लेखमालिकाव्यवसायाच्या वाटेवर चालताना

व्यवसायच का ? – नोकरदार आणि व्यावसायिक यातील फरक

एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता, तर कुठपर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”

या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षांपूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दर महिन्याला एक हजार रुपये मिळायचे, तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारा समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे, तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”

मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा Direct (थेट) तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल, तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु. दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.

हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाही, तर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना मिळत असतो. जमशेदजी टाटांनी १८६८ मध्ये मुहूर्तमेढ रोवलेला टाटा समूह आज १५० वर्षांनीही यशस्वी घौडदौड करतो आहे. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रिक कंपनी आज एडिसन नंतरही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभी राहिली, की आपले काम पूर्ण होते. व्यवसायामध्ये हा कालावधी सरासरी तीन वर्षाचा आहे. काही ठिकाणी तो कमीअधिक होऊ शकतो. नाउमेद होता हा व्यवसाय स्वतःच्या ताकदीवर उभा राहिपर्यंत कसा पुढे नेता येईल? यासाठी कोणती मानसिकता लागेल? या वर पुढील लेखात जाणून घेऊ.

  • अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button