विज्ञान आणि तंत्रज्ञानविज्ञानविश्व

१००० पेक्षा जास्त पेटंट मिळवणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांची आज जयंती… विनम्र अभिवादन

१८८९ साली पॅरिसमधे एका विशाल आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या दोनपैकी एका पूर्ण भागात फक्त एकाच माणसाच्या संशोधनाने मंडप व्यापून टाकला होता ती थोर व्यक्ती म्हणजे, ‘थॉमस अल्वा एडिसन’. या वैज्ञानिकाला पॅरिसला सादर आमंत्रित केले होते आणि त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ११ फेब्रुवारी १८४७ हा जन्मदिवस आहे त्याचा….

वयाच्या १० व्या वर्षीच एडिसनने घरातील कोठारात एक प्रयोगशाळा थाटली. पैसे कमी पडू लागले म्हणून याने ग्रँड ट्रंक रेल्वेच्या धावणार्‍या आगगाडीत वर्तमानपत्र व चॉकलेट विकावयास सुरुवात केली. एके दिवशी धावपळीत आगगाडी सुटली. गाडी पकडण्याच्या प्रयत्न असलेल्या एडिसनच्या दोन्ही हातात वस्तू होत्या, म्हणून एका सहप्रवाशाने त्याचा एक कान धरून त्याला गाडीत ओढले. या धडपडीत त्याचा एक कान निकामी झाला. पण याच एका वर्षाच्या कालावधीत एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत एक सर्वसाधारण टेलिग्राफ मशीन निर्माण करण्यात यश संपादन केलं होतं.

१८६२ मधे एडिसनला एक लहान मुलगा रुळावर खेळताना आढळला. आपला जीव धोक्यात घालून एडिसनने त्याला वाचवले. त्यामुळे स्टेशनमास्तर असलेले त्या मुलाचे वडील खुश झाले आणि बक्षीस म्हणून त्यांनी एडिसनला टेलिग्राफी शिकविली. १८६८ उजाडताच एडिसनने आपले पहिले टेलिग्राफ तयार करून आपले पहिले पेटेंट मिळविले. आपलं टेलिग्राफ उपकरण त्याने एक्सचेंजच्या अध्यक्षाला या अपेक्षेने विकले की, त्याला २,००० डॉलर तरी मिळतील. एक्सचेंजच्या अध्यक्षाला ते टेलिग्राफमशीन इतके भावले की, त्यांनी एडिसनला या टेलिग्राफ मशीनचे ४०,००० डॉलर दिले. ही घटना एडिसनला एका निर्णायक दिशेने घेऊन जाण्यात कारणीभूत ठरली.

बॅटरी तयार करण्याच्या प्रयत्नात त्याचे ८००० प्रयोग फसले. एकाने त्यांना म्हटले ‘‘विनाकारण वेळ गेला हे ८००० प्रयोग करण्यात!’’ एडिसनने उत्तर दिले, ‘‘अरे मला ८००० शोध लागलेत की या पदार्थांच्या संयोगाने चांगली बॅटरी बनू शकत नाही.’’ याला म्हणतात शोधकर्ता!

कधी कधी महान शास्त्रज्ञसुद्धा अगदी बालिशपणे वागतात. कोणे एकेकाळी दिलीपकुमार श्रेष्ठ की अभिताभ बच्चन श्रेष्ठ,असा वाद त्यांच्या चाहत्यांमध्ये होत असे. हा वाद तसा आजही सुरू आहे. पण त्यात आणखी दोन-चार अभिनेत्यांच्या नावांची भर पडलेली आहे. एडिसन व टेस्ला यांच्या चाहत्यांतसुद्धा हा अशा प्रकारचा वाद आजही सुरू आहे. कोण मोठा शास्त्रज्ञ आहे? एडिसन डायरेक्ट करंट (DC)चा खंदा समर्थक. परंतु टेस्ला अल्टर्नेट करंट (AC) तंत्रज्ञानावर दृढ विश्वास असणारा (आणि टेस्लाचच बरोबर होतं!).

एडिसन व टेस्ला यांच्यात फार मोठी कटुता निर्माण झाली होती. एडिसन हे ‘व्यावहारिक’ शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधनाचा सारा कल या एकाच गोष्टीवर अवलंबून होता. ज्या शोधाचा उपयोग सर्वसामान्यांच्या मदतीसाठी होत नसेल व त्यातून कोणतीही अर्थप्राप्ती होत नसेल तर त्या शोधाकडे ते ढुंकूनही पाहत नसत. याच कारणास्तव ते शास्त्रज्ञ-व्यापारी किंवा धंदेवाईक शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत. आपल्या कार्याची व्याप्ती वाढण्यासाठी व नवनवीन संशोधनाचे पेटंट मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या पदरी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांची फार मोठी फौज जमा केली होती. हे सारे वेगवेगळय़ा प्रश्नांवर काम करत राहायचे व एखादा शोध लागला की, त्याचं पेटंट एडिसन यांच्या नावावर जमा व्हायचं.

टेस्ला यांची ही विद्युत प्रणाली अधिक लोकप्रिय झाली तर त्यांना त्यांच्या एक दिशा विद्युत पद्धतीचा गाशा गुंडाळावा लागेल याची एडिसनना मनोमन खात्री पटली. त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याकारणानं टेस्ला यांची पद्धत कशी व किती धोकादायक आहे व या प्रणालीचा त्रास कशाप्रकारे होऊ शकेल हे दाखवून व पटवून देण्यासाठी त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी मुक्या जीवांना व प्राण्यांना ‘शॉक’ देऊन मारण्याचा उपद्व्याप सुरू केला. त्यांच्या या हीन कृत्यांतून अनेक कुत्रे, मांजरी, गाई, म्हशी, घोडे व एका हत्तिणीला हकनाक प्राण गमवावे लागले. ६ ऑगस्ट १८९० रोजी पहिल्यांदा एडिसनच्या आग्रहाखातर एका कैद्याला प्रत्यावर्ती करंटच्या साहाय्याने हाल हाल करून मारण्यात आले. एडिसनचा हा सारा खटाटोप स्वत:चे व्यापारी हित जोपासण्यासाठी होता. एवढे करूनही त्यांना हवा तो परिणाम साधता आला नाही. आज टेस्ला यांची प्रत्यावर्ती विद्युत प्रणाली सरस ठरलेली आहे. पुढे एडिसनला त्यांचे पूर्व सहयोगी टेस्ला सोबत नोबेल पारितोषिक मिळणार होतं, परंतु टेस्लाने एडिसनसोबत पारितोषिक घेण्यास नकार दिला आणि दोघेही नोबेलपासून वंचित राहिले.

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शोध करण्याची मानसिकता ठेवणारा हा महान वैज्ञानिक अत्यंत मृदुभाषी होता. त्याचं खालील वाक्य त्याची नम्रता सांगून जाते.

‘‘माझ्या यशात विद्वत्तेची भूमिका १ टक्का आणि परिश्रमाची भूमिका ९९ टक्के आहे!’’ पण जर कोणी निकोला टेस्ला यांना हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी जिनियस म्हणजे नव्याण्णव टक्के स्फूर्ती व एक टक्का मेहनत असं उत्तर बहुधा दिलं असतं. अशा प्रकारची परस्परविरोधी उत्तरं थॉमस अल्वा एडिसन आणि निकोला टेस्ला यांच्या अंगभूत गुणवैशिष्टय़ांना समर्पकपणे अधोरेखित करतात. ते दोघेही अतिशय महान वैज्ञानिक होते.

संदर्भ :- शिरीष उऱ्हेकर यांचा एडिसनवरील लेख

संबंधित लेख

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button