सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो!

जर आपण पाण्यात मीठ टाकले तर ते पाणी खारट बनते, मात्र जर त्याच पाण्यात साखर टाकली तर? तर मात्र ते पाणी गोड बनते. नमस्कार, मित्रांनो च्या आजच्या भागात आपले स्वागत आहे तर आज बोलूया संगतीविषयी.
वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. एक दरोडेखोर परमेश्वराच्या नामस्मरणामुळे ऋषी बनला. इतकंच नाही तर त्याने रामायणदेखील लिहीले. त्याचं कारण म्हणजे संगत. माणसाला शिक्षण हे केवळ शाळा-कॉलेजमधून मिळत नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून, सहवासातील माणसांच्या अनुकरणातून तो शिकत असतो.
जेव्हा आकाशातून पावसाचा थेंब जमिनीवर येतो तेव्हा तो स्वच्छ आणि निखळ असतो. तोच थेंब जर घाणीच्या पाण्यात पडला, तर त्याला घाणीचे स्वरूप प्राप्त होते आणि जर समुद्रातील शिंपल्यात पडला, तर मात्र त्यातून मोती तयार होतो. संगतीचा परिणाम किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला दिसून येते. शुद्ध, सात्त्विक वृत्तीच्या माणसांच्या सान्निध्यात राहिल्यावर आपल्यावरही त्या चांगल्या संस्काराचा प्रभाव पडतो, पण सध्याच्या युगात चांगल्या गोष्टी कोणत्या आणि वाईट कोणत्या हेच ठरविणे अवघड झाले आहे. संस्कारांचा अभ्यास देणाऱ्या मठामध्येदेखील नको ते धंदे केले जातात.
आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, मात्र आपण कोणाच्या संगतीत रहावं हे आपल्या हातात असतं. आपल्या नकळत आपण दुसऱ्यांचे शब्द, त्यांच्या लकबी आत्मसात करत असतो. त्यातल्या त्यात वाईट गोष्टी लगेच आत्मसात होतात.
आपण 4- 5 वर्षाच्या मुलाचं उदाहरण घेवूया. अपशब्द किंवा शिव्या लहान मुलांना शिकवाव्या लागत नाही. कुठून तरी ऐकून ते लगेच शिकतात, आणि प्रसंगी पद्धतशीरपणे त्याचा प्रयोगही करतात. मात्र तेच चांगले श्लोक, विचार त्यांना शिकवावे लागतात, नव्हे तर घोकून घ्यावे लागतात. मात्र ऐनवेळी त्यांना ते सुचतीलच, आठवतील असे नाही. म्हणून तर शालेय जीवनात आपली अधोगती दिसू लागली, की शिक्षिका आपल्या रोजनिशीत शेरा लिहून देतात, ‘आपल्या पाल्याची संगत बदला.’ हा नियम शाळेपुरताच मर्यादित नाही, तर आयुष्यभरासाठीचा आहे.
आपल्या महाभारत आणि रामायणातील व्यक्तिरेखाही खूप काही शिकवून जातात. रामायणातील कैकयीच्या व्यक्तिरेखेत अनेक नकारात्मक छटा दिसतात. कैकयीने आपला पुत्र भरतासाठी, रामाला वनवासाला पाठवले, पण तुम्हाला माहिती आहे का? कैकयी आधी अशी नव्हती. ती रामावर अतिशय प्रेम करायची, भरतापेक्षाही जास्त लाड ती रामाचे करायची, मात्र तीच्या मंथरा नावाच्या दासीमूळे कैकयीचे विचार पालटले. मंथरेने तिचे कुत्सित विचार कैकयीच्या डोक्यात भरले आणि कैकयी तिच्यासारखा विचार करू लागली, केवळ मंथरेच्या सांगण्यामुळेच कैकयीने रामाला वनवासाला पाठविले. कैकयीलाही सगळे वाईटच दिसू लागले. अशी मंथरा प्रवृत्ती केवळ कैकयीच्याच नाही, तर आपल्याही अवती भोवती वावरत असते. तिला वेळीच ओळखून पळवून लावले पाहिजे. कलियुगात मंथरेची रूपे अनेक आहेत. त्यामुळे तिला चार हात लांबच ठेवाल तरच उत्तम!
दुसरे उदाहरण सर्वांच्या लाडक्या कृष्णाचे, महाभारतातील युद्धावेळी दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्णाजवळ युद्धासाठी मदत मागण्यासाठी जातात. त्यावेळी कृष्ण विचारतो, तुम्हाला मी हवा आहे की माझे सैन्य ? दुर्योधन लगेचच सैन्य मागतो आणि अर्जुन खुद्द कृष्णाला मागतो. आणि त्यानंतरचा परिणाम तुम्हाला ज्ञात आहेच. आपण या कालियुगातले अर्जुन आहोत, मात्र अजून आपल्याला श्रीकृष्णाचा शोध घेता आला नाही. आपल्याबरोबर कृष्णासारखी व्यक्ती असायला हवी. जी आपले विचार बदलून चांगल्या कामासाठी आपल्याला प्रवृत्त करेल. या दलदलीच्या युगात वावरत असताना डोळसपणे पहा की, आपण नेमके कोणाच्या सहवासात आहोत? मंथरेच्या की श्रीकृष्णाच्या ? कारण संगत माणसाला घडवत असते.
तुम्हाला आजचा चा लेख कसा वाटला हे कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि नवी अर्थक्रांतीच्या चॅनेलला आताच subscribe करा.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता
- निःस्वार्थ मदत हीच जगण्याची कला I Sunday Motivation