म्हणून साजरं करतात रक्षाबंधन… जाणून घ्या भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचे पावित्र्य
मानवी जीवनात प्रत्येक नात्याचं वेगळं आणि काहीतरी विशेष महत्त्व आहे. कोणतंच नातं छोटं किंवा मोठं असं त्याचं वर्गीकरण करता येणार नाही. ते करुही नये. त्या नात्यातील भावना आणि प्रेम किती खरं आहे यावर त्याचं पावित्र्य अवलंबून असतं. अशाच एका सुंदर नात्यावर आज आपण बोलणार आहोत. ते सुंदर आणि पवित्र नातं म्हणजे बहीण-भावाचं नातं. निखळ प्रेमाचं, मैत्रीचं, आपुलकीचं हे नातं. हे एक असं नातं आहे जे कधीच व्यक्त करता येत नाही. त्या नात्यातील भावना शब्दबद्ध करता येत नाहीत. या नात्यात कुठलीही अट, बंधन, भेदभाव हा कधीच नसतो. पण नात्यात एक खात्री असते. सोबतीची, सहकार्याची, खंबीर साथीची. याच बहीण भावाच्या नात्याला एका विशेष क्षणी व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन.
रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णुकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते. तसेच हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले.
रक्षाबंधनचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासुत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन व सोबत काही भेटवस्तू दिल्या जातात. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. राखीच्या या सणाला संपूर्ण भारतात साजरा करतात. भारतासह नेपाळ व अन्य ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माला मानणारे लोक राहतात तेथे रक्षाबंधन साजरा केला जातो.
रक्षाबंधन या सणाला प्राचीन काळापासून साजरे केले जात आहे. हा बहीण-भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे. हिंदू धर्मात असे अनेक सण परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहेत. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि ही आपली वैभवशाली संस्कृती जपून ठेवणे ही एक नागरिक म्हणून आपली आपल्या देशाच्या प्रती अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे.
क्षणात हसणारं आणि क्षणात रडणारं देखील, निखळ प्रेमाचं हे भावा-बहिणीचं पवित्र नातं. दिवस जातील तसं अजूनच बहरणारं कोणतीही मर्यादा नसणारं. दिवसागणिक अधिकाधिक वृद्धिंगत होत जाणारं हे दिलखुलास नातं.
रक्षाबंधनच्या या पवित्र दिनी या सुंदर नात्याला नवी अर्थक्रांतीचा मानाचा सलाम..
आणखी वाचा :