डॉक्टर जॉन पेंबरटन हे अमेरिकेच्या सैन्यामध्ये कर्नल होते. सिव्हिल वॉर दरम्यान सेवा बजावत असताना ते जखमी झाले आणित्याच दरम्यान त्यांना मर्फिन या ड्रग्जचे व्यसन लागले. खूप वर्षानंतर त्यांनी आपलं व्यसन सोडायचं ठरवलं आणि तेव्हा मर्फिन ड्रग्जच्या जागी आपल्याला दुसरं काय घेता येईल याचा विचार करू लागले. पेंबरटन हे रसायन शास्त्रज्ञसुद्धा होते. त्यामुळे त्यांनी काही घटकांचा प्रयोग करायचं ठरवलं. त्यांनी कोला नट्स आणि कोकाची पाने एकत्र करून मिश्रण तयार केलं. त्यात अजून काही घटक घालून एक सिरप बनवलं आणि त्यामध्ये कार्बोनेटचं पाणी मिसळलं. त्यांनी तयार केलेल्या पेयामध्ये अल्कोहोल असल्यामुळे कायद्याच्या चौकटीत ते बसत नव्हतं. म्हणून पेंबरटन आपले पेय रजिस्टर करू शकले नाहीत पण नंतर त्याच फॉर्म्युलामध्ये काही बदल करून त्यांनी अल्कोहोल विरहित पेय तयार केलं १८८६ मध्ये पेंबरटन यांनी आपले पेय औषधांच्या दुकानांमध्ये विकायला चालू केलं. ते पेय विकताना सांगू लागले की यामुळे अपचनाचा त्रास, डोकेदुखी, मर्फिनचे व्यसन कमी व्हायला मदत होते यामुळे त्यांचं हे पेय लोकप्रिय होऊ लागलं. नंतर त्यांचे पार्टनर फ्रँक रॉबिन्सन यांनी Cocakola असं नाव सुचवलं, परंतु पेंबरटन यांनी नाव अधिक आकर्षक दिसण्यासाठी kola मधील K काढून तिथं C ठेऊन Cola केलं आणि तयार झाली ती Coca-cola. ही मूळ रेसिपी अजूनही रहस्य आहे. असं म्हटलं जातं की, ही रेसिपी एका वेळेस कोका-कोलाच्या फक्त दोन कर्मचाऱ्यांना माहिती असते आणित्यांचा मृत्यू झाल्यानंतरच ती पुढच्या कर्मचाऱ्याला सांगितली जाते. स्वतः बनवलेली नावीन्यपूर्ण उत्पादने, मार्केटिंगचे नवनवीन तंत्र, कौशल्य यामुळे अल्पावधीत Coca-cola एक मोठी कंपनी म्हणून उदयाला आली. आज Coca-Colaचे स्वतःचे पाचशेपेक्षा जास्त ब्रँड असून ३५०० पेक्षा जास्त प्रोडक्टस आहेत. कंपनीचे बाजारमूल्य 278 अब्ज डॉलर्स आहे पहिल्या वर्षी कोका-कोलाच्या फक्त २५ बॉटल्स विकल्या गेल्या होत्या. सध्या कोका-कोला जगातील जवळपास २०० देशांमध्ये विकले जाते व रोज सुमारे १९० कोटी लोक कोका-कोलाचे पेय पितात.