मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय | The richest Indian in Dubai – Rizwan Sajan’s
भारतात अनेक उद्योगपती आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. काहींच्या हातात वारसा संपत्ती नसली तरी, त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमावले आहे. अशाच एका यशस्वी उद्योगपतीची गोष्ट आज आम्ही सांगणार आहोत, जो मुंबईतील घाटकोपरच्या झोपडपट्टीत राहत होता आणि छोट्या-छोट्या नोकऱ्या करीत जीवनाची गाडी पुढे नेत होता. आज तो दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये गणला जातो आणि त्यांचा व्यवसाय केवळ दुबईतच नाही, तर इतर अनेक देशांमध्येही पसरलेला आहे.
सुरुवातीचे दिवस आणि संघर्ष
रिझवान साजन यांचा जन्म मुंबईच्या घाटकोपरमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचं कुटुंब झोपडपट्टीत राहायचे. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं फार कठीण होत होतं. त्यामुळे, साजन यांनी लहानपणापासूनच कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याचं ठरवलं होतं. त्यांनी शाळेतील पुस्तकं विकणं, सणासुदीच्या वस्तू विकणं, घरोघरी जाऊन दूध विकणं अशी छोटी छोटी कामं लहानपणीच करण्यास सुरुवात केली.
वयाच्या अवघा १६व्या वर्षीच रिझवान साजन एक मोठा धक्का बसला,त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी साजन यांच्यावर आली आणि याचा परिणाम म्हणून त्यांना शिक्षण मधूनच सोडावं लागलं. काही काळ त्यांनी एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात ते फाईल बॉक्सेस बनवायचे. सुरुवातीला या व्यवसायात थोडंफार यश मिळाले, पण पुरेसं नव्हतं.
कुवेतमध्ये मिळाली सुवर्णसंधी
रिझवान साजन यांचे काका तेव्हा कुवैतमध्ये नोकरी करत होते, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी साजन यांनी आपल्या काकांकडे कुवेतमध्ये नोकरीसाठी विचारणा केली. त्यांच्या काकांनी त्यांना एका बांधकाम साहित्याच्या दुकानात नोकरी मिळवून दिली. ही संधी साजन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वळण ठरली. त्यांनी या नोकरीत एक विक्रेता म्हणून काम सुरू केलं, आणि त्यांच्या मेहनतीने त्यांना त्या ठिकाणी लवकरच व्यवस्थापकाची पदवी मिळाली.
१९९० साली पुन्हा त्यांच्या जीवनाला एक जोरदार धक्का मिळाला . कुवेतमध्ये भीषण आखाती युद्ध सुरू झालं आणि त्यांना कुवेत सोडावं लागलं आणि पुन्हा भारतात परतावं लागलं. परत आल्यावर त्यांनी काही नोकऱ्या करून पहिल्या, पण यश मिळवण्यासाठी त्यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. काही काळ भारतात राहिल्यानंतर त्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना दुबईत बांधकाम उद्योगात मोठी संधी दिसत होती.
दुबईत ‘डॅन्यूब ग्रुप’ची स्थापना
१९९३ मध्ये दुबईला गेल्यावर रिझवान साजन यांनी ‘डॅन्यूब’ नावाची ट्रेडिंग फर्म सुरू केली. हि कंपनी कुवेतमधून बांधकाम साहित्य खरेदी करायची आणि दुबईमध्ये त्याची विक्री करायची. दुबईमध्ये बांधकाम उद्योगाची प्रचंड वाढ होत होती, आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला जोरदार प्रतिसाद मिळाला. साजन यांच्या सर्जनशील स्वभावामुळे आणि मेहनतीमुळे ‘डॅन्यूब’ ने अवघ्या काही वर्षांतच मोठं यश मिळवलं.
१९९९ पर्यंत ‘डॅन्यूब’ चा वार्षिक महसूल १६ कोटी रुपये झाला होता, आणि ते १ कोटी रुपयांचा नफा मिळवत होते. पण साजन इथेच थांबले नाहीत. त्यांनी बांधकाम साहित्याबरोबरच गृहसजावट, सॅनिटरीवेअर, इलेक्ट्रिकल उपकरणे यांसारख्या विविध क्षेत्रांत विस्तार केला.
रिअल इस्टेटमध्ये पाऊल
२००८ मध्ये जागतिक आर्थिक संकट आलं , पण साजन यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं आणि २०१४ मध्ये ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ नावाची रिअल इस्टेट कंपनी लाँच केली. त्यांचा उद्देश मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा होता. ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ ने बाजारात एक क्रांतिकारी योजना आणली — “1% मासिक पेमेंट योजना” या योजनेत खरेदीदारांना घर खरेदीसाठी फक्त 1% रक्कम दरमहा भरण्याची मुभा होती आणि त्यांना घरमालकीचा हक्क मिळत होता.
या योजनेने घर खरेदीदारांसाठी घरमालकीचा मार्ग सोपा केला आणि अल्पावधीतच ‘डॅन्यूब प्रॉपर्टीजचं नाव बाजारात लोकप्रिय झालं. या योजनेमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळाले आणि २०१६ पर्यंत ‘डॅन्यूब’चा वार्षिक महसूल ९००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. साजन यांनी रिअल इस्टेटमध्ये आपले स्थान मजबुत केलं आणि आज ‘डॅन्यूब ग्रुप’ १६,७०९ कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळवणारी कंपनी आहे. रिझवान साजन यांनी आपल्या अपार मेहनत आणि हुशारीच्या जोरावर ‘डॅन्यूब’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि त्यांची उपस्थिती जगभरातील ३० पेक्षा जास्त देशांत आहे.
रिझवान साजन यांची कहाणी ही एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाची आणि यशाची कहाणी आहे.
मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरु झालेला हा प्रवास दुबईतील यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. त्यांनी कठीण परिस्थितीतही हार न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने बुद्धिमत्तेमुळे ते आज जागतिक स्तरावर यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात .
आणखी वाचा
- कसा झाला जगातील पहिल्या रेसिंग कारचा जन्म? पोर्श कारची गोष्ट
- भारतीय नारी, भल्याभल्यांवर भारी! भारताची ही ‘ट्रॅक्टर क्वीन’ आहे 23 हजार कोटींची मालकीण – मल्लिका श्रीनिवासन
- छोट्याश्या खेड्यात राहणारा शेतकऱ्याचा मुलगा ते लॅम्बोर्गिनी कंपनीचा मालक