१. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा – यवतमाळ
विदर्भातील अमरावती विभागात येणारा यवतमाळ हा जिल्हा कापूस उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. म्हणूनच यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखले जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा ह्या दक्षिण दिशेला नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्य, पश्चिमेस हिंगोली व वाशिम जिल्हे, उत्तरेस वर्धा व अमरावती हे जिल्हे तर पूर्वेस चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहेत.
आपण प्रत्येक जिल्ह्याचे उद्योग पाहण्याआधी त्यातील रस्ते, नैसर्गिक साधनसंपत्ती, नद्या, पाणीपुरवठा, वीज निर्मिती, दळणवळणाच्या इतर सोयी सुविधा यांचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. कारण या प्रत्येक गोष्टींचा व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. त्यानंतर त्या-त्या जिल्ह्यात चालणारे उद्योग व नवीन उद्योग निर्मितीला असणारा scope याविषयी आपण चर्चा करणार आहोत. व शेवटी त्या जिल्ह्यातील आता सध्याच्या घडीला असणारे यशस्वी उद्योजक कोण आहेत. याबद्दल चर्चा करणार आहोत.
नॉर्थ-साऊथ कॉरिडोर हा राष्ट्रीय महामार्ग (National Highway -07) या जिल्ह्यातून जातो. त्यामुळे भारताच्या उत्तरेकडील राज्यांपासून ते थेट दक्षिणेकडील राज्यांना यवतमाळ जिल्हा जोडला गेला आहे. या मार्गावर पांढरकवडा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने इतर जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ मधून रस्ते वाहतूक ही अतिशय सोपी झालेली आहे. पूर्ण भारताला दक्षिणोत्तर जोडणारा नॉर्थ-साऊथ कॉरिडोर महाराष्ट्राच्या नागपूर-वर्धा-यवतमाळ या तीन जिल्ह्यातून जातो. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर-नागपूर (National Highway – NH204) उमरखेड-आर्णी-यवतमाळ-कळंब या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडतो. या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र-मराठवाडा व विदर्भ एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे जवळजवळ अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र राज्यात रस्त्याने व्यवसायजोडणी शक्य आहे.
पैनगंगा नदी ही यवतमाळ जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरुन वाहते. पैनगंगा नदीच्या उपनद्या या जिल्ह्याच्या अंतर्गत भागातून वाहत येऊन पैनगंगा नदीला मिळतात. पैनगंगा व तिच्या उपनद्यातून होणारा पाणीपुरवठा हा या जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत आहे. पावसाचे प्रमाण हे कमी असून परतीचा मान्सून यवतमाळ जिल्ह्यात जोरदार बरसतो. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. येथील जास्तीत जास्त लोकजीवन हे शेतीवर अवलंबवून आहे. पाणीपुरवठ्याच्या तशा कोणत्याही ठळक योजना या जिल्ह्यासाठी उपलब्ध नाहीत.
नेर, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, दिग्रस, दारव्हा, पुसद, महागाव, उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव, झरी जामणी हे यवतमाळ जिल्ह्यातील तालुके आहेत. लघुद्योगाच्या मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी यवतमाळ जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. या जिल्ह्यात अकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र या जिल्ह्यातील लोकांची शिकण्याची वृत्ती ही फार चांगली आहे. शिक्षणासाठी मोठमोठ्या शैक्षणिक संस्था (काही तुरळक संस्था वगळून) या जिल्ह्यात नाहीत. गुणग्रहणाची उत्तम क्षमता या जिल्ह्यातील लोकांजवळ आहे. याशिवाय येथील तरुण शारीरिक क्षमतेने चांगले असल्याने त्यांच्यातील कलागुण ओळखून त्याच्या वाढीसाठी वाव मिळाला तर देशासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू या जिल्ह्यातून निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. आजवर क्षमता असून ही त्या गुणांना पैलू न पाडल्यामुळे आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरल्याचे पाहून खंत वाटते.
आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सुध्दा कमी आहेत. त्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची हुनर इथल्या माणसांमध्ये आहे. आयटी, manufacturing हे उद्योग वाढण्याच्या आधी शेतीपूरक उद्योग वाढीस लावण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील मोठे खाद्यान्नाचे ब्रँड तयार करण्याची क्षमता यवतमाळ जिल्ह्याची आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन करत असल्याने या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा ही ओळख प्राप्त झाली आहे. मात्र कापसावर प्रक्रिया करणारी मोठी केंद्रे या जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची आर्थिक बाजू तशी फार भक्कम होताना दिसत नाही. उत्तरेकडे आता कापसावर प्रक्रिया करणारा एक मोठा प्रकल्प अमरावती मध्ये निर्माण होत आहे. त्याचा फायदा यवतमाळला होऊ शकतो. शेती, सेवा, शेतीपूरक उद्योग, हातमाग, यंत्रमाग, आयटी, शिक्षण, बँकिंग व manufacturing उद्योग येणाऱ्या काळात या जिल्ह्यात वाढणार आहेत. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत स्वतःची ओळख जपत हा जिल्हा लवकरच समृध्दीचे उद्दिष्ट साध्य करेल याची खात्री वाटते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मुंबई याठिकाणी व्यवसाय करण्याऐवजी यवतमाळ नवीन व्यवसाय उभारणे ही सोपी प्रक्रिया आहे. निर्माण होणारी उत्पादने नागपूरच्या बाजारपेठेत विकण्यासाठी सोयीस्कर आहे. विज्ञानाच्या प्रगतीने जग जवळ आले आहे. त्यामुळे जगभरात सर्वत्र ही उत्पादने विकली जाऊ शकतात.
पुढील जिल्हा – वाशिम
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच, तुमच्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडेल, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.