उद्योजकता विजडमप्रेरणादायी

सुखी व यशस्वी आयुष्याचे तीन स्तंभ

जन्म आणि मृत्यू या दोन घटनांमधील प्रवास म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवनात सुखी व यशस्वी होणं हे लक्ष्य असतं व प्रत्येकजण त्यासाठी धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. जीवनात यशस्वी असणं व सुखी असणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत.

सुखी असण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात, मग मनुष्य श्रीमंत असो वा गरीब. उदा. आज पैशाला खूप महत्त्व आले आहे. असे म्हणतात की ज्याच्याजवळ पैसा आहे तोच सुखी, परंतु तुम्ही खेड्यापाड्यात जा, गरीब शेतकरी, किंवा जंगलात राहणारा आदिवासी पहा तो देखील आपल्या आयुष्यात सुखी आहे. त्यामुळे प्रत्येकाची आपापली सुखाची व्याख्या व दृष्टिकोन वेगळे असतात. तर यशाची परिभाषा ही समाजाच्या दृष्टीने वेगळी असते, ज्याने स्वत:च्या आयुष्यातील ध्येय प्राप्त केलं, तोच खरा यशस्वी असतो. ध्येयप्राप्ती म्हणजेच यशाचा मार्ग हा थोडा खडतर असतो, परंतु समाजात असे अनेकजण आहेत की, ज्यांनी जीवनात खूप यश मिळवले. जर ते यशस्वी होऊ शकतात तर आपणही होऊ शकतो, तर जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचे कोणते तीन प्रमुख स्तंभ असतात ते आजच्या video मध्ये आपण पाहूया.

१) Health (आरोग्य) : “Health is Wealth” हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण आपण खरंच त्याकडे किती लक्ष दिलंय? आम्हाला सांगू नका, तुमचं तुम्हाला माहिती आहेच! जर तुम्ही शारीरिक, मानसिक व बौध्दिकदृष्ट्या सुदृढ असाल, तर तुम्हाला सर्व काही मिळतं, परंतु जर तुम्ही सतत आजारी पडत असाल, विविध विकारांनी ग्रस्त असाल, डॉक्टर आणि महागड्या उपचार पध्दतींच्या अधीन झालेले असाल तर जीवनातील आनंद हरवून गेलेला असतो, जीवन नीरस झालेले असते. जर उत्तम आरोग्य असेल, तरंच तुम्ही आयुष्यातील इतर गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता. “You can’t enjoy wealth, if you are not good in health.

२) Wealth (संपत्ती) : जीवनात सुखी व यशस्वी होण्यासाठी जीवनाचा दुसरा प्रमुख स्तंभ म्हणजे संपत्ती. पैसा, संपत्ती तुम्हाला आदर देते आणि प्रतिकूलतेशी लढण्यास सक्षम बनवते. आर्थिक साक्षरता व आर्थिक स्वातंत्र्य असणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आज पैसा असेल, तरच आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात व आपल्या इच्छेनुरूप जीवन जगता येते. चांगल्या आर्थिक स्थितीसाठी तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करावे लागेल. वाईट दिवसांसाठी नेहमी पैसे वाचवा करा. गरिबीत तुमच्यासोबत कोणीही नसेल, तेव्हा हा पैसा तुम्हाला उपयोगी पडेल. म्हणून सुखी व समाधानी जीवनासाठी तुमच्याकडे आरोग्यासोबतच संपत्ती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे.

३) Relationships (संबंध) : तुमच्याकडे उत्तम आरोग्य व खूप संपत्ती आहे, परंतु तुमचे इतरांशी संबंध चांगले नसतील, तर तुम्हाला समाधान, सुख, यश मिळणे कठीण असते. इतरांशी चांगले संबंध आपले जीवन समृध्द करण्यात मोठी मदत करतात. ते आपल्याला आपलं जीवन आनंदी करण्यात मदत करतात; जीवनात कठीण प्रसंग आल्यास मनावरचे ओझे कमी करतात, मन हलके होते आणि आपले जीवन आनंददायी होते. विशेषतः सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या यशस्वी लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करणे अत्यंत शहाणपणाचे असते, कारण त्यांच्याकडून बरेच काही शिकता येते. त्यांच्या सहवासामुळे सकारात्मक दृष्टिकोन अवलंबता येतो. त्यामुळे पैसा, आरोग्य यासोबतच इतरांशी चांगले संबंध असणे अत्यंत महत्त्वाचे असते. Self centric किंवा egoistic माणसे कधीच आयुष्यात पुढे जात नसतात. याबाबतीत एक मस्त शेर आहे की, “किसीने पूछा हमें उम्र और जिंदगी में क्या फर्क है? तो हमने यूँ जवाब दिया की, जो अपनों के बिना बीती वो “उम्र” और जो अपनों के साथ बीती वो “ज़िन्दगी”

४) आपण काय करावे? : आयुष्यात सुखी होण्यासाठी, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, यश संपादन करण्यासाठी आयुष्यात उत्तम आरोग्य, संपत्ती कमावण्याचा व आपले नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील तसेच आपल्या क्षेत्रातील चांगल्या लोकांशी चांगले संबध प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. तसेच जीवनात शिस्त आणि चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. व्यायाम आणि आध्यात्माला महत्व दिले पाहिजे. तरुण वयात कशाला पाहिजे अध्यात्म वगैरे सारखे प्रश्न विचारणाऱ्यांपासून जरा लांबच राहिलं पाहिजे. जर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडलेले असेल, तर आपल्याकडे आपल्या संपत्तीवर लक्ष केंद्रित करण्याची शारीरिक क्षमता शिल्लक राहत नाही. परिणामी, आपले नातेसंबंध बिघडतात. जर आपण चांगले नातेसंबंध टिकवण्यात अपयशी ठरलात, तर आपली मानसिक स्थिती, आरोग्यावर आणि परिणामी आपल्या श्रीमंतीवर वाईट परिणाम होतो. ज्याच्या आयुष्यात चांगले आरोग्य नाही त्याला शारीरिक आणि मानसिक रोग होतात; ज्याच्या आयुष्यात संपत्ती नाही त्याला दारिद्र्य आणि गरिबीचा रोग होतो आणि ज्याच्या आयुष्यात स्वतःची म्हणावी अशी चांगली माणसे नाहीत, त्याला एकलकोंडेपणाचा रोग होतो आणि त्यातच आयुष्य संपून जाते. त्यामुळं आयुष्यातल्या या तीन महत्त्वाच्या स्तंभांना कसं मजबूत बनवता येईल याचा आत्तापासूनच विचार करायला सुरुवात करा.

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button