2 Rupee Doctor: २ रुपयांच्या डॉक्टरांची प्रेरणादायी कहाणी


2 Rupee Doctor: एका यंत्रवत होत चाललेल्या समाजात, जिथे आरोग्यसेवा ही केवळ नफा मिळवण्याचे साधन झाली आहे, अशा काळात माणुसकीच्या मूल्यांची मशाल उंचावणारा एक देवमाणूस म्हणजे डॉक्टर. ए. के. रायरू गोपाल. (Dr. A.K. Rairu Gopal) त्यांची समाजसेवेची प्रेरणादायी गाथा आज आपण या लेखातून जाणून घेऊया.
प्रारंभिक जीवन
डॉक्टर गोपाल यांचा जन्म केरळ मध्ये झाला. लहानपणापासूनच अत्यंत हुशार. त्यांना समाजसेवेची आवड. हीच समाजसेवेची तळमळ त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेताना आणि डॉक्टर झाल्यावरही टिकवून ठेवली. डॉक्टर म्हणून त्यांनी केवळ व्यवसाय नाही, तर सेवा हेच ध्येय ठेवले. कदाचित आपल्या जन्माचे प्रयोजन काय ? हे त्यांनी आधीच ओळखले असावे !
सेवा हीच पूजा
डॉ. गोपाल यांचं जीवन म्हणजे केवळ वैद्यकीय सेवा नव्हे, तर मानवतेचा मंत्र जपणारी एक अविरत तपश्चर्या होती. त्यांच्या क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांकडून त्यांनी केवळ २ रुपये घेतले. ज्यांच्याकडे तेही नव्हते, त्यांना मोफत औषधं दिली. आर्थिक गणितांपलीकडे जाऊन त्यांनी माणूस म्हणून माणसाची सेवा केली.
डॉक्टर गोपाल म्हणायचे, “आजारी माणसाच्या चेहऱ्यावरचा त्रास कमी करणं हेच माझं खरं समाधान आहे.”
घर म्हणजे दवाखाना, दवाखाना म्हणजे घर
त्यांचं क्लिनिक कोणतंही आलिशान ठिकाण नव्हतं. त्यांच्या स्वतःच्या घरातील एक खोली तीच रुग्णांसाठी आश्रयस्थान होती. पहाटे ४ वाजल्यापासून ते दुपारी ४ पर्यंत तिथं उपचार करायचे. एखाद्या हॉस्पिटलच्या शिस्तबद्ध वेळा नव्हत्या, पण त्यांचा शिस्तबद्ध माणुसकीचा तास चालूच असायचा. शेकडो रुग्ण दररोज त्यांच्याकडे उपचारासाठी यायचे.
त्यांनी ५० वर्षांच्या कारकीर्दीत १८ लाखांहून अधिक रुग्णांची सेवा केली.त्यांची सेवा वृत्ती असंख्य रुग्णांसाठी आधार होती. लोक त्यांच्या जवळ औषधासाठीच नाही, तर प्रेमासाठी जात होते. त्यांच्या या सेवाभावी कर्तृत्वामुळे लोकांनी त्यांचे नाव आदराने घेतलं, “दोन रुपयांचा डॉक्टर”.
डॉ. गोपाल यांच्यासारखी माणसं आपल्याला माणुसकीवर विश्वास ठेवायला शिकवतात. आयुष्यभर प्रसिद्धीची किंवा कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता डॉक्टर गोपाल यांनी रुग्णसेवा केली. समाजाचा खरा आदर्श कोण असावा याचं उत्तर त्यांनी त्यांच्या कृतिशील जीवनाने दिलं.
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ” देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो. ” त्यांच्या या उक्तीला परिपूर्णता दिली ती डॉक्टर गोपाळ लक्ष्मी यांच्या कार्याने !
डॉक्टर गोपाल म्हणजे समाजाप्रती समर्पणाचे प्रतीक!
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता



