दिनविशेष

Friendship Day : एक दिवसाचं सेलिब्रेशन, आयुष्यभराची सोबत!

माणसाच्या याच भावनिक गरजेमुळे जन्म होतो नाते-संबंधांचा. आणि घरच्या मंडळींसोबत असलेला हाच दुवा पुढे मित्र-मैत्रिणींसह जपला जातो. मैत्रीचं नातं जरी जन्मापासून निर्माण झालं नसलं, तरीही जन्मभरासाठी जपता येतं आणि जपलं देखील जातं. मैत्रीच्या नात्याचं छोटंसं सेलिब्रेशन म्हणजे मैत्री दिवस किंवा फ्रेन्डशिप डे. तुमचा देखील कोणीतरी खास मित्र असेलच ना, ज्याच्यासोबत तुम्ही हा दिवस घालवणार आहात. मात्र आपण मैत्री दिवस का साजरा करतो? मैत्री तर आयुष्यभरासाठी असते, मग केवळ एका दिवसाचा आनंद का? चला जाणून घेऊया…

फ्रेन्डशिप डे का साजरा केला जातो?

फ्रेन्डशिप डे (Friendship Day) हा मैत्रीचा दिवस आहे, दोन मित्रांमधील नातं साजरं करण्याचा दिवस. भारतात आपण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करतो. मग त्यात मित्रांसोबत घेतलेला एक घोट चहा असेल किंवा मोठाल्या हॉटेलमध्ये पार्टी, महत्त्वाचं काय, तर मित्रांसोबत वेळ घालवणं. आता तुम्ही असं म्हणाल की मैत्री ही दररोज निभवायची असते, मग एका दिवसाचं सेलीब्रेशन का? एकमेकांच्या आधारासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, समोरचा व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव करून देण्यासाठी एखादा खास दिवस हवाच. नाही का? कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण जगभरात वेगवेगळ्या दिवशी मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांमध्ये (United Nations) मध्ये ३० जुलै, तर मेक्सिकोमध्ये १४ फेब्रुवारी आणि सिंगापूरमध्ये एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मैत्री दिवस साजरा केला जातो. दिवस वेगळे असले, तरी त्यामागे असलेला उद्देश मात्र बदलत नाही.

हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉल यांनी मैत्री दिवसाची सुरुवात दोन मित्रांमधील नातं खुलवण्यासाठी केली होती. जॉयस हॉलच्या याच सिद्धांतचा पुढे स्वीकार करण्यात आला आणि अशाप्रकारे मैत्री दिवसाची सुरुवात झाली.  दोन देशांमधले संबंध सुधारावेत, शांतता प्रस्तापित व्हावी म्हणून या दिवसाला महत्व दिलं जाऊ लागलं. मात्र तुम्हाला माहिती आहे का? कित्येक वर्षांपासून सुरु असलेली मैत्री दिवसाची ही परंपरा अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाऊ लागली आहे. वर्ष 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने (United Nations General Assembly) 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. विविध लोकं, देश आणि संस्कृती यांच्यामध्ये शांततेचे संबंध निर्माण व्हावे आणि परस्परांमध्ये एक आपुलकीचा धागा निर्माण व्हवा म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत हा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व संस्कृतींना समान आदर मिळावा, त्यांचा विविधतेसह स्वीकार व्हावा म्हणून मैत्री दिवस साजरा केला जातो. 

मैत्रीचे महत्व काय?

आपल्या आयुष्यात नाते संबंधांचे खरोखर महत्व आहे का? वरती उल्लेख केल्याप्रमाणे कुणीतरी आपले विचार समजून घ्यावे, आपल्याला गटाचा भाग बनवून घ्यावं असं प्रत्येकाला वाटतं आणि ही आपली मानसिक गरज आहे. घरच्या चौकटीत बांधलेलं असताना कुणी आपल्याला दूर लोटण्याचे किंवा समजून न घेण्याचे प्रसंग उद्भवत नाहीत, मात्र एकदाका घरचा उंबरा ओलांडला की बाहेरच्या जगाशी जुळवून घेताना कुणीतरी आपल्यासोबत असावं अशी मानसिक भूक निर्माण होते. परिणामी शाळेत गेलेलं मूल ‘माझ्या आवडीचा खेळ खेळणारं इथे कोण असेल?’  याचा विचार करू लागतं. माणसाचे विचार जुळले म्हणजे आवडी-निवडी उलगडून बघता येतात आणि यातूनच मैत्रीचं नातं तयार होतं, खुलतं आणि बहरू लागतं. 

भले या नात्यात असलेली दोन लोकं जन्मापासून एकत्र नसतील, मात्र वेळेसोबत जोडली गेलेली ही नाळ दिवसेंदिवस घट्ट होते. मैत्री म्हटलं की कट्ट्यावरच्या गप्पा, चहाचा एक कप, संध्याकाळचा खेळ, गाडीवरून मारलेल्या फेऱ्या आणि “माझ्या मित्राला बाईंनी बाहेर ठेवलंय म्हणून मी पण बाहेर जाणार” याचा अट्टाहास. रुसव्या-फुव्यांशिवाय कोणतंही नातं टाकलेलं नाही. असं म्हणतात आपण त्याच्यावरच रागावरतो, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, हक्क असतो आणि म्हणून मैत्रीतदेखील कधीतरी भांड्याला भांडं लागतंच. वेळप्रसंगी मित्रासाठी खंबीरपणे उभं राहणं असो किंवा मित्राची प्रेयसी सोडून गेली म्हणून रडायला खांदा देणं असो मैत्रीचं नातं आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सामावलेलं आहे. 

मैत्रीच्या नात्याचे पौराणिक दाखले:

मैत्री म्हणजे माणसाला मिळालेली एक खास भेट, आणि याला अनेक पौराणिक दाखले देखील जोडता येतात. मैत्री दिवस म्हटलं म्हणजे हमखास आठवते ती सुदामा आणि भगवान श्रीकृष्णाची जोडी. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात झालेली ही मैत्री कायम चिरतरुण राहिली. श्रीकृष्ण राजा झाले, तर सुदामा मात्र गरीब ब्राह्मणच राहिला, तरीही पायपीट करून आलेल्या सुदाम्याच्या पायात रुतलेले काटे आपल्या मऊ हातांनी काढणारे श्रीकृष्ण कोणी देव अगर राजा नव्हते, ते केवळ आणि केवळ सुदाम्याचे मित्र होते. महाभारताच्या पानांमध्ये आपल्याला मैत्रीची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात, मग ती मित्राचं बोट कापलं म्हणून भरजरी शालू फाडणारी द्रौपदी आणि चिंधीची परतफेड लाज राखून करणारे श्रीकृष्ण असोत किंवा खरी आई कोण याची प्रचिती येऊन सुद्धा मैत्रीच्या नात्यापायी कौरवांकडून लढलेला कर्ण, असे कैक प्रसंग पहिले म्हणजे यामधील प्रत्येक मित्राने आपल्या मित्रासाठी केलेला  त्याग डोळ्याच्या पापण्या अलगद ओल्या करतो. 

रामायणाच्या पानांमध्ये देखील मैत्रीची बरीच उदाहरणं आहेत. राजा दशरथाच्या मैत्रीखातर स्वतःचा जीव धोक्यात घालत अपहरण झालेल्या सीतेच्या रक्षणार्थ धावलेला जटायू किंवा मैत्री निभावण्यासाठी वानरसेनेसह समुद्र पार करून गेलेला सुग्रीव, सर्वात महत्वाचं म्हणजे दिलेल्या शब्दाला जागत जिंकलेलं संपूर्ण राज्य विभीषणच्या नावे करणारे श्रीराम ही मैत्रीच्या नात्याची मूर्तिमंत उदाहरणं आहेत. मात्र कायम लक्षात असुद्या की पुराण किंवा इतिहासातील दाखले केवळ गोष्ट म्हणून ऐकण्यासाठी नाहीत, तर स्वतःमध्ये ते गुण उतरवण्यासाठी आहेत. वर उल्लेख केलेल्या प्रत्येकाने मैत्रीची परिभाषा ओळखत, प्रामाणिक राहत, नात्याचा सन्मान करत वेळोवेळी नातं खुलवलं आणि म्हणूनच ते नातं टिकलं. 

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button