सगळं संपलं असं कधीच होत नसतं! – मोटिव्हेशनल स्टोरी
ही गोष्ट आहे दोन मित्रांची आणि त्यांच्या मैत्रीची. त्यांच्या मैत्रीची सुरुवात एका हॉस्पिटलमध्ये होते. दोघे एकाच वॉर्डमध्ये असतात. त्यातील एक मित्र असतो रामलाल नावाचा, त्याला पॅरालिसिस झालेला असतो. बिचाऱ्याचे संपूर्ण शरीर अधू झाल्यामुळे तो चालू-फिरू शकत नव्हता. दुसरा जयसिंग. तो बाहेरून तरी धडधाकट वाटायचा. तो रोज त्या खाटेवरच पडून राहिलेल्या रामलालला खिडकीबाहेरील जग दाखवत असे. त्या पेशंटरूममध्ये एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून जयसिंग बाहेरच्या निसर्गाचं वर्णन करायचा.
निळेशार आकाश, त्या आकाशातून विहार करणारे पक्षी, उंच-उंच हिरवीगार झाडे, खाली बागेत बागडणारी मुले, बाहेरचा सुंदर निसर्ग तो त्याच्या डोळ्यासमोर उभा करायचा. त्याला देखील खूप छान वाटायचं जयसिंग इतकं सुंदर वर्णन करायचा की रामलाल वाटायचं की, कधी एकदा मी बाहेर पडून माझ्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहतो. असेच बरेच दिवस या दोघांचे हे वर्णनात्मक खेळ चालू होते. आणि एक दिवस अचानक सका-सकाळी रामलाल पाहतो तर काय? जयसिंग रूममध्ये नव्हताच. रामलालला वाटलं, बहुतेक त्याला डिस्चार्ज मिळाला असेल, पण ‘मग त्याने रात्री मला सांगितलं कसं नाही?’ आता मला बाहेरचं जग कोण दाखवेल? आता बाहेर काय चाललंय ते मी कसं बघू?
तितक्यात तिथे नर्स येते, रामलाल तिला विचारतो, जयसिंगला केव्हा डिस्चार्ज मिळाला. त्यावर ती नर्स म्हणते; डिस्चार्ज! अहो, त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का/ त्यांच्याकडे शेवटचेच काही दिवस होते. मध्यरात्रीच त्यांचं निधन झालं. आणि हे ऐकल्यावर रामलालच्या पायाखालची जमीनच सरकली. इतके दिवस एकत्र असून देखील जयसिंग काहीच बोलला नव्हता. रामलालला खूप दुःख झाले. इतका आनंदी आणि भला माणूस कसं काय या जगाचा निरोप घेऊ शकतो. आपलं आयुष्य ज्याच्या साथीमुळे व्यवस्थित चालू होतं, तो सहाराच आता मिळणार नव्हता. जयसिंगला माहीत होतं, की आपल्याकडे शेवटचेच काही दिवस राहिलेत, तरीही तो किती आनंदांत जगत होता याच विचारात रामलालचे 3-4 महीने कसे निघून गेले त्याच त्यालाच कळलं नाही. मात्र त्यांच्या अंतर्मनात खिडकीबाहेरील जग पाहण्याची प्रबळ इच्छाशक्ती निर्माण झाली होती. जयसिंगचे बोलणं त्याला सारखं आठवत राहत होतं.
आणि एक दिवस शरीरातील संपूर्ण ताकद एकवटून त्याने हातापायची हालचाल केली. हळूहळू कॉटवरुन पाय खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. रामलाल रोज खिडकीबाहेर काय चालू आहे हे पाहण्यासाठी धडपडत होता आणि एकदिवस त्याच्या प्रयत्नांना यश आले, संपूर्ण ताकदीनिशी तो दोन्ही पायांवर उभा राहिला. धडपडला आणि समोरच्या कॉटवर जाऊन आदळला. पण पुन्हा उभा राहिला आणि अखेर तो खिडकीजवळ गेला. खिडकीतून बाहेर पाहतो तर काय! जयसिंग सांगत होता त्यातील काहीच तिथे नव्हते. तो नर्सला जोरजोरात हाका मारू लागला. नर्स धावत-पळत आली. ‘नर्स इथं खाली मोठं गार्डन होतं, उंच मोठी-मोठी झाडे होती, कुठं गेलं सगळं, इथे तर आत्ता काहीच दिसतं नाही. २ महिन्यातच सगळं गायब कसं झालं.’ त्यावर नर्स म्हणाली, ‘साहेब मी इथे १० वर्ष झालं काम करतीये आणि राहायला पण इथं जवळच आहे. माझ्या बघण्यात तरी इथं जवळपास कुठेच गार्डन नाही. गार्डन तर सोडा, इथं जास्त झाडेदेखील नाहीत. पहा ना, सगळ्या बिल्डिंगच दिसतायेत.’
त्यावर रामलालला प्रश्न पडतो, मग जयसिंग एवढे दिवस माझ्याशी खोटं का बोलला असेल. पण काही वेळाने रामलालच्या लक्षात येतं, जयसिंगच्या त्या बोलण्यामुळेच मी माझ्या पायांवर उभा राहू शकलो. माझ्यात उभं राहण्याचं बळ आलं ते जयसिंगमुळेच.
मित्रांनो आपल्या वाणीत इतकी ताकद असते ना की, त्यामुळे अशक्यप्राय गोष्टीदेखील शक्य होतात. त्यामुळे कधीकधी कोणाबद्दल पॉझिटिव्ह बोललं किंवा कोणाचं कौतुक केलं तरी काही बिघडत नाही. फक्त संक्रांतीच्या दिवशीच गोड बोलायचं असतं असं काही नाही. एकेक लोक असतात, जे नेहमी negative विचार करतात negative बोलत असतात. आपल्या बोलण्याने जास्त काही फरक नाही पडणार मान्य आहे, मात्र समोरच्या व्यक्तीच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देखील पुरेशी असते.
बघा आपण लहान असताना चुकीचं बोलल्यावर आई सांगायची; ‘असं बोलू नये, वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असते.’ मित्रांनो बऱ्याचदा आपण जसं बोलू ना, तसं खरंच घडतं असतं. विलपॉवर का कायतरी म्हणतात ना. तुमच्या बाबतीत देखील कधी असं घडलं असेलच ना! समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुम्ही motivated नक्कीच झाला असाल आणि त्याच बोलण्यामुळे तुमच्यात energy आली असेल. काही आठवत असेल, तर कमेंटमध्ये अगदी थोडक्यात आम्हाला सांगा. आणि नेहमी असेच मोटिव्हेटेड रहा आणि दुसऱ्यांना देखील मोटिव्हेट करा.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता