व्यवसायच का? नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

एका ठराविक वयानंतर प्रत्येकाला जीवनात आर्थिक स्थैर्य अपेक्षित असतं. मग आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण हे स्थैर्य प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या संधी शोधत असतो. कधीकधी या संधी आपल्या आवडीच्या क्षेत्रातल्या असतात, तर कधीकधी त्यातून कितपत उत्पन्न मिळतं यावर अवलंबून असतात. कुठेतरी समाधान हा भाग या प्रवासामध्ये दुय्यम स्थानी ठेवला जातो; परंतु स्वतःचं करिअर घडवणं याला प्राथमिकता देणं हे देखील काही चुकीचं नाही..
आपापल्या परीने प्रत्येक जण आपल्याला जमेल तसं परिस्थितीचा विचार करून, उपलब्ध संधींचा विचार करून, घरातून मिळणाऱ्या आर्थिक पाठबळाचा विचार करून स्वतःसाठी एखादं करिअर निवडतो आणि त्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी, घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सबंध करिअरच्या प्रवासात बऱ्यापैकी पिढी ही शिक्षण चालू असताना मला शिक्षण झाल्यावर व्यवसाय करायचा आहे, असे म्हणत नाही; तर एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी घ्यायची आणि आयुष्यात स्थिर व्हायचं असं बऱ्यापैकी जणांचं म्हणणं असतं.
प्रत्येक व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीला लाभणारे सामाजिक वातावरण, सहवासात येणारी माणसे, घेतलेले शिक्षण, वाचलेली पुस्तके, ऐकलेली भाषणे व चर्चा, आयुष्यात आलेले प्रसंग व या सर्व घटनांना त्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद यांच्याद्वारे झालेली असते त्यामुळे प्रत्येकाचे वेगळे विचार, वेगळे व्यक्तिमत्व आणि प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा व्यक्तीपरत्वे बदललेला असतो.
मग या दृष्टिकोनामध्ये नोकरीच्या ऐवजी सुरुवातीपासूनच आपल्याला व्यवसायाच करायचा आहे आणि तो का करावा? ही मानसिकता मनाशी पक्की होणं गरजेचं असतं, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत की व्यवसायच का ?..

आणि नोकरी का नको ?
खरंतर सर्वात आधी, मला कुठेतरी माझी फाईल हातात घेऊन कंपन्यांची दारं भटकत नोकरी मागायची नाही; तर चार लोकांना माझ्या माध्यमातून नोकरी देऊन त्या देणाऱ्यांच्या रांगेत मला यायचं आहे, ही भावना मनाशी पक्की होणं ही खूप प्राथमिक पायरी आहे. कोणताही व्यावसायिक हा आधी त्याच्या मनात उद्योजक म्हणून तयार झालेला असतो, मगच तो जगाच्या समोर त्याचा उद्योग, व्यवसाय आणू शकतो.
व्यवसायच का ?
अतीव समाधान:
खरंतर जेव्हा आपण कोणतातरी व्यवसाय करतो त्यावेळी तो व्यवसाय म्हणजे लोकांच्या कोणत्यातरी समस्येचं समाधान असतं. लोकांच्या एखाद्या प्रश्नावर आपण उत्तर शोधलेलं असतं. त्यामुळे कोणाचं तरी जगणं आपल्या काहीतरी करण्यातून सुखकर होणं हे समाधान कोणा दुसऱ्यासाठी आठ तासाची नोकरी करून आणि नऊ ते पाचच्या साच्यात स्वतःला बांधून ठेवून कधीच मिळणार नाही.
आर्थिक सुबत्ता:
असं म्हटलं जातं की पैसा हे सर्वस्व नाही, पण आजच्या काळात पैशाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही हेही तितकंच खरं आहे. पैसा हे नक्कीच अंतिम साध्य नाही; परंतु आपल्या जीवनाचं अंतिम साध्य साधण्यासाठी पैसा हे नक्कीच एक उत्तम आणि आवश्यक साधन आहे. कुठंतरी नोकरी करत असताना एका ठराविक Limit पर्यंत आपण कमावू शकतो, पगार घेऊ शकतो परंतु एक व्यावसायिक असताना आपल्या उत्पन्नाला कोणतीच मर्यादा राहत नाही. आपण जितकं काम करू, जितके कष्ट करू, जितका स्वतःच्या व्यवसायाला वेळ देऊ, तितकं आपलं उत्पन्न वाढणार यात शंका नाही. आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा, आपली इतर अपूर्ण स्वप्नं या आर्थिक उत्पन्नातून नक्कीच पूर्ण करू शकतो.
स्वतःसाठी वेळ :
आपण जर नोकरी करत असू तर आपल्या नोकरीच्या वेळी आपल्याला त्या ठिकाणी पोहोचणं हे बंधनकारक असतं. आपली कामाची वेळ संपल्याच्यानंतरच आपण तिथून बाहेर पडू शकतो; परंतु व्यवसायात तुम्ही स्वतः मालक असता, तुमच्यासाठी लोक काम करत असतात, त्यामुळे व्यावसायिक कामांचं योग्य नियोजन करून आपल्याला स्वतःला व्यवसायात किती वेळ द्यायचा आहे, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी कोणता वेळ राखीव ठेवायचा आहे हे आपण स्वतः ठरवू शकतो.
Risk Management:
जेव्हा तुम्ही एक व्यवसायिक असता तेव्हा रोज नवनवीन आव्हानांना, अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं या सर्व समस्या व्यवसायाचे मालक म्हणून तुम्हाला स्वतः त्यात लक्ष घालून सोडवाव्या लागतात. अशावेळी कधी कोणता निर्णय घ्यायचा? काय करायचं? हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं. तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला आपल्या पद्धतीनेच हाताळावी लागते. अशावेळी वेगवेगळ्या अनुभवातून शिकत या अडचणींचा कसा सामना करायचा, अवघड परिस्थिती कशी हाताळायची यामुळे नकळत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो आणि अप्रत्यक्षरित्या Risk Management चं महत्त्वाचं तंत्र आपल्याला अवगत होतं.
मग आता व्यवसायाच्या बाबतीत एवढ्या सगळ्या सकारात्मक बाबी असतील तर उशीर कशाला ? आजच आपल्या उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात करा. डोक्यात असणाऱ्या कल्पनेला चांगल्या मार्गदर्शकासमोर मांडा, अनुभवी लोकांचे सल्ले घ्या आणि फक्त सुरुवात करा.. समोरची वाट पावलागणिक आपोआप दिसत जाईल.
उठा, लढा आणि भिडा.
आणखी वाचा :
- घरच्या जबाबदारीसह यशस्वी व्यवसाय: महिलांच्या प्रेरणादायी यशोगाथा
- जागतिक उद्योजक दिन – प्रवास उद्योजक बनण्याचा
- युगप्रवर्तक उद्योजक “नारायण मूर्ती”