What is a Franchise Model? | फ्रँचायझी मॉडेल म्हणजे काय?
फ्रँचायझी ही काही नवीन संकल्पना नाही. खरंतर ही मध्ययुगीन काळापासून चालत आलेली delivery system आहे. जुन्या काळात जमिनीचे मालक त्यांची जमीन शेतकऱ्यांना किंवा मजुरांना शिकारीसाठी, शेतीसाठी किंवा गुरे चरण्यासाठी देत असत. त्यासाठी काही अटी व नियम घालून दिलेले असत. आधुनिक फ्रँचायझिंगची सुरुवात १७३१ साली बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस व्हाईटमार्श यांच्यातील प्रिंटिंग सेवांसाठी झालेल्या फ्रँचायझीच्या डीलने झाल्याचे मानण्यात येते.
आज हजारो उद्योगांत आणि क्षेत्रांत लाखो फ्रँचायझी काम करत आहेत. फ्रँचायझी या क्षेत्राने आजवर कोट्यावधी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि अब्जावधी डॉलर्सची उलाढाल या क्षेत्रात होत आहे. या क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेला मजबुती मिळाली असून financial stability च्या शोधात असणाऱ्यांसाठी किफायतशीर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पण फ्रँचायझी म्हणजे नक्की काय? फ्रँचायझीचे काय प्रकार आहेत? ही व्यवस्था कशी चालते?
फ्रँचायझी हा व्यवसायाचा असा प्रकार आहे, ज्यात एक व्यक्ती म्हणजेच फ्रँचायझी; फ्रँचायझरचे ब्रॅंडिंग, ट्रेडमार्क आणि बिझनेस मॉडेल वापरून व्यवसाय चालवत असतो. या प्रकारामध्ये फ्रँचायझी आणि फ्रँचायझर यांच्यात कायदेशीर आणि व्यावसायिक करार झालेला असतो. म्हणजेच फ्रँचायझीला फ्रँचायझरचे नाव आणि इतर व्यवस्था वापरण्याची रीतसर परवानगी मिळालेली असते.
फ्रँचायझरचे बिझनेस मॉडेल वापरण्याच्या म्हणजेच वस्तू विकण्याच्या किंवा सेवा प्रदान करण्याच्या तसेच training, guidance या गोष्टींच्या बदल्यात फ्रँचायझरला फ्रँचायझी फी द्यावी लागते. फ्रँचायझीला ठरवून दिलेल्या अटी व नियम मान्य असल्याच्या करारावर स्वाक्षऱ्या कराव्या लागतात. प्रत्येक फ्रँचायझी ही कंपनीची एक स्वतंत्र शाखा म्हणून काम करते.
आता पाहूया फ्रँचायझर आणि फ्रँचायझी यांच्यातील संबंध
फ्रँचायझर म्हणजे मूळ कंपनी जी आपल्या कंपनीच्या वस्तू किंवा सेवा विकण्याचे अधिकार प्रदान करते. फ्रँचायझरने स्वतःचा व्यवसाय, ब्रँड आणि त्याची कार्यप्रणाली विकसित केलेली असते. फ्रँचायझी देण्याचे निश्चित झाल्यावर फ्रँचायझर त्यांच्या कंपनीचे बिझनेस मॉडेल वापरण्याचे अधिकार समोरच्याला देतात.
तर फ्रँचायझी म्हणजे अशी व्यक्ती जी आधी नमूद केलेल्या वस्तू किंवा सेवा विकण्याचे अधिकार विकत घेते. जरी फ्रँचायझी आधीच चांगल्या प्रकारे चालू असलेला व्यवसाय विकत घेत असतील, तरीसुद्धा मार्केटमध्ये विश्वास संपादन करण्यासाठी, हुशार माणसे निवडण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली पाहिजे. फ्रँचायझी/फ्रँचायझर यांचे संबंध परस्पर आदर, समजूतदारपणा, सहकार्य यांवर आधारित असले पाहिजेत, कारण त्यातच दोघांचाही फायदा आहे.
फ्रँचायझीला फ्रँचायझरकडून कोणत्या गोष्टी मिळतात
१) फ्रँचायझी डिस्क्लोजर डॉक्युमेंट (FDD)
जेव्हा फ्रँचायझी विकत घेण्यासाठी आपण उत्सुकता दर्शवतो, तेव्हा फ्रँचायझर त्यांचे ‘फ्रँचायझी डिस्क्लोजर डॉक्युमेंट’ (FDD) आपल्यासमोर ठेवतात. व्यवसायाची एकूण उलाढाल, कर्ज, उत्त्पन्न, वेगवेगळे शुल्क, फ्रँचायझीच्या जबाबदाऱ्या यांची विस्तृत माहिती FDD मध्ये नमूद केलेली असते.
२) Financing options
उत्सुक आणि प्रामाणिक व्यक्तींना काही फ्रँचायझर वित्तपुरवठ्याचे पर्याय उपलब्ध करून देतात. जसे की, कर्ज मिळवण्यास मदत करणे किंवा पैसे भरण्याचे सुलभ पर्याय उपलब्ध करून देणे.
३) Training and operational guidance
फ्रँचायझरकडून फ्रँचायझीला एक मॅन्युअल सुद्धा मिळते, ज्यामध्ये संपूर्ण काम कसे चालते याबाबत माहिती दिलेली असते. तसेच व्यक्तिशः किंवा ऑनलाईन प्रशिक्षणसुद्धा अनेक फ्रँचायझर देतात. मॅन्युअलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, गुणवत्ता मानके, व्यवस्थापन प्रणाली, त्यांची जबाबदारी आणि इतर बारीकसारीक तपशील असतो. Training हे कंपनीच्या main office मध्ये, personally, online पद्धतीनेसुद्धा दिले जाते.
४) Marketing & Advertising
फ्रँचायझरने फ्रँचायझीला मार्केटिंग बाबतसुद्धा सहकार्य प्रदान करणे अपेक्षित आहे. मग ते टीव्हीच्या, रेडिओच्या माध्यमातून असो किंवा सोशल मिडिया आणि ईमेलच्या माध्यमातून. सहसा फ्रँचायझर फ्रँचायझीकडून यासाठी लागणारा खर्च वसूल करतात.
५) Cooperation म्हणजेच सहकार्य
फ्रँचायझीने व्यवसायात प्रवेश केला आणि दैनंदिन कामकाज सुरु झाले की, रोज अनेक नवीन प्रश्न, समस्या समोर येत जातात. फ्रँचायझरने कराराची मुदत संपेपर्यंत या समस्या सोडवण्यासाठी फ्रँचायझीला सहकार्य करणे अभिप्रेत आहे. तसेच फ्रँचायझीसुद्धा इतर सहकारी फ्रँचायझींशी संपर्क साधू शकतात. त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकतात.
आता वळूया फ्रँचायझींच्या प्रकारांकडे
फ्रँचायझी बिझनेस मॉडेलचे (Franchise Model) दोन प्रकार आहेत. प्रोडक्ट डिस्ट्रिब्युशन फ्रँचायझी मॉडेल आणि बिझनेस फॉरमॅट फ्रँचायझी मॉडेल
१) प्रोडक्ट डिस्ट्रिब्युशन फ्रँचायझी मॉडेल (Franchise Model)
या प्रकारात फ्रँचायझर वस्तू बनवतो आणि फ्रँचायझी ती विकतो. थोडाफार फरक सोडल्यास हा प्रकार सप्लायर-डीलर सारखाच आहे. यातील महत्त्वाचा फरक म्हणजे फ्रँचायझी प्रकारात फ्रँचायझीला फक्त त्याच ब्रँडच्या किंवा उत्पादनाशी निगडित वस्तू विकता येतात, तर सप्लायर डीलर प्रकारात डीलर इतर ब्रँडची उत्पादने सुद्धा विकू शकतो.
२) बिझनेस फॉरमॅट फ्रँचायझी मॉडेल (Franchise Model)
हा बहुतांशी वापरला जाणारा प्रकार आहे. यात फ्रँचायझी फ्रँचायझरचे नाव आणि पद्धत वापरून उत्पादने बनवू शकतो आणि त्याच नावाने विकू शकतो. उदाहरणे – केएफसी, मॉन्जिनीस, डॉमिनोज पिझ्झा, इत्यादी.
तर आजचा लेख तुम्हाला फ्रँचायझी मॉडेल म्हणजे नक्की काय, फ्रँचायझर आणि फ्रँचायझी म्हणजे काय त्यांच्यातील संबंध कसा आहे आणि फ्रेंचायझिचे नेमके प्रकार कोणकोणते आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील. असेच काही interesting लेख वाचण्यासाठी नवी अर्थक्रांतीच्या you tube चॅनलला आताच subscribe करा.
आणखी वाचा