इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत
महाराष्ट्राच्या मातीने अनेक रत्नं घडवली, अनेकांनी स्व-कर्तृत्त्वावर नावलौकिक मिळवला. अनेक दिग्गजांनी स्वतःसोबतच महाराष्ट्राचं, भारताचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं. आज आपण अश्याच एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी महाराष्ट्राचा डंका भारताबरोबरच आख्ख्या जगात वाजवला, ज्यांनी खवय्यांना स्वर्गीय चवीची अनुभूती दिली, शेकडो हॉटेल्सची उभारणी करणारे आघाडीचे ते मराठी उद्योजक म्हणजे विठ्ठल कामत.
विठ्ठल कामत यांचे वडील व्यंकटेश कामत सुरुवातीला डिश वॉशर म्हणून काम करायचे. हे काम करत असताना सतत त्यांना वाटायचं की, आपलं स्वतःचं एक हॉटेल असावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली, रात्रंदिवस काम केले आणि अखेरीस 1952 मध्ये त्यांनी सत्कार हे पहिले हॉटेल उभे केले. हे हॉटेल उभे करण्यासाठी व्यंकटेश कामत यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले आणि व्यवसायाची उभारणी केली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. धंद्यात यश येऊ लागलं. सगळं काही आनंदात चालू होत. या अश्या आनंदाच्या वातावरणातच 1956 साली विठ्ठल कामत यांचा जन्म झाला. लहानपणापासून विठ्ठल कामत अभ्यासात हुशार होते, नवीन गोष्टी करण्यात त्यांना रस होता. अभ्यासात हुशार असणाऱ्या विठ्ठल यांनी 1973 साली मुंबईच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
विठ्ठल यांच्या आईला नेहमी वाटायचं की, त्यांनी वडिलांना हॉटेलमध्येच मदत करावी, मात्र त्यांना इंजीनियर व्हायचं होतं. त्यांनी इंजीनियरिंगची पदवी मिळवली. इकडे वडिलांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच होता. वडिलांनी दोन चांगली हॉटेल उभी केली होती. मात्र अपयशाशिवाय यश मोठं वाटत नाही म्हणतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश, संकटं ही येतच असतात, जवळच्याच एका व्यक्तीने फसवणूक करून विठ्ठल यांच्या वडिलांचे हॉटेल हिसकावले. त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अश्यावेळी त्यांच्याकडे असलेले दुसरे म्हणजेच सत्कार हॉटेलही असेच लुबाडले जाईल, या भीतीने विठ्ठल यांनी वडीलांसोबत काम करायचे ठरवले. त्यांचा हा निर्णय त्याच्या आई-वडिलांना देखील खूप आवडला. हेच होते विठ्ठल यांचे हॉटेल व्यवसायातले पहिले पाऊल. व्यवसाय कसा वाढेल यासाठी विठ्ठल काम करू लागले. त्यांनी मुंबईत ‘विठ्ठल कामत’ या नावाने अनेक हॉटेल्सची साखळीच उभी केली.
एका मुलाखतीत ते सांगतात, त्यांच्या मित्राचा गुजरातमधील हॉटेल व्यवसाय तोट्यात जात होता, काही दिवसात ते हॉटेल बंद करायची पाळी येणार होती, अशाकाळात ते त्याच्या हॉटेलच्या व्यवस्थापनासाठी गुजरातला गेले, ते हॉटेल इतकं मोक्याच्या जागेवर होतं, की हॉटेल कसं काय चालत नाही हा एक प्रश्नच होता, हॉटेल हायवेला होते. गडबड होती होती ती मार्केटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये. त्यांनी गेल्या गेल्या, हॉटेलसमोर अनेक गाड्या लावल्या, ज्यावरून असं वाटेल की, ‘बाप रे! या हॉटेलमध्ये किती गर्दी आहे.’ त्याबरोबरच त्यांनी हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरच्या गाड्या स्वच्छ करण्यासाठी काही लोक ठेवले. म्हणजे गाडी स्वच्छ होईपर्यंत ड्रायवर हॉटेलमध्ये काहीतरी खात बसेल. अश्या पद्धतीने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या आयडीयांनी त्यांनी मित्राच्या हॉटेलची गाडी पुन्हा रुळावर आणली.
त्यानंतर ते मुंबईत आले, जेव्हा त्यांचे ‘सत्कार’ रेस्टॉरंट चांगले चालू लागले, तेव्हा विठ्ठल यांनी वडिलांना व्यवसाय वाढवण्याचा आपला विचार सांगितला. वडिलांनीही होकार दिला. त्यांनी हॉटेल व्यवसायाबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून प्रति आठवडा 75 पौंडची नोकरी पत्करली. अनेक देशांचा प्रवास केला आणि हॉटेल व्यवसायातील बारकावे शिकून घेतले.
लंडनमध्ये आलेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी धंद्यात नावीन्य आणले. एके दिवशी त्यांना कळले की, सांताक्रूझ विमानतळाजवळील फोर स्टार हॉटेल ‘प्लाझ्मा’ विकले जात आहे. त्यांनी ते विकत घ्यायचे ठरवले, पण त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मात्र त्यांनी हिंमत हारली नाही. बँकेतून कर्ज काढून कशीबशी त्यांनी पैश्यांची जुळवणी केली आणि ‘प्लाझ्मा’ विकत घेतले.
आणि त्याच ठिकाणी 1997 साली त्यांनी भारतातील पहिले इको-टेल फाइव्ह स्टार हॉटेल ‘ऑर्किड’ उभे केले. जे की, REDUCE – REUSE – RECYCLE या तत्वावर उभे आहे. हे हॉटेल एक इको-फ्रेंडली हॉटेल आहे. इथे कोणत्याही प्रकारचा कचरा तुम्हाला अजिबात पाहायला मिळणार नाही आणि विशेष म्हणजे हे हॉटेल जगातील Highest Award winning हॉटेल आहे. या हॉटेलला आतापर्यंत ३७५ पेक्षाही जास्त पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांनी इतकं अफाट यश मिळवलं खरं पण ‘ऑर्किड’ च्या उभारणीवेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा देखील बलाढ्य डोंगर उभा राहिला. या कर्जाच्या ओझ्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली होती. तब्बल 282 कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाढलं होतं. आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या ते खचले होते, आता पुढे काय होईल? पैश्यांची जोडणी कशी करता येईल? या विचाराने ते बैचेन झाले होते आणि अशातच त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार डोकावू लागले, मात्र एका दृश्यामुळे त्यांना संकटांना हरवण्याची प्रेरणा मिळाली. एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावर एक पेंटर काहीही सुरक्षाकवच नसताना भिंत रंगवत होता आणि भिंत रंगवून झाल्यावर तो सुरक्षित खाली देखील उतरला, “जर तो पेंटर जीवघेणी जोखीम घेऊ शकतो तर मग मी नक्कीच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.” या विचाराने त्यांनी परिस्थितीशी दोन हात केले आणि शेवटी संकटांना हरवून दाखवले.
ही झाली विठ्ठल कामत यांची व्यावसायिक बाजू. पण विठ्ठल कामत हे एक बहुरंगी, बहुढंगी, बहूआयामी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे पर्यावरणावर देखील खूप प्रेम. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसेच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्याचा मानस आहे. यासाठी ‘पाथरे गाव’ सारख्या डोंगराळ भागात त्यांनी औषधी वनस्पतींची लागवड केली. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवण्यास सहाय्य केले. ६० लाखांहून अधिक झाडे लावली. १०० पेक्षा जास्त टेकड्यांचे त्यांनी औषधी आणि स्थानिक झाडांमध्ये रुपांतर केले. पक्षीशास्त्रज्ञाच्या पेशाने त्यांनी ‘ऑर्किड’ हॉटेल जवळ पोपट गल्ली देखील तयार केली. तिथे नानाविविध प्रकारचे पोपट, इतर काही पक्षी पाहायला मिळतात, त्याबरोबर ओडिसा येथील “चिल्का सरोवर” येथे डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर”ची स्थापना केली. ऑर्किड हॉटेल, मुंबई आणि किल्ले जाधवगड येथे आई या नावाचे संग्रहालय देखील त्यांनी उभे केले. तिथे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ठेवून पर्यावरणाला पूरक असा उपक्रम कामतांनी यशस्वी करून दाखवला.
विठ्ठल कामत यांचा हॉटेल व्यवसाय आज संपूर्ण जगभर पसरला आहे. त्यांना आजवर ११० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. यामध्ये इंडियन एक्सप्रेसचा सर्वोत्कृष्ट सीईओ उद्योग पुरस्कार, त्यानंतर दलाई लामा यांच्याकडून मिळालेला गोल्डन पीकॉक पुरस्कार, २०१० मध्ये ग्रीन हॉटेलीयर पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, २०१२ मध्ये जर्मनचा जीवनगौरव पुरस्कार अश्या अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. विठ्ठल कामत हे ‘हॉटेल आणि रेस्टॉरेट असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आहेत. या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितीवर सल्लागार म्हणून ते आपले काम करतात.
हॉटेल इंडस्ट्री मध्ये मराठी माणूस यशस्वी होऊ शकतो किंवा उद्योजक बनू शकतो असं क्वचित पहायला मिळतं, परंतु आज बरीच वेगवेगळी मराठी लोकं उद्योजक बनण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. अशांसाठी विठ्ठल कामत यांनी आपली हॉटेल इंडस्ट्रीमधील कारकीर्द आणि उद्योजक म्हणून यशस्वी केलेल्या वाटचालीचा संपूर्ण प्रवास त्यांच्या ‘इडली ऑर्किड आणि मी’, ‘उद्योजक होणारच मी’ आणि यश, अपयश आणि मी या पुस्तकांच्या माध्यमातून उद्योजकांपर्यंत पोहोचवला आहे.
जगभरात ४५० पेक्षाही अधिक रेस्टॉरंट उघडणारे एक यशस्वी उद्योजक, एक जाणकार लेखक, पर्यावरण आणि पक्षीविद्यातज्ञ, पूरातन वस्तूंचे अभ्यासक एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या विठ्ठल कामत यांचा आदर्श घेऊन आपण देखील संकटातून ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग शोधत यशाचे सर्वोच्च शिखर गाठू आणि आपल्या कामाचा डंका केवळ अटकेपर्यंतच नाही तर जगाच्या दाही दिशात पोहोचवू.
आणखी वाचा
- जगातील सर्वात मोठ्या बँकेचे संस्थापक जे पी मोर्गन यांची कहाणी
- या माणसामुळे आपल्या घरापर्यंत वीज पोहचली- निकोला टेस्ला
- फोटोग्राफी क्षेत्रातला पहिला कॅमेरा बनवणारा अवलिया – जॉर्ज इस्टमन
- जगातील पहिली गाडी बनवणारा कार्ल बेंझ
- यांच्यामुळे सामान्य माणसाच्या दारात गाडी उभी राहिले – हेन्री फोर्ड
- सायकलच्या दुकानापासून १० हजार कोटींपर्यंत पहिले मराठी उद्योगपती – लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
- मतिमंद म्हणून शाळेतून काढून टाकलं, तोच मुलगा जगातील सर्वात मोठा संशोधक बनला
- इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या
- अवघ्या भारताच भविष्य बदलणाऱ्या टाटा कंपनीची सुरुवात कशी झाली?