‘मी का म्हणून कर देऊ?
बहुतेक लोकांना सरकारला ‘कर‘ अर्थात ‘टॅक्स‘ द्यावयास आवडत नाही. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी बहुतेक लोक याच गोष्टी प्रथम तपासताना दिसतात, की ‘कर‘ वाढले की कमी झाले आणि त्यावरच अर्थसंकल्प चांगला का वाईट ते ठरवितात. एखादी लहान मुलगी आइस्क्रीम खात असेल आणि तुम्ही तिला म्हटले की त्या आइस्क्रीममधील 30 टक्के आइस्क्रीम मला दे, तर तिला कसे वाटेल?, तिची भावना काय असेल? अगदी तशीच भावना सरकारने टॅक्स मागितला की बहुतेक प्राप्तिकरदात्यांची होते. ‘मी का म्हणून कर देऊ?‘ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी ‘कर‘ किती प्रकारचे असतात आणि ते कोण घेते, ते थोडक्यात पाहू.
कर तीन प्रकारच्या संस्था घेतात – महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. सध्या आपल्या देशात प्रत्यक्ष कर (डायरेक्ट टॅक्सेस) आणि अप्रत्यक्ष कर (इनडायरेक्ट टॅक्सेस) असे एकूण 25 विवMMMMMMMMMMMMMM प्रकारचे विविध कर आकारले जात आहेत. त्यात प्राप्तिकर, व्यवसाय कर, विक्रीकर, सेवाकर आदींचा समावेश होतो.
👍 का घेतले जातात असे कर ?
विविध विधायक कामांसाठी सरकारकडून कर घेतला जातो. रस्ते बांधणे, लोहमार्ग बनविणे, गोरगरिबांना मोफत आरोग्य सेवा देणे, त्यांना मोफत शिक्षण सुविधा देणे, स्वस्त दरात वीजपुरवठा करणे, अशा पायाभूत सुविधा सरकारला पुरवायच्या असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, देशाची सुरक्षा अबाधित ठेवणे व भक्कम करणे, यालाही प्राधान्य द्यायचे असते. आज सर्वत्र दहशतवादाचे सावट आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक युद्धसामग्री गरजेची असते. त्याची खरेदी करण्यासाठी सरकारकडे पुरेसे पैसे विविध करांमधूनच येत असतात.
👍 आपल्या देशात ‘कर‘ जास्त आहे ?
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी एका गुणोत्तराची (रेशो) आकडेवारी पाहू. देशाचे एकूण करउत्पन्न आणि जीडीपी (देशात एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तूची व सेवेची एकूण किंमत) यांचे गुणोत्तर (प्रमाण) साधारणपणे 23 असणे आवश्यक आहे. हे प्रमाण एकूण करउत्पन्न भागिले जीडीपी असे मोजले जाते. भारतात फक्त चार टक्के लोकच प्राप्तिकर भरत असल्यामुळे आपल्याकडे हे प्रमाण सध्या फक्त 17.7 इतकेच आहे. सर्व अविकसनशील देशांचे हेच प्रमाण सरासरी 21 आहे आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) यांच्या सभासद देशांमध्ये तेच प्रमाण 34 इतके आहे. आखाती देशांत हे प्रमाण 1 ते 2 टक्केच आहे. डेन्मार्कमध्ये हे प्रमाण सर्वांत जास्त म्हणजे 50 आहे. म्हणजेच डेन्मार्कमध्ये ‘कर‘ सर्वांत जास्त आहेत. गंमतीची गोष्ट म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणानुसार, डेन्मार्कमधील लोक संपूर्ण जगात सर्वांत आनंदी लोक आहेत. हे विश्लेषण पाहता, आपल्या देशात ‘कर‘ कमी आकारला जातो आणि कमी लोकांना आकारला जातो, असेच उत्तर येते.
तात्पर्य, विविध करांना नाके न मुरडता ‘कर‘ या विषयाचा सरकारच्या म्हणजेच देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनसुद्धा विचार करणे योग्य ठरते.
- सुहास राजदेरकर
आणखी वाचा
- शेअर बाजारातील करिअर आणि व्यवसाय संधी
- कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?
- भविष्यात आर्थिक टेन्शन नको असेल, तर ‘या’ 5 सवयी पाळा