धीरूभाई अंबानी यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील चोरवाड या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी.त्यांचे वडील हे एक प्राथमिक शिक्षक होते तर आई गृहिणी होती. घरची परिस्थिती बेताची होती.त्यामुळे लहान वयातच धीरूभाई गिरनार पर्वताजवळ पर्यटकांना भजी विकायचे. शाळेत जेमतेम असणारे धीरूभाई यांचं शिक्षण १० वी पर्यंतच झालं. वयाच्या १६ व्या वर्षी धीरूभाई आपले जेष्ठ बंधू रमणीकभाई यांच्यासोबत एडनला गेले आणि तेथे ते एका पेट्रोल पंपावर महिना ३०० रुपये पगारावर नोकरी करू लागले. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर अवघ्या २ वर्षांत ते मॅनेजर पदापर्यंत पोहोचले. पण स्वतःचा व्यवसाय करण्याची तळमळ त्यांना शांत बसू देईना. येमेनमध्ये स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरु झाल्यावर ते भारतात परत आले.त्यांनी चुलत भावासोबत भागीदारीमध्ये पॉलिएस्टर धागे आणि भारतीय मसाले आयात निर्यातीचा व्यवसाय चालू केला. बचतीचे ५० हजार रुपये गुंतवणूक करून मुंबईतल्या मस्जिद बंदर या ठिकाणी “रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन"चीसुरुवात झाली, तीही ३५० चौ. फूटच्या खोलीमध्ये. ज्यामध्ये २ टेबल, ३ खुर्च्या आणि एक टेलिफोन होता. हे होतं धीरूभाईंचं पहिलं ऑफिस. आयुष्यात नेहमी जोखीम घेत व्यवसाय करणाऱ्या धीरूभाईंनी कापड उद्योगातील सगळे बारकावे शिकत, १९६६ साली अहमदाबादच्या नरोडा येथे एका मिलची सुरुवात केली, जिथे कपडे बनवण्यासाठी पॉलिस्टर धाग्याचा उपयोग व्हायचा. तिथं तयार होणाऱ्या कापडाला त्यांनी विमल नाव दिलं, जे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाचं होतं. पाहता पाहता विमलचा डंका संपूर्ण भारतात वाजू लागला. १९७७ मध्ये धीरूभाईंनी आपल्या कंपनीचे शेअर्स सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतलाआणि त्या वेळी ५८,००० हून अधिक गुंतवणूकदारांनी त्या शेअर्सची खरेदी केली. यानंतर त्यांनी रिलायन्स कंपनीचा विस्तार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केला. रिफायनरी, पेट्रोलियम, टेलीकम्युनिकेशन यांसारख्या क्षेत्रात रिलायन्स आपलं नाव कमवत गेली. रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन म्हणून सुरु झालेली कंपनी पुढे रिलायन्स टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड आणि आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशी नावं धारण करत प्रगती करत आली. ६ जुलै २००२ साली रोजी धीरूभाई अंबानी यांचा मृत्यू झाला. ‘नेहमी मोठी स्वप्नं पहा' असं सांगणारे धीरूभाई आजही लाखो गरीब आणिकमी शिक्षण घेतलेल्या तरुणांना प्रेरित करतात.