आरोग्य हीच खरी संपत्ती, हे लक्षात ठेवा!
उत्तम आरोग्य हे माणसाला मिळलेले वरदान आहे. “आरोग्यम धनसंपदा” हे मूल्य अगदी लहानपणीच आपल्याला शिकवले जात असते. कोणीतरी एक मार्मिक सत्य सांगितले आहे की, माणूस पहिल्यांदा संपत्ती मिळविण्यासाठी आरोग्य खर्ची घालतो. नंतर आरोग्य मिळविण्यासाठी पैसा खर्ची घालतो.
लहानपणी आपण एका भिकाऱ्याची गोष्ट ऐकली होती. आपल्याकडे काहीच नाही म्हणणाऱ्या भिकाऱ्याला राजाने दहा हजार सुवर्णमुद्रा देवून त्याच्याकडे त्याच्या एका डोळ्याची मागणी केली. त्यावर त्याने नकार दिला. पुन्हा राजाने आणखी दहा हजार सुवर्णमुद्रा देवू करून त्याच्या हाताची मागणी केली. त्यावर देखील भिकाऱ्याने राजाला विरोध केला, कारण त्याला त्याच्या आरोग्याचे महत्त्व पटले होते.
आपलं शरीर आणि मन ही जगातील एक विलक्षण निर्मिती आहे. त्याचसोबत आपण दररोज इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय करू शकतो हे देखील एक न उलघडणारं कोडंच आहे. पण दुर्दैवाची गोष्ट ही की माणूस पळत्याच्या मागे धावतो, जे मिळालं आहे त्यात समाधानी न राहता तो भटकतोय नको असलेल्या गोष्टींच्या मागे. सोने, धनदौलत, अफाट प्रॉपर्टी म्हणजे श्रीमंती नव्हे. तर आरोग्य हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते हे त्याला कळतच नाही. पैसे मिळवताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली तर त्या पैशांचा उपभोग घेता येणार आहे का? कमावलेले पैसे डॉक्टरकडे जातील, हानी होईल ती वेगळीच.
या आधुनिकीकरणामुळे आपले आयुष्य सुकर आणि वेगवान झाले आहे, पण त्याचे प्रतिकूल परिणाम देखील मानवी आरोग्यावर होतात. हल्ली आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम पटकन हव्या असतात. या आधुनिकीकरणामुळे दोन पाहुण्यांना आपण स्वतःहून आपल्या आयुष्यात आमंत्रण दिले आहे. ते म्हणजे व्यसन आणि तणाव. कामाचा ताण आणि रोजची धावपळ यामुळे लागलेल्या व्यसनामुळे माणसांना अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय.
व्यसन म्हणजे फक्त दारू आणि तंबाखूचे सेवन करणे नाही, तर आजकाल मोबाईल, टॅब्लेटसारखी जी आधुनिक गॅजेटस आपण वापरतो ते सुद्धा एक व्यसनच आहे. आपण या गॅजेटसचे गुलाम बनलो आहोत. या स्पर्धेच्या युगात माणूस खूप काही मिळवण्याच्या नादात वर्तमानाचा कमी आणि भविष्याचा जास्तच विचार करतोय. त्यामुळे भविष्याचा विचार करताना वर्तमानातले सुखही गमावून बसतो, यामुळे आरोग्याकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होते. या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरात आणि मनात हळूहळू विषासारख्या पसरत आहेत आणि आपलं आयुष्य कमी करत आहेत. आपल्याकडे सुदृढ मन आणि निरोगी शरीर नसेल, तर या उच्च तंत्रज्ञानाचा काय उपयोग? या अशा जीवनशैलीमुळे ‘जेवण समोर असूनही नीट जेवता येत नाही आणि डोळ्यावर झोप असूनही झोपता येत नाही’ अशी अवस्था झाली आहे. ध्येयाकडे धावताना आपण आपलं स्वतःचं नुकसान तर करून घेत नाही ना? हे बघणं गरजेचं आहे.
नेहमी लक्षात ठेवा, चांगलं शरीर आणि आनंदी मन नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. पण अजूनही उशीर झालेला नाही. अजूनही तुम्ही माघारी फिरू शकता. स्वतःच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायची आता वेळ आलेली आहे. आरोग्य जोपासा, शरीराची आणि मनाची शक्य तितकी काळजी घ्या. यासाठी स्वतःला शिस्त लावून घ्या, रोज व्यायाम करा, मेडिटेशन करा, स्नेहसंबंध जोपासा, हसत-खेळत राहा, प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या, सकारात्मक विचार करा. हे सगळं एका दिवसात होणार नाही, त्यासाठी वेळ लागेल. उद्योजक हा हजारोंचा पोशिंदा असतो. त्यामुळे त्याचे आरोग्य उत्तम गरजेचे आहे. यासाठी सर्व उद्योजकांनी तब्येतीची पुरेशी काळजी घेऊन नेहमी सुदृढ राहावे. त्यामुळे सर्वांनी स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. आयुष्य एकदाच मिळतं, ते मनसोक्त जगा आणि दुसऱ्यांनाही जगायला शिकवा. तेही उशीर व्हायच्या आधी.
हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकून आयुष्याचे धडे गिरवण्यासाठी चॅनेल आताच सबस्क्राईब करा.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता