लेखमालिकाशिकण्यासाठी सारे काही

३. शिकण्याच्या पध्दती

या दोन शिक्षण पध्दतीतील उपयुक्त शिक्षण पध्दती कोणती? आपल्याला कोणत्या शिक्षणपध्दतीचा फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. पूर्वापार चालत आलेल्या गुरुकूल शिक्षणपध्दतीत जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात टिकून राहण्याची कला प्राप्त होत असे. अनेक जीवनदायी तत्त्वे त्यातून मिळत असत. सामाजिक जीवनातील दुर्बल व्यक्तित्वाचा अभाव नष्ट करुन चांगला माणूस घडवण्याचे काम या गुरुकूल पध्दती मध्ये केले जात असे. चारित्र्यवान किंवा शीलवान नागरिक गुरुकूल शिक्षणपध्दतीचे फलित होत. शतकानुशतके चालत आलेली ही शिक्षणपध्दती इंग्रजांच्या राजवटीत नामशेष झाली. माणसातील जगण्याची उमेद कमी करणारी नवी शिक्षणपध्दती आपण स्वीकारली. त्यातून उत्तम नोकरदार लोक निर्माण होऊ लागले. नेतृत्वक्षमता लोप पावू लागली, उद्योजकतेचा ऱ्हास होत गेला. (एका आकडेवारीवरुन १७ व्या शतकापर्यंत जगातील एकूण व्यापारी उलाढालीत भारतीयांचा वाटा हा २२ टक्के होता. तो आजघडीला २ ते २.५ टक्क्यापर्यंत घसरला आहे.) अलिकडे जे उद्योजक अथवा नेते तयार झाले त्यात त्यांच्या कर्तृत्वाचा वाटा मोठा आहे. शिक्षणपध्दतीचा वाटा तुलनेने लहान आहे. 

गुरुकूल पध्दती अतिशय चांगली शिक्षण पध्दती होती. तिचे गुणगान करण्याची मानसिकता खूप लोकांमध्ये आहे. मात्र ती आजच्या काळात वापरात आणणे शक्य आहे का? याचा विचार करणे सुध्दा गरजेचे आहे. तर या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक मिळण्याची शक्यता जास्त आहे. चांगली पध्दती राबवता येणे शक्य नाही. आहे ती शिक्षणपध्दती जीवनसंग्रामाला लायक बनवू शकत नाही. तर यावर तोडगा काय? असा प्रश्न निश्चितच पडतो. या प्रश्नाचे उत्तर प्राप्त झालेच पाहिजे. या लेखमालिकेतून ते दिले जाईल.

शिकण्याचा कल लक्षात न घेता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना एकाच पध्दतीचे शिक्षण दिले जाते. हा प्रकार म्हणजे वेळ, अंतर, वस्तुमान अशा अनेक गोष्टी एकाच परिमाणात तोलण्यासारखे आहे. वेळ मोजण्यासाठी तास-मिनिटे-सेकंद, अंतर मोजण्यासाठी मीटर-सेमी-फूट-इंच-किमी तर वस्तुमान मोजण्यासाठी ग्रॅम-तोळा-किलो-टन अशी वेगवेगळी परिमाणे वापरणे गरजेचे आहे. तसे विद्यार्थ्याच्या किंवा स्वतःच्या (स्वतःसाठी ही लेखमालिका वाचणाऱ्या वाचकांसाठी) अभ्यासाच्या पध्दती जाणून घेऊन शिकवणे गरजेचे आहे. ज्याच्या अंगी जी उपजत कौशल्य आहेत त्यात प्राविण्य मिळवण्यास संधी देणे त्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button