स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर क्रांतिदिनाचे महत्त्व काय?
जर का तुम्हाला विचारलं की भारताचे नागरिक म्हणून तुमचं पाहिलं प्रेम कोणावर आहे, तर तुम्ही काय उत्तर द्याल? नक्कीच आपल्या मनात पाहिलं नाव येईल ते म्हणजे आपल्या देशाचं, भारताचं. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन पाहिलंत तरीही भारतीय आणि भारत यांच्याप्रमाणे नातं कुठेही पाहायला मिळणार नाही. संपूर्ण वर्षभरात भारतीय म्हणून जर का कुठला महिना आपल्यासाठी महत्वाचा ठरत असेल तर तो आहे ऑगस्ट, कारण अनेक वर्षांपूर्वी याच महिन्यात आपण परकीय जुलमी राजवट कायमची हटवून स्वतःचे राज्य प्रस्थापित केले होते.
भारत आणि भारताचा स्वतंत्रता संग्राम येणाऱ्या अनेक वर्षांसाठी प्रत्येकाच्या मनात घर करून राहील असा दैदिप्यमान आहे. भारताला परकीयांच्या जाळातून मोकळं करण्यासाठी कित्येक आहुती स्वातंत्र्य देवतेच्या यज्ञ कुंडात अर्पण झाल्या आणि त्यानंतर मिळालं ते आज आपण उपभोग घेत असलेलं स्वातंत्र्य. भारताच्या इतिहासातील या पर्वाचे अनेक टप्पे आणि कोपरे आहेत आणि आज आपण यातीलच क्रांती दिवसाचं पान उलघडणार आहोत…
आपण क्रांती दिवस का साजरा करतो?
भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात डोकावण्याआधी आपण इतिहास म्हणजे काय हे जाणून घेऊया. इतिहास या शब्दाची संस्कृत भाषेत अतिशय उत्तम फोड करण्यात आली आहे, इति-ह-आस इति इतिहास शब्दः म्हणजेच काय तर जे घडलं, जसं घडलं त्याची मांडणी म्हणजे इतिहास होय. भारताचा इतिहास खूपच जुना आहे, प्रत्येक टप्प्यावर हा इतिहास बदलत जातो आणि प्रत्येकाचं स्वतःचं असं एक महत्व आहे. पैकी एक म्हणजे भारताचा स्वातंत्र्यसंग्राम. परकीयांच्या आक्रमणानंतर स्वतःच्याच भूमीत माणसं दबली जात होती आणि हीच राजवट दूर करण्यासाठी भारतीयांनी स्वतंत्रता मोहीम सुरु केली, यात अनेक ज्ञात-अज्ञात कुटुंब पणाला लागली, कितीतरी चुली कायमच्या विझल्या गेल्या.
भारत स्वतंत्रता संग्रामाचे दोन विभाग पडतात, एक म्हणजे अहिंसावादी आणि दुसरा हिंसावादी. वेगळ्या शब्दांत मांडायचं तर सशस्त्र क्रांती आणि विनाशस्त्र क्रांती. दोन वेगळ्या विचारांची ही माणसं जरी त्या-त्या विचारसरणीला धरून लढत असली तरीही त्यांचा उद्देश मात्र एकच होता. अहिंसावादी गटाचे नेतृत्व महात्मा गांधी करायचे. गांधीजींच्या मते हातात शस्त्र घेऊन केलेल्या युद्धात अनेक निष्पाप बळी जात असत. ते नेहमी म्हणायचे की अस्त्र-शस्त्राविना देखील क्रांती घडवता येते आणि म्हणून त्यांनी मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन असे कैक मार्ग देखील स्वीकारले होते. यापैकी भारत छोडो आंदोलन हे महात्मा गांधींकडून उचलण्यात आलेलं सगळ्यात शेवटचं पाऊल होतं.
आजच्या दिवशीच म्हणजे 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात सदर आंदोलनाची घोषणा केली होती. गांधीजींकडून इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी केलेला हा सर्वात मोठा प्रयत्न म्हटला जातो, कारण यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा क्षण ‘करो या मरो’ असाच होता. देशभरातून महात्मा गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतीय लोकं त्याकाळी महात्मा गांधींना एका नेत्याच्या रूपात पाहायचे, गांधीजी एखादी गोष्ट सांगतायत म्हणजे ती बरोबरच असेल याची त्यांना खात्री वाटायची. एकार्थी काय तर गांधीजी भारतीयांसाठी अंधारात दिसणाऱ्या दिव्याप्रमाणे होते आणि म्हणून लोकांनी दरवेळीप्रमाणे या वेळी देखील गांधीजींना सोबत केली.
भारत छोडो आंदोलनात अरुणा असफ अली यांची भूमिका फारच महत्वाची ठरते. त्याकाळी अरुणाबाई भूमिगत होऊन वावरत होत्या आणि सदर आंदोलनात त्यांनी देशातील तरुणांना एकत्र करत आंदोलनाचा भाग बनवलं होतं. एवढंच नाही तर अरुणाबाईंनी या आंदोलनात गोवालिया टँक मैदानावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचे धाडस केलं होतं. अरुणा असफ अली यांच्या धाडसी स्वभावामुळे आजही ग्रँड ओल्ड लेडी म्हणत त्याच्या कार्याचा गौरव केला जातो.
भारतमातेला परकीयांच्या जुलुमापासून मुक्त करण्यासाठी उठलेल्या लाटेला रोखणं इंग्रजांसाठी कठीण झालं होतं आणि म्हणूनच चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘9 ऑगस्ट’ हा ‘ क्रांती दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
याच भारत छोडो आंदोलनाची सुरुवात गोवालिया टॅंक येथे भाषण देऊन करण्यात आली असल्याने आजतागायत या मैदानाचे महत्व कायम आहे. स्वातंत्र्य लढ्यासाठी देशाला आवाहन करणारे महात्मा गांधी आणि इतर नेते 8 आणि 9 आॉगस्ट 1942 रोजी गोवालिया मैदानात एकत्र जमले होते. आज या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या मैदानावर स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे.