दिनविशेष

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Balshastri Jambhekar

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा फार मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला.

बाळशास्त्री जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकी सत्तेला उलथून टाकायचे असेल, तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला आणि मराठी वृत्तपत्रविश्र्वात नवी पहाट उगवली. दर्पणाचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.

दर्पणाचा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी प्रकाशित झाला. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

Darpan News Letter

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.

db9f8f8b 751a 4a53 9455 c569ca1343fc 4b4d5a00 0201 4a52 a744 d860a657c2b1 compressed 40 1

त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या त्या काळच्या प्रचलित भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. आज मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा जसा त्यांचा नावलौकिक आहे, तसाच एल्फिन्स्टन कॉलेजमधील नावाजलेले, हिंदीचे पहिले प्राध्यापक असाही त्यांचा लौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्र्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धिगणित आदी ग्रंथांची निर्मिती केली.

साधारणपणे १८३० ते १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले. या काळात बहुसंख्येने समाज निरक्षर, अंधश्रद्ध व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत , मौल्यवान व अद्‌भूत ठरते. ६ जानेवारी रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button