कधी टॉयलेट साफ केला, कधी वडापाव विकला: जाणून घ्या ‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा संघर्षमय प्रवास

सध्या देशभरात “छावा” (Chhaava) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जीवन प्रवासावर आधारित आहे, ज्यात महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) यांनी साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मीका मंदाना हिने साकारली आहे, तसेच अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि संतोष जुवेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सुद्धा आपली भूमिका चोख निभावली आहे. या सर्व कलाकारांच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
मात्र, या चित्रपटाच्या यशामध्ये सर्वाधिक कौतुक कोणाचं होत असेल, तर ते म्हणजे चित्रपटाचे मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांचं. कारण पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर इतक्या ताकदीने साकारण्यात आला आहे. उतेकर यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शन शैलीत हा चित्रपट वास्तवाशी जुळवून प्रभावीपणे सादर केला आहे, ज्यामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
लक्ष्मण उतेकर हे आज हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आहेत, पण त्यांचा प्रवास अत्यंत कठीण आणि संघर्षमय होता. एक काळ असा होता की, त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी टॉयलेट साफ करण्यापासून ते वडापाव विकण्यापर्यंत अनेक कामे केली. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. कठोर मेहनत, चिकाटी आणि आपल्या कलेवरील निष्ठेमुळे ते आज यशस्वी दिग्दर्शक बनले आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची सविस्तर माहिती घेऊया.
प्रारंभिक जीवन आणि संघर्ष
लक्ष्मण उतेकर यांचा जन्म एका साधारण कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाल्या नाहीत, पण त्यांच्या मनात मोठी स्वप्नं होती. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द घेऊन त्यांनी लहान वयातच मुंबई गाठली. तिथे ना कुणी ओळखीचं होतं, ना कुठे राहायची सोय. हातात काहीच नव्हतं, पण मेहनतीवर आणि जिद्दीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
पोट भरण्यासाठी त्यांनी एका वडापाव विक्रेत्याकडे लहानसं काम मिळवलं. दिवस-रात्र मेहनत करत असताना त्यांची नजर सतत मोठ्या संधीच्या शोधात होती. त्यांना सिनेसृष्टीत काम करायचं होतं, पण त्यासाठी कुठून सुरुवात करावी, हे माहीत नव्हतं. त्यांनी हार मानली नाही. ते मुंबईत स्टुडिओच्या बाहेर तासन्तास उभे राहत, लोकांशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत आणि योग्य संधी मिळण्याची वाट पाहत होते.
एके दिवशी अचानक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची वडापावची हातगाडी जप्त केली आणि त्यांचं उपजीविकेचे एकमेव साधन हिरावलं गेलं. हा त्यांच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरला. त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आता मागे फिरायचं नाही. परिस्थिती कितीही कठीण आली तरी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं. उपजीविकेसाठी त्यांनी वेळप्रसंगी सफाईचं काम केलं, पण हार मानली नाही.
सिनेमॅटोग्राफीची पहिली पायरी
या कठीण परिस्थितीतून मार्ग काढत असताना, त्यांना एक दिवस एका वृत्तपत्रात पियूनच्या नोकरीची जाहिरात दिसली. स्टुडिओत काम करण्याची संधी पाहून त्यांनी अर्ज केला आणि त्यांना तिथे नोकरी मिळाली. हीच त्यांची सिनेसृष्टीत पहिली पायरी होती.
स्टुडिओत काम करत असताना त्यांना चित्रपट निर्मितीविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. तिथेच क्रूची गरज असल्याने त्यांना कॅमेरा अटेंडंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी हळूहळू सिनेमॅटोग्राफी शिकण्यास सुरुवात केली. छोट्या जबाबदाऱ्या स्वीकारत, सातत्याने मेहनत घेत आणि शिकत ते पुढे जात राहिले.
काळाच्या ओघात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली. इंग्लिश विंग्लिश, हिंदी मीडियम, डीअर जिंदगी आणि 102 नॉट आऊट यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कार्याची झलक दिसली. त्यांच्या मेहनतीमुळे आणि कुशलतेमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळू लागली आणि सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रात त्यांचं नाव लौकिकास आलं .
दिग्दर्शनाची सुरुवात आणि ब्रेकथ्रू
लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून चांगलं नाव कमावलं होतं, पण त्यांना दिग्दर्शक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. त्यांनी मराठीत पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे “टपाल”. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगला आवडला आणि त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली.
यानंतर त्यांनी “लालबागची राणी” हा दुसरा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटामुळे त्यांच्या दिग्दर्शन कौशल्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या कथा सांगण्याच्या अनोख्या शैलीला आणि भावनिक दृश्यांवरील पकडीला प्रेक्षकांची दाद मिळाली.
बॉलिवूडमध्ये संधी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि अखेर २०१९ मध्ये त्यांना मोठा ब्रेक मिळाला. त्यांनी “लुका छुपी” हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिप या विषयावर हलकाफुलका विनोदी सिनेमा होता. प्रेक्षकांनी तो उचलून धरला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर १२८ कोटींची कमाई केली.

यानंतर, आता लक्ष्मण उतेकर यांनी “छावा” हा छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. भव्य निर्मितीमूल्य, दमदार अभिनय, आणि सुंदर दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरतो आहे.मित्रांनो, लक्ष्मण उतेकर यांचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण, संघर्ष, आणि अपयशाला संधी म्हणून स्वीकारलं आणि त्या सर्वांचा योग्य उपयोग करत, आपली स्वप्नं सत्यात उतरवली. त्यांची मेहनत, चिकाटी आणि अथक परिश्रम यामुळेच ते आज एक प्रतिष्ठित दिग्दर्शक बनले आहेत. त्यांची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, आपल्याला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग आणि प्रयत्नांमुळे सर्व गोष्टी शक्य होतात.
आणखी वाचा :
- ना घरच्यांचा आधार, ना समाजाची मदत तरीही उभा केला करोडोंचा व्यवसाय…
- यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो: There is no shortcut to success.
- अंतः अस्ति प्रारंभः