मराठी भाषा उदयास आली.

काही वर्षानंतर या कुटुंबांनी शिक्षण, काम आणि व्यवसायानिमित्त आजूबाजूच्या ठिकाणी ये जा सुरु केली आणि इतर भाषांचा देखील तंजावरच्या मराठीवर प्रभाव दिसून येऊ लागला. दक्षिणेतील मराठी राज्य जरी वर्ष १८५५ मध्ये संपलं असलं तरी आजही येथे मराठी संस्कृती जपली आणि जगली जाते. महाराष्ट्रातील खास सण जसे की गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, संक्रांत असे विविध सण-उत्सव आजच्या घडीला देखील तंजावरमध्ये साजरे केलेले दिसतात. कदाचित हे वाचून तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल, पण तंजावरच्या या भागात स्थानिकांकडून अंबाबाईचा गोंधळ घातला जातो. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की तंजावरच्या या भागात आजही मराठी भाषाच नाही, तर मराठी संस्कृती आणि मराठीचा संपन्न वारसा देखील जपला जातोय.

दक्षिण भारतात पसरलेल्या मराठी भाषिकांनी आपल्या बोलीचे वेगळेपण आणि समृद्धी जपण्यासाठी आणि महाराष्ट्रासह इतरत्र राहणाऱ्या मराठी भाषिकांमध्ये त्याची ओळख करून देण्यासाठी दक्षिणी मराठी नावाचे नवीन YouTube चॅनेल सुरू केले आहे. हे चॅनेल दक्षिणी मराठी बोलीचे वैशिष्ट्ये, त्यातील शब्दसंग्रह, व्याकरण आणि संस्कृती यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी समर्पित आहे.

असं म्हणतात आपल्याकडे अवघ्या काही किलोमीटर्सवर भाषा बदलत जाते आणि म्हणूनच उत्तर, दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या मराठी भाषेत बऱ्यापैकी तफावत दिसून येते. इथे बोलले जाणारे शब्द आणि आणि त्यांचे उच्चर यांमध्ये विविधता आढळते. महाराष्ट्रात बोलली जाणारी मराठी आणि कोकणपट्टी तसेच गोव्यात बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेवर कोकणी आणि मालवणी भाषेचा प्रभाव दिसून येतो. ही विविधता आपली ओळख आहे, मात्र तरीही आपण बोलत असलेलीच भाषा शुद्ध हे इतरांच्या मनावर बिंबवणायचा आपला प्रयत्न काही सुटत नाहीये.

कळत-नकळतपणे आपण गावातील मराठी भाषिकांना अशुद्ध उच्चार करणारी लोकं म्हणून हिणवतो, त्यांची भाषा सुधारण्याचा प्रयत्न करतो. पुस्तकी भाषा आणि बोलीभाषा यांमधील फरकच आपल्याला समजून घ्यायचा नाही, कार्यालयीन किंवा पुस्तकी भाषा ही बऱ्यापैकी व्याकरणावर अवलंबून असते, मात्र बोलीभाषेला खरोखर अशी बंधनं असतात का? कदाचित ती भाषा ज्या चौकटीत जन्माला येते आणि वावरते त्याच वातावरणाचे संस्कार झाल्यामुळे शब्दोच्चार बदलत असावेत. आपल्या घराघरांमध्ये बोलली जाणारी ही आपली बोलीभाषा आहे आणि त्याला व्याकरणाचं बंधन लावलं जाऊ शकत नाही म्हणूनच आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांना ही जाणीव असली पाहिजे की कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. भाषेचा गोडवा हा ती भाषा जपण्यात आणि जगण्यात आहे. महाराष्ट्र राज्यापासून कैक दूर असलेल्या तंजावरकडून हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे. तंजावरमध्ये मराठी साम्राज्य नसताना आजही जपला जाणारा हाच भाषेचा गोडवा मराठी माणसाचे मराठी भाषेप्रती प्रेम म्हणावे लागेल.

तंजावरची विशेषता

तंजावरच्या मध्यभागी शिवगंगा दुर्ग पाहायला मिळतो आणि त्याच्या मध्यभागी चोल राज्यकर्त्यांनी बांधलेलं बृहदेश्वर मंदिर स्थित आहे. इतिहासकार असेही सांगतात की या बृहदेश्वर मंदिराच्या उभारणीत मराठ्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. कदाचित म्हणूनच आवारात असलेल्या गणपती मंदिरामध्ये शहाजीराजे, शिवाजीराजे, व्यंकोजीराजे आणि इतर मराठी शूर राजांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आणि तारखा यांचा ठासून उल्लेख करणारा शिलालेख आढळतो.

आणखी वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button