ध्यानाने होत आहे रे आधी केलेच पाहिजे!
“केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे” समर्थ रामदासांनी लिहिलेल्या या ओळी आपल्या सर्वांनाच ज्ञात आहेत. कोणतही काम जर तुम्ही नियमितपणे करायला सुरुवात केली तरच त्याचं इच्छित फळ आपल्याला मिळतं असं समर्थ आपल्या या ओळींतून सांगतात. आजकाल धावपळीच्या जगण्यात आपण रोज काही ना काही समस्यांशी सामना करत असतो. बाहेरील आणि आतील जगातल्या याच समस्यांमुळं सुरु होतं ते विचारांचं अंतर्युद्ध! खूप साऱ्या निरुद्देशी विचारांच्या या भडीमारामुळे आपल्यातील अस्वस्थताही वाढायला लागते मग या अस्वस्थेतेमुळं येणारा राग, चिडचिड हे आपल्या दुःखाचं कारण ठरतात.
“वर्तमानात जगा, भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा जास्त विचार करू नका”, हे वाक्य तुम्ही याआधीही खूप वेळा ऐकलं असेल. पण अतिविचार करणं आपल्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं की हजार वेळा वाचून सुद्धा हे वाक्य आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात उतरवता येत नाही. तुम्ही कधी एखाद्या लहान मुलाचं बारीक निरीक्षण केलंय का? जर केलं असेल तर एक गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल; ती गोष्ट म्हणजे लहान मुलांच्या मनात फक्त आज असतो.
भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा कुठलाच विचार नसतो, ते फक्त वर्तमान क्षणात असतात. आपण सगळेच कधीतरी लहान होतोच. आपल्यामध्ये सुद्धा वर्तमान क्षणात जगण्याची आणि अतिविचारांचा ताण सोडून देण्याची क्षमता आहे. हो ना? अतिविचारांच्या याच जाळ्यातून स्वतःला सोडविण्यासाठी सर्वात गरजेचं आहे ते रोज “ध्यान” करणं. रोज कमीत कमी 20 मिनिटे ध्यान केल्याने काय काय सकारात्मक बदल घडायला मदत होतात ते आता आपण पाहूया.
1. दृष्टीकोनात सुधार
अतिविचार तुम्हाला कधीच शांत आणि आनंदी आयुष्य जगू देत नाहीत. दररोजच्या ध्यानामुळे दुःख, राग, भीती या गोष्टींतून बाहेर यायला आणि पर्यायाने वास्तवाची जाणीव व्हायला मदत होते.
2. नकारात्मक विचार कमी करण्यासाठी मदत
बऱ्याचदा, आपण आपल्या आयुष्यातील गोंधळांना जबाबदार असणारे दोष कुणा दुसऱ्यांवर लादण्याच्या प्रयत्नात असतो. काही झाले तरी, दुसऱ्या कुणाकडे बोट दाखवले की अडचणींचा सामना करणे सोपे वाटते. दुसऱ्यांमध्ये दोष पाहणे आणि बोट दाखवणे यांसारख्या नकारात्मक वृत्तींना बाजूला करायला ध्यान मदत करते.
3. मनातील कचरा साफ होतो
अतिविचार हे तुमचं मन तुम्हाला खात असल्याचं लक्षण आहे. तुमच्या अस्वस्थतेच्या मुळाशी जाऊन त्याच्याशी दोन हात करा. ध्यानामुळे मनातील कचरा साफ होण्यासाठी मदत होते. तुमच्या डोक्यातील विचारांना व्यवस्थित मांडणं, योग्य विचारांना प्राधान्यक्रम देणं आणि संपूर्णपणे व्यवस्थित विश्लेषण करणं या गोष्टीसुद्धा ध्यानाने शक्य होतात.
4. आसक्तींपासून मुक्तता
अतिविचार हे तुमच्या – तुमचे शब्द, कृती, कल्पना आणि विचार यांच्याबद्दलच्या – आसक्तीचे प्रकट रुप आहे. आपण लोक आणि नात्यांना इतके चिकटून बसलेले असतो. त्यामुळे इतकी मतं व कारणं तयार होतात, आणि मग आपण अती टीका करायला लागतो किंवा अति चिकित्सक होतो. ध्यानामुळे आसक्ती आणि अतिविचारांच्या गोंधळातून बाहेर पडायला मदत होते.
अशा या ध्यान साधनेमुळे एक आनंदी, समाधानी, प्रेममय जीवन जगण्यास आपल्याला मदत होते, पण ध्यानाचे हे सगळे फायदे तुम्हाला तेव्हाच उपभोगायला मिळतील जेव्हा तुम्ही ते नियमितपणे करण्यास सुरुवात कराल. त्यामुळे ध्यानाने होत आहे रे … आधी केलेच पाहिजे!
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता