लेखमालिकाव्यवसायाच्या वाटेवर चालताना

व्यवसायाच्या वाटेवर चालताना – सुरुवात करण्यापूर्वी काय?

असे प्रश्न दररोज विचारले जातात. ह्या प्रश्नाचे सहज सोपे उत्तर असते, पण विचार करण्याची कला अवगत नसल्याने किंवा तिची ओळख नसल्याने हे प्रश्न अवघड वाटतात. शिवाय ह्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यावर निराशा येते. काय करावे ते सुचत नाही, कुणाकडे उत्तर मागावे ते कळत नाही. आता ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची कला आपण जाणून घेऊ या.

प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व वरील सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद याद्वारे झालेली असते. त्यामुळे प्रत्येकाचे एक वेगळे व्यक्तिमत्व, एक वेगळी विचारसरणी तयार झालेली असते. अशा वेळी कोणत्या व्यक्तीने कोणता व्यवसाय करावा हे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलत जाणारे समीकरण आहे. आता सगळ्यांना समर्पक असे एक उत्तर शोधण्याची प्रक्रिया चालू होते.

पहिल्यांदा एक गोष्ट मनावर कोरुन ठेवली पाहिजे की, प्रत्येक प्रकारचा व्यवसाय हा अतिशय उत्कृष्ट पध्दतीने करता येतो. त्यातून हवा तेवढा नफा मिळवता येतो. त्याचा ब्रँडही बनवता येतो. वडापावचे दुकान (मॅकडोनाल्ड, जंबोकिंग), चहाकॉफीचा ठेला (कॅफे कॉफी डे, बरिस्ता, स्टारबक्स), शिकवण्या घेणे (बायजूज, स्टडी सर्कल, चाटे कोचिंग) अशी काही उदाहरणे देता येतील. अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही, तर आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रापुरता व्यवसाय वाढवता येतो. ‘व्यवसाय कोणता करावा?’ हे अनुभव, आवडी, तुमची जोखीम घेण्याची क्षमता यावरुन ठरवावे लागेल. एखाद्याला शेत कसले असते हे माहित नसताना जाऊन नांगरणीपासून ते माल बाजारात विकेपर्यंतची प्रक्रिया समजून घेण्यात व अंमलात आणण्यात किती वेळ लागेल हे तुमच्या लक्षात येईल. त्याऐवजी ज्याचे बालपण शेतीत गेले आहे, ज्याने ह्या सर्व प्रक्रिया बघितल्या आहेत, त्याला थोडासा वेगळा विचार करुन, आधुनिक पध्दती वापरुन शेती करणे व मोठ्या प्रमाणात नफा मिळवणे सोपे आहे. शेकडो तरुण शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहिल्यावर हे सहज समजून येते.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रज्वलित मने या पुस्तकातील एक उतारा – “आपण कसे आहोत याचा विचार माणूस करतो आणि नेमका तसाच घडतो. मी काहीही करु शकत नाही असा विचार केला, तर माझी काही करायची कार्यक्षमताच लोप पावते. तेच जर मी काहीही करु शकतो असा विचार मी मनाशी केला, तर माझी सुरवातीला ते करायची कार्यक्षमता नसली तरी ते मी करु शकतो.”

  • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button