प्रेरणादायी

खरी संपत्ती म्हणजे काय ?

रॉजर एच. यांच्या पुस्तकातील एक गोष्ट आजच्या संडे मोटिव्हेशनमध्ये आपण बघुयात.आजवर शिकलेल्या उद्योजकतेच्या धड्यांपैकी एक खूप चांगला धडा मला योगायोगाने श्रीलंकेतील एक नदीमध्ये प्रवास करताना शिकायला मिळाला.

मी श्रीलंकेत गेलो असताना नदीच्या पांढऱ्याशुभ्र पाण्यात राफ्टींग करण्याची माझी इच्छा होती. नदीमध्ये राफ्टींग करत असताना आमची राफ्ट एका सुंदर अशा नदीच्या खोऱ्यामध्ये शिरली. आमचा जो गाईड होता, तो आम्हाला बोटाने पर्वताच्या आजूबाजूला चहाची केलेली लागवड, अतिशय सुंदर आणि रम्य घरं, नदीकिनारी निसर्ग सौंदर्याने नटलेलं शहर दाखवत होता.

“हे सर्व माझ्या वडिलांचं होतं.” तो म्हणाला.

“यातला नक्की कुठला भाग?” मी प्रश्न केला.

“सगळंच!” त्याने उत्तर दिलं

त्याचे वडील श्रीमंत जमीनदार असतील असं मला वाटलं. न राहवून मी त्याला त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारली, मग त्याने एक चकित करून सोडणारी गोष्ट सांगायला सुरुवात केली.

“माझ्या वडिलांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारत सोडला आणि काहीतरी नवं करता येईल का हे पाहण्यासाठी श्रीलंकेला आले. इथे आल्यावर त्यांना या खोऱ्याचे दर्शन घडले. त्यांना ही जागा इतकी आवडली की त्यांनी इथेच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे तेव्हा अजिबात पैसे नव्हते. त्यांनी इथली काही जमीन मोकळी केली. चहाची लागवड कशी करायची ते शिकून घेतलं आणि त्या जमिनीवर चहा लागवड सुरु केली.”

“लोकांना त्यांचा चहा आवडू लागला. त्यामुळे त्यांनी उत्पादन वाढवायला सुरुवात केली. त्यांच्यापेक्षा जास्त माहिती असणाऱ्या अनुभवी लोकांना लागवडीसाठी सोबत घेतलं. आता त्यांच्याजवळ पुरेसे पैसे होते, त्यामुळे ते या लोकांना पगार देऊ शकत होते. पण लांबचा प्रवास करून कामासाठी इथवर येणं लोकांना गैरसोयीचं ठरत होतं. त्यामुळे त्यांनी घरं बांधली आणि त्या लोकांना ती भाडेतत्वावर दिली.”

मी त्याला मध्येच थांबवत म्हणालो, “म्हणजे तुझ्या वडिलांनी त्या लोकांना पगार दिला आणि तोच पगार त्या लोकांनी भाड्याच्या स्वरुपात त्यांना परत दिला, असंच ना?”

“हो.” त्याने उत्तर दिलं.

“आणि त्यांनी या परत मिळालेल्या पैशातून अजून घरे बांधली असतील?” मी विचारलं.

“नाही. त्यांच्या घरांची सोय झाली होती, पण त्यांना खायला दर्जेदार अन्न मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी हा पैसा रेस्टॉरंट बांधण्यासाठी वापरला.”

मी परत विचारलं “म्हणजे त्यांनी त्या लोकांना पगार दिला, तोच पगार त्या लोकांनी भाड्याच्या स्वरुपात परत दिला, तो पैसा तुझ्या वडिलांनी रेस्टॉरंट काढण्यात गुंतवला. त्यामुळे आपल्याला चांगलं जेवण मिळावं आणि तो खर्च भागवता यावा यासाठी त्या लोकांनी अजून मेहनत करायला सुरुवात केली असेल?”

“हो, बरोबर. यातूनच पुढे ही सगळी दुकानं सुरु झाली, इथे रस्ते बांधले गेले, रेल्वे स्थानक बांधलं गेलं, पूल बांधला गेला. खरं सांगायचं तर, २० वर्षांत जवळपास २००० लोक या सुंदर शहरात स्थायिक झाले आहेत. त्यातील बऱ्याचशा लोकांनी चहा लागवडीचं कामसुद्धा केलेलं नाही, कारण इथे त्यांना करता येण्याजोग्या अनेक गोष्टी होत्या.”

जसजसं आम्ही पुढे जाऊ लागलो, त्याची ही गोष्ट ऐकून ‘पैसा हा फुटबॉलसारखा आहे’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. म्हणजे तुम्ही फुटबॉल खेळत असताना त्याचा पाठलाग करत असता, पण त्याचा वेग जास्त असल्याने आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आपण दोष मात्र इतर खेळाडूंना देतो.

आपण जर खेळाकडे नीट लक्ष दिले आणि आपल्याकडे बॉल आल्यावर तो पुढच्या खेळाडूकडे ढकलला, तर तोच बॉल मग तुमच्याकडे परत परत येत राहतो. जसं त्या गाईडच्या वडिलांनी केलं. त्यांनी पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पैसा खेळता कसा राहील याकडे लक्ष दिलं. जसं फुटबॉलमध्ये मैदानातील खेळाडूंकडे बॉल परत परत येत राहतो, तसंच त्यांच्याकडे सुद्धा पैसा परत परत, रोज येत राहिला. मग तो चहाच्या विक्रीतून असो, त्यांनी बांधलेल्या घरांतून असो, रेस्टॉरंटमधून असो किंवा दुकानांतून.

आणि या प्रत्येक वेळी पैशाची देवाणघेवाण झाली, कारण ते लोकांच्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल घडवू पाहत होते. संपूर्ण शहराला ते स्वतःचं घर समजत होते. आपलं घर संपन्न आणि समृद्ध व्हावं म्हणून प्रयत्न करत होते. खरे उद्योजक कधीही पैशांच्या मागे लागत नाहीत. ते वाळू व्हॅल्यू अॅडीशन करायचा प्रयत्न करतात. पैसा ही त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट असते, जिचा ते पुन्हा वापर करतात आणि अजून मोठे होतात.

चीनमधील महान तत्त्वज्ञ लाओ त्से यांचा एक प्रसिद्ध सुविचार आहे, ‘पर्वतासारखे निश्चल बना आणि नदीसारखे प्रवाही बना.’

“तुझे वडील आता कुठे आहेत?” मी विचारलं.

“ते वीस वर्षांपूर्वीच वारले.”

“अरेरे, ऐकून दुःख झाले.”

थोडा वेळ थांबून मी म्हणालो, “मग हे सगळं तुला वारसा हक्काने मिळालं असेल ना?”

तो हसला. “नाही! नागरी युद्धाच्यावेळी सरकारने माझ्या वडिलांची सगळी जमीन आणि सगळे व्यवसाय ताब्यात घेतले. सर्व मालमत्ता जप्त करून नंतर इतरांना विकून टाकल्या. आमच्याकडे आता नदीकिनारी एक लहान घर तेवढं राहिलेलं आहे, दुसरं काही नाही. माझ्या वडिलांचं त्यावेळी खूप वय झालं होतं, त्यामुळे ते काम करू शकत नव्हते. मरताना त्यांच्याकडे फुटकी कवडीसुद्धा नव्हती.”

हे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणालो, “त्यांना खूपच वाईट वाटलं असेल ना?”

त्याने स्मित केले आणि नदीकडे पाहत म्हणाला, “नाही. मरताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्यांना जिथे जगायचं होतं, तिथे जगता आलं. या परिसरात ते सगळीकडे फिरले, सगळ्यांशी त्यांची मैत्री होती. सगळे त्यांना जेवूखावू घालत असत. त्यामुळे त्यांना पैशांची तशी गरज वाटत नव्हती. खरी संपत्ती काय असते हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. आणि म्हणूनच मी इथे गाईडचं काम करतो.”

वर पर्वताकडे आणि खाली नदीकडे हात करत तो पुढे म्हणाला, “मोठ्या शहरात जावं. खूप मेहनत करून पैसे कमवावे आणि गरज नसलेल्या गोष्टींवर खर्च करावेत याची मला अजिबात गरज वाटत नाही. हे सगळं जे माझ्याजवळ आहे, ते माझ्यासाठी खूप आहे.”

प्रवास संपवून तिथून निघताना माझ्याकडे पैसे कमी होते, पण संपत्ती जास्त होती. चिंता कमी होती, आनंद जास्त होता. कमी कमवायचं आणि जास्त द्यायचं ही भावना होती. आणि संपत्तीची एक नवीन व्याख्या मी बनवली: “संपत्ती म्हणजे तुमच्याजवळ किती पैसे आहेत हे नव्हे, तर तुमच्याजवळील सर्व पैसे गमावल्यावर तुमच्याकडे शिल्लक राहील, ती तुमची खरी संपत्ती.”

हा लेख विडीयो मध्ये पहा

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button