आर्थिक स्थिरतेच्या दिशेने वाटचाल करत असताना, गुंतवणुकीच्या योजनांचे प्रभावी नियोजन अत्यंत आवश्यक आहे. यासाठी एक लोकप्रिय आणि प्रभावी पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजेच एक प्रकाराची गुंतवणूक योजना आहे जी विविध प्रकारच्या संपत्तीत गुंतवणूक करून आपल्याला विविध फायदे देऊ शकते.
अनेक नवशिक्या तरुणांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असते, पण माहितीच्या अभावी ते याकडे दुर्लक्ष करतात. हे लक्षात घेता, नवीन गुंतवणूकदारांसाठी, जे या क्षेत्रात नवे आहेत किंवा योग्य माहितीच्या अभावामुळे गुंतवणूक सुरू करत नाहीत, त्यांना म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते कसे काम करते, म्युच्युअल फंडच्या कार्यपद्धती, विविध प्रकार आणि गुंतवणूक करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी याची सविस्तर माहिती देणारा आजचा हा लेख आहे.
आता, आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते कसे काम करते आणि आपल्या गुंतवणूक धोरणात ते कसे समाविष्ट करावे याबद्दल सखोल चर्चा करूया.
म्युच्युअल फंड्स म्हणजे काय ?
परस्पर निधी म्हणजेचं म्युच्युअल फंड गुंतवणुकीचं असं साधन आहे, जिथे अनेक लोक आपली थोडीथोडी रक्कम एकत्र करतात. ही एकत्रित रक्कम तज्ञ फंड व्यवस्थापक विविध ठिकाणी, जसं की शेअर्स, बॉण्ड्स किंवा इतर गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवतात. प्रत्येक गुंतवणूकदाराला या फंडाच्या युनिट्स मिळतात, म्हणजे त्या गुंतवणुकीत त्यांचा हिस्सा असतो, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे थोड्या पैशात अनेक ठिकाणी गुंतवणूक करता येणे , ज्यामुळे जोखीम कमी होते आणि आपल्याला विविध प्रकारच्या गुंतवणुकीचा फायदा मिळतो.
उदाहरणार्थ, एक व्यक्ती मोठ्या कंपनीचे शेअर्स थेट खरेदी करू शकत नसेल, तरी म्युच्युअल फंडाद्वारे त्याच कंपनीचे शेअर्स किंवा इतर मालमत्ता अप्रत्यक्षरित्या खरेदी करू शकतो. अशा प्रकारे, म्युच्युअल फंडांमुळे छोट्या गुंतवणूकदारांनाही मोठ्या आणि विविध गुंतवणुकीत सहभाग घेता येतो.
म्युच्युअल फंड्सचे प्रकार
म्युच्युअल फंड्सचे अनेक प्रकार आहेत, जे गुंतवणूकदारांच्या गरजा, जोखमीची तयारी, आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार निवडले जाऊ शकतात.
१) इक्विटी (समभाग) फंड्स:
हे फंड्स पूर्णपणे शेअर बाजारात गुंतवणूक केले जातात. इक्विटी फंड्सचा उद्देश जास्त परतावा मिळवणे असतो, पण त्यासाठी जोखीम देखील अधिक असते. शेअर बाजारातील चढउतारामुळे इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी दीर्घकालीन विचार गरजेचा असतो. जे गुंतवणूकदार जोखीम पत्करू शकतात, त्यांच्यासाठी इक्विटी फंड्स फायदेशीर ठरतात.
२) डेट (कर्जरोखे) फंड्स:
डेट फंड्समध्ये मुख्यत्वे बॉण्ड्स, सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. या फंड्समधून स्थिर आणि कमी जोखीम असलेला परतावा मिळतो. जे गुंतवणूकदार कमी जोखीम आणि स्थिर उत्पन्नाची अपेक्षा करतात, ते डेट फंड्सची निवड करतात.
३) हायब्रिड फंड्स:
हे फंड्स इक्विटी आणि डेट अशा दोन्ही प्रकारांच्या गुंतवणुकीत गुंतवलेले असतात. यामध्ये जोखीम आणि परतावा यांचा संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो. गुंतवणूकदारांना विविधतेचा फायदा आणि स्थिर उत्पन्नाची शक्यता असते.
४) इंडेक्स फंड्स:
इंडेक्स फंड्स हे बाजारातील विशिष्ट निर्देशांकाचे (जसे की निफ्टी ५०, सेंसेक्स) अनुसरण करतात. त्यामुळे, हे फंड्स कमी खर्चात आणि कमी जोखीमेत गुंतवणूक करण्यासाठी योग्य असतात. या फंड्समधील परतावा बाजाराच्या सरासरीच्या जवळपास असतो
५) लिक्विड फंड:
लिक्विड फंड म्हणजे अत्यंत कमी जोखीम असलेला म्युच्युअल फंड, जो मुख्यतः अल्पकालीन कर्जाच्या साधनांमध्ये गुंतवणूक करतो, जसे की शॉर्ट-टर्म सरकारी सिक्युरिटीज, कॉर्पोरेट पेपर्स इत्यादी. याचा मुख्य लाभ म्हणजे पैशांची जलद उपलब्धता. म्हणजेच, तुम्ही या फंडात गुंतवणूक केल्यावर, तुम्हाला आपले पैसे तात्काळ आणि सहजपणे मिळवता येतात. लिक्विड फंडांचा व्याजदर साधारणतः कमी असतो, परंतु त्यांच्या स्थिरतेमुळे आणि लवचिकतेमुळे हे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जातात.
म्युच्युअल फंड्स कसे काम करतात?
म्युच्युअल फंड्सचे व्यवस्थापन तज्ज्ञ फंड व्यवस्थापकांकडून केले जाते. गुंतवणूकदारांची रक्कम विविध प्रकारच्या गुंतवणुकांमध्ये गुंतवली जाते, जसे की शेअर्स, बॉण्ड्स, सरकारी रोख्यांमध्ये. फंड व्यवस्थापक बाजाराचे संशोधन करून योग्य मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. म्युच्युअल फंड्सचा मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना उच्च परतावा मिळवून देणे, जो बाजाराच्या वाढत्या परिस्थितीवर अवलंबून असतो.
प्रत्येक गुंतवणूकदाराच्या हिशोबाने फंड युनिट्स दिल्या जातात. युनिट्सची किंमत रोजच्या बाजार किमतींवर आधारित बदलत असते, ज्याला NAV ( Net Asset Value) म्हणतात. फंड व्यवस्थापकांनी केलेल्या गुंतवणुकीतून जे उत्पन्न होते, ते सर्व गुंतवणूकदारांमध्ये वाटले जाते.
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीसाठी दोन मुख्य पर्याय आहेत: SIP आणि लंप सम
१) SIP (Systematic Investment Plan): SIP म्हणजे दर महिन्याला किंवा ठराविक काळानुसार एकच रक्कम गुंतवणे. SIP चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बाजाराच्या चढउतारांपासून बचाव होतो. SIP ने दीर्घकाळात चांगले परतावा मिळण्याची शक्यता असते.
SIP कधी करावी?
- जेव्हा तुमच्याकडे दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवण्यासाठी उपलब्ध असेल.
- बाजारातील जोखमीचे व्यवस्थापन करत दीर्घकालीन गुंतवणूक करायची असल्यास.
- बाजारातील तात्पुरत्या चढउतारांमुळे चिंताग्रस्त न होता, दीर्घकाळात जास्त परतावा मिळवण्यासाठी.
२) लंप सम (Lump Sum Investment):
म्हणजे एकाच वेळी मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे. यामध्ये, गुंतवणूकदार संपूर्ण निधीला एकाच टप्यात गुंतवून टाकतो. यात एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे त्या निधीवर नंतर मोठा लाभ मिळवता येऊ शकतो.
लंप सम कधी करावे?
जेव्हा आपल्याकडे मोठी रक्कम उपलब्ध असते, जसे की आपला वारसाहक्क, एखादा मिळालेला बोनस इ. तेव्हा लंप सम एक योग्य पर्याय असू शकतो. यात बाजारपेठ स्थिर किंवा वरती जात असताना गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी, जसे की निवृत्तीवेतन, उच्च शिक्षण, किंवा मोठ्या कामासाठी एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणे उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे, लंप सम गुंतवणूक करताना आपली आर्थिक स्थिती, बाजाराची परिस्थिती आणि गुंतवणुकीच्या उद्दिष्टांचा विचार करणे आवश्यक आहे.
योग्य म्युच्युअल फंड कसा निवडावा?
म्युच्युअल फंड निवडताना काही महत्त्वाचे घटक लक्षात घेतले पाहिजेत
गुंतवणुकीचा उद्देश ठरवा:
तुम्ही गुंतवणूक का करत आहात हे ठरवणे महत्त्वाचे आहे. निवृत्ती योजना, मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा घर खरेदी अशा दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी इक्विटी फंड्स योग्य ठरतात
जोखीम पचवण्याची तयारी :
तुमची जोखीम पचवण्याची कितपत तयारी आहे यावर तुमचा फंड निवडला जाऊ शकतो. जर तुमची जोखीम घ्यायची तय्यारी असेल आणि दीर्घकालीन परताव्याची अपेक्षा असेल, तर इक्विटी फंड्स चांगले ठरू शकतात. परंतु कमी जोखीम सहन करू शकणारे गुंतवणूकदार डेट फंड्स किंवा हायब्रिड फंड्स निवडू शकतात.
फंडची मागील कामगिरी पहा:
फंड निवडताना त्याची मागील काही वर्षांतील कामगिरी तपासा. फंडने कसा परतावा दिला आहे, बाजाराच्या चढउतारांना कसा प्रतिसाद दिला आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, फक्त मागील कामगिरीच नाही, तर त्याचे सध्याचे व्यवस्थापन, त्याचे धोरण, आणि फंड व्यवस्थापकांचा अनुभव देखील विचारात घ्या.
खर्च अनुपात (Expense Ratio):
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना, फंडाच्या खर्च अनुपातावर (Expense Ratio) लक्ष द्या. हा फंड व्यवस्थापनासाठी घेतलेला खर्च असतो. कमी खर्च अनुपात असलेले फंड्स गुंतवणूकदारांसाठी जास्त फायद्याचे ठरतात, कारण कमी खर्चामुळे जास्त परतावा मिळू शकतो.
थोडक्यात, तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांनुसार अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य म्युच्युअल फंड निवडणे महत्त्वाचे आहे. अल्पकालीन ध्येयांसाठी लिक्विड फंड्स किंवा डेट फंड्स उपयुक्त ठरू शकतात, तर दीर्घकालीन ध्येयांसाठी इक्विटी फंड्स उत्तम असतात.
आणखी वाचा:
- अजूनही वेळ गेली नाही! यशाची चव चाखायची असेल, तर वॉरेन बफेंचे ‘हे’ 5 नियम कधीच विसरू नका
- कॅश क्रंचमुळे तुमचा व्यवसाय संपतोय का?
- Wedding Insurance I लग्नाचाही काढता येतो इन्शुरन्स, लग्न लांबणीवर पडल्यास पैसे परत