उद्योग महाराष्ट्राचे : प्रस्तावना
👍 महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्र राज्याला भूगोल आहे आणि इतिहाससुद्धा! गौरवशाली इतिहासाची परंपरा आपणास प्राचीन कालखंडात दिसते. मध्ययुगात सर्व भारतभर परकीय आक्रमणाचे ढग दाटून आलेले होते. या नैराश्यपूर्ण मळभावर विजयनगरचे साम्राज्य आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अपवाद आपणास दिसून येतात. मराठी सत्तेच्या पतनानंतर इंग्रजांचा अंमल महाराष्ट्रावर सुरू झाला. इंग्रजांविरुद्धच्या संघर्षात आद्य क्रांतिकारकांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत अनेकांनी बलिदान केले आणि हा देश स्वतंत्र झाला. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर महाराष्ट्राला पुन्हा एकदा भाषिक राज्यासाठी लढा द्यावा लागला. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. अर्थात बेळगाव वगळून! १९६० ते आजतागायत स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
👍 महाराष्ट्र भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ :
दिनांक १ मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली.
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.
विस्तार – महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त लांबी ८०० कि. मी. आणि उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त लांबी ७०० कि.मी. आहे.
क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनंतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) ९.३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.
महाराष्ट्राच्या वायव्येस-गुजरात राज्य, दादरा व नगर हवेली , उत्तरेला -मध्य प्रदेश, पूर्वेस – छत्तीसगढ, आग्नेयेस – तेलंगणा, दक्षिणेस – कर्नाटक आणि अगदी दक्षिणेस – गोवा राज्य आहे. राज्याच्या पश्चिम सीमेलगत अरबी महासागर पसरलेला आहे.
👍 महाराष्ट्रातील उद्योग:
औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे आजही देशातील अव्वल राज्य म्हणून गणले जाते. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक रचनेचा पाया घातला. राज्यातील वातावरण उद्योगवाढीला पोषक राहील, याची काळजी यशवंतरावांनी सुरुवातीपासून घेतली.
मुबंई हे भारतातील प्रमुख औद्योगिक-आर्थिक केंद्र मानले जाते. राज्याचा विकास होण्याकरिता पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यादृष्टीने महाराष्ट्रातील विविध औद्योगिक विकास महामंडळे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर, वाहतूक व संदेशवहनाच्या अत्याधुनिक सुविधा, वित्तीय संस्था व महामंडळे, पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा, मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यांसारखी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे राज्याच्या औद्योगिक विकासामधे मोलाचा वाटा उचलत आहेत. महाराष्ट्राचा जीएसडीपी २५.३५ लाख कोटी (३८० अब्ज डॉलर्स) आहे. ऑगस्ट १९९१ ते नोव्हेंबर, २०१६ या कालावधीत ११,३७,७८३ कोटी रु. गुंतवणुकीच्या एकूण १९,४३७ उद्योगांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. देशाच्या एकूण औद्योगिक गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १०% असून त्यामधून देशातील एकूण रोजगार उपलब्धतेच्या १५% रोजगार प्राप्त होतो. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २३% आहे. (या विभागातील आकडेवारी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : २०१६ -१७ नुसार अद्ययावत करण्यात आली आहे.)
👍 महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे प्रकार :
१. कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये कापड उद्योग, साखर उद्योग, तेलगिरण्या, तंबाखू प्रक्रिया, डाळ मील, वाईन, रबर उद्योग यांसारख्या उद्योगांचा समावेश होतो.
२. खनिज उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये लोह पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र, यंत्रोद्योग यांचा समावेश होतो.
३. वन उत्पादनांवर आधारित उद्योग – लाकूड कापण्याच्या गिरण्या, कागद कारखाने, आगपेट्यांचे कारखाने, औषधे निर्मिती, खेळांचे साहित्य, फर्निचर निर्मिती उद्योग यांचा समावेश होतो.
४. प्राणिज उत्पादनांवर आधारित उद्योग – यामध्ये कातडी उद्योग, लोकरी कापडाच्या गिरण्या, रेशीम उद्योग, दुग्धजन्य पदार्थ उद्योग यांचा समावेश होतो.
त्याच बरोबरीने बांधकाम उद्योग, पर्यटन उद्योग, सेवा क्षेत्र, वाहन उद्योग, प्रकाशन व मुद्रण उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, करमणूक उद्योग हे सर्व उद्योग जोमाने वाढत आहेत.
देशातील औद्योगिक गुंतवणुकीतील महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम राखणे, राज्यातील औद्योगिकदृष्टया मागास भागांत गुंतवणुकीचा वेग कायम राखणे, नवीन गुंतवणूक वाढवण्यास चालना देणे, रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करणे, ही उद्दिष्टे कशी पूर्ण करायची, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आपण पुढील लेखांमध्ये बघणार आहोत. धन्यवाद