आपला लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.
होरेशीओ नेल्सन. इंग्लंडचा प्रसिद्ध सेनापती नेल्सन म्हणायचा, ‘ज्यावेळी लढायचे की नाही या द्विधा मनस्थितीत मी असतो, त्या प्रत्येक वेळी मी लढण्याचाच निर्णय घेतो.’ जर्मनीचा सेनापती फोन मोल्तके सुद्धा आधी परिस्थितीचा अंदाज घ्यायचा आणि पटकन निर्णय घ्यायचा, मग भलेही घेतलेला निर्णय बरोबर असो किंवा चुकीचा. तो आपल्या निर्णयावर ठाम असायचा आणि आपण घेतलेला निर्णय बरोबर कसा आहे हे जगाला पटवून द्यायचा. आणीबाणीच्या बिकट परिस्थितीत निश्चित व ठाम निर्णय घेण्याचा गुण ज्या व्यक्तीकडे असतो, ते नक्कीच आपलं नाव जगाच्या इतिहासात रोशन करतात आणि यामध्ये आपल्या छत्रपती शिवरायांच्या निर्णय कथांबद्दल वेगळं सांगायची गरज नाही.
प्रत्येकाला आपल्या जीवनात विविध प्रसंगांना सामोरे जावे लागत असतं. मग ते प्रसंग आनंदाचे, दुःखाचे, धैर्याचे, भीतीचे, जबाबदारीचे कोणतेही असू शकतात. या सर्व प्रसंगाचे अस्तित्व म्हणजेच माणसाचे जीवन होय. अपेक्षित यश मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे निर्णयक्षमता. जरी आपण आत्मविश्वासाला यशाची गुरुकिल्ली म्हटलं, तरी निर्णयक्षमता हेच यशाचं रहस्य असतं. जेव्हा आपण एखादी कृती करण्याचा निर्णय घेऊ तेव्हाच ती पूर्णतेच्या दिशेने आपली वाटचाल सुरु होईल.. नाहीतर जर तुम्ही निर्णयच नसेल घेतला तर यश अपयश लांबच्या गोष्टी.
कित्येकदा आपण ऐकतो की ‘त्यावेळी जरा चुकलंच, मी असा निर्णय घ्यायला नको होता, पण काय करणार? वेळ आता निघून गेली. निर्णयक्षमता वाढविण्यासाठी विचारक्षमता वाढली पाहिजे, ज्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत अशा लोकांना नेहमी इतरांवर अवलंबून रहावे लागते. ते तटस्थ विचार करू शकत नाहीत. मी हे करू की ते करू, पण नेमकं हे कसं करू, मी हे केलंय खरं, पण हे बरोबर आहे का असे अनेक भंडावून सोडणारे प्रश्न पडत असतात आणि पडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आपण दुसऱ्यांकडून घेतो. साध्या भाषेत सांगायचं झालं, तर आपण दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पितो. पण ही सवय भावी आयुष्यासाठी घातक ठरू शकते. अशा व्यक्तींना निर्णयक्षमतेच्या अभावी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच राहत नाही. स्वतःची स्वप्नं, इच्छा-आकांक्षा दुसऱ्याच्या सांगण्यावरून पूर्ण करणाऱ्याला खरंच यशस्वी म्हणता येईल का? नक्कीच नाही…
मंडळी, तुम्ही जर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या उक्तीनुसार काम करत गेला ना, तरंच तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करू शकता. सिद्धार्थने जर आई-वडिलांनी सांगितल्याप्रमाणे गृहस्थाश्रमाचाच मार्ग अवलंबला असता, तर तो युगप्रवर्तक गौतम बुद्ध कधीच बनला नसता. आपला एखादा लहानातला लहान निर्णय एकतर आपले आयुष्य बदलू शकतो किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. जसे महाभारतातील दोन वेगवेगळ्या निर्णयांची आपण अजूनही चर्चा करतो. एक योग्य निर्णय म्हणजे अर्जुनाने कृष्णाला आपल्या पक्षात घेणे आणि दूसरा अयोग्य निर्णय दुर्योधनाने कृष्णाकडे सैन्याची मागणी करणे. एकाच परिस्थितीतील या दोन निर्णयांनी एकाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले तर दुसऱ्याचे समृद्ध.
त्यामुळे नेहमी आपल्या विचारशक्तीच्या जोरावर सांगोपांग विचार करूनच स्वतःचे योग्य निर्णय घेत चला. तुमचा एक योग्य निर्णय तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकतो.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता