‘दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
माणूस जगत असतो तो ऑक्सिजनवर. जशी त्याला ऑक्सिजनची गरज असते तशीच आनंदमयी जीवन जगण्यासाठी त्याला प्रेरणेची गरज भासत असते. तो जगत असताना त्याच्या हातून अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. माणसाच्या हातून एखादे ठराविक कार्य कसे काय घडते? अर्थातच त्याला मिळालेल्या प्रेरणेमुळे. माणसाच्या कृतीला आणि जाणीवेला ज्यामुळे प्रोत्साहन मिळते त्यालाच प्रेरणा असे म्हणतात.
हल्ली Social Media वर तुम्हाला इतके सारे Motivational Speaker पाहायला मिळतील की विचारायची सोय नाही. YouTube वर साधं Motivation हा शब्द जरी टाइप केला तरी संदीप महेश्वरी, विवेक बिंद्रा, प्रिया कुमार, गौर गोपाल दास अशा कित्येक Motivational Speakers चे Channels ओपन होतील. ते आपल्याला नेहमी प्रेरणा देत असतात. त्यांच्या बोलण्यातून आपल्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ते जीवनातील अध्यात्माच्या, ध्यानाच्या अनेक गोष्टींपर्यंतची प्रेरणा मिळते. प्रेरणा ही अग्निसारखी असते. तिला जर इंधन पुरवलं नाही तर ती विझून जाते. ‘मला यशस्वी व्हायचंय, मला पैसा कमवायचाय’ या जिद्दीतूनच प्रेरणेचा जन्म होत असतो. जर तुमच्यात जिद्दच नसेल तर इंधन नसलेल्या वाहनाप्रमाणे तुमच्या यशाची गाडी धक्के खात खात धीम्या गतीने चालेल.
एका वाक्यात प्रेरणा म्हणजे काय सांगायचं झालं, तर प्रेरणा ही आपल्या आयुष्याला गती देणारी एक शक्ती आहे. ती तुम्हाला कोणाच्या बोलण्यातून मिळेल, वाचनातून मिळेल किंवा कृतीतून मिळेल. आमच्या घराशेजारी पाटील कुटुंबीय राहत होते. त्यांचा तुषार नावाचा मुलगा चांगल्या कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत होता. नम्र आणि इतरांप्रती नेहमी आदराची भावना बाळगणारा तुषार सगळ्यांच्याच आवडीचा होता. मात्र त्याचा भाऊ मंगेश व्यसनी आणि व्याभिचारी होता. दारू, सिगारेट, गांजाचं त्याला व्यसन होतं. तो आपल्या बायकोला देखील भरपूर मारायचा. एके दिवशी असंच त्याला कोणीतरी विचारलं. का रे तु असा वागतोस, दारू पिऊन का मारझोड करत असतोस? त्यावर मंगेश म्हणाला, “लहानपणी माझे बाबा दारू पिऊन आईला खूप मारायचे. रोज दारू पिऊन शिवीगाळ करायचे. त्याच वातावरणात मी वाढलो आणि मला देखील त्यांच्यासारखीच सवय लागली. कामाच्या आळसामुळे माझी ही अशी माझ्या वडिलांसारखीच अवस्था झाली.”
तुषारलाही हाच प्रश्न विचारला. त्यावेळी तो बोलला, “मी माझ्या वडिलांमुळेच इतका संस्कारी आणि यशस्वी बनलो.” आश्चर्याची गोष्ट आहे… तुषारचे वडील तर दारू पिऊन आईला मारझोड करायचे, मग हा यशाचं श्रेय वडिलांना कसं काय देतोय? त्यावेळी तुषार पुढे सांगू लागला, “माझे बाबा मी लहान असताना ते खूप दारू प्यायचे, माझ्या आईला खूप मारायचे. त्यांचं वागणं बघून मी तेव्हाच ठरवलं, की मोठा झाल्यावर वडिलांसारखं अजिबात वागायचं नाही.”
मित्रांनो दोघंही भाऊ एकाच वातावरणात वाढलेले. त्या दोघांनाही एकाच गोष्टीतून प्रेरणा मिळत होती; पण एकावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला, तर दुसऱ्यावर नकारात्मक. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीतून तुम्ही सकारात्मक प्रेरणा घेतली पाहिजे. अगदी अजाण बालकापासून ते वृद्ध आजोबांपर्यंत प्रत्येकाकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते. हा निसर्ग तर पावलोपावली आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवत असतो. एक नवचैतन्य देत असतो.
कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील तरुण. इतक्या मोठ्या संकटात देखील तो गुरुजींकडे पैसे नाही, तर पाठीवर एक प्रेरणेची थाप मागत होता. मित्रांनो हे जे प्रोत्साहन आहे ना, तेच नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळवून देत असतं. लहानपणी शाळेत गुणगौरव सोहळा असायचा. शालेय परीक्षा, खेळ, संगीत, नृत्य, वादन अशा प्रत्येक क्षेत्रात अव्वल असलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं जायचं. साहाजिकच त्यामुळे मुलांच्यात अजून चांगलं काम करण्याची ऊर्जा निर्माण व्हायची. आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती असावी जी तुम्हाला नेहमी प्रेरणा देईल. नवीन काहीतरी करण्याचं बळ देईल आणि जर कोणी नसेलच तर बाह्य प्रेरणा मिळविण्यापेक्षा तुम्हीच स्वतःला प्रेरणा देऊन तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेचा दरवाजा खुला करा. तुमच्यातील अंतर्गत प्रेरणेला बळ देऊन तिला भरभक्कम बनवा.
तुमचे ध्येय नेहमी डोळ्यासमोर ठेऊन, रोज त्याची उजळणी करून तुमच्या मनावर ठसवा. म्हणजे नक्कीच तुम्ही योजिलेले कार्य समर्थपणे पार पडेल. आजचा Sunday Motivation चा लेख कसा वाटला कमेन्ट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- सगळं संपलं असं कधीच होत नसतं
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता