चेष्टा-मस्करीत सुरू झालेला प्लॅटफॉर्म कसा बनला जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया?
झुक्या भाऊंनी फेसबुकचा संसार कसा उभारला? जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक बद्दल.
Facebook Journey:
काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून जातात. माणसाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा या सर्वात महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत. मात्र, आता गरजा वाढू लागल्या आहेत. आता सोशल मीडिया हीदेखील लोकांची मूलभूत गरज झाल्याचे पाहायला मिळत आहे. २० वर्षांपूर्वी चेष्टा-मस्करीत सुरू झालेल्या फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आज जगभरात ३०० कोटींपेक्षा जास्त युजर्स कमावले आहेत.
लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वजण याचा वापर करताना दिसतात. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यादीत फेसबुकची एकहाती सत्ता आहे. व्हॉट्सअप (२०० कोटी) आणि इंस्टाग्राम (२०० कोटी) हे दोन्ही मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही फेसबुकचा भाग आहेत. फेसबुकविषयी चर्चा करण्यामागील कारण असे की, आजच्याच दिवशी म्हणजेच ४ फेब्रुवारी रोजी फेसबुकची स्थापना झाली होती. जगभरात पसरलेल्या फेसबुकची सुरुवात नेमकी झाली तरी कशी, याचाच आढावा आपण आजच्या या लेखातून घेणार आहोत.
फेसबुक हे एक असे समाजमाध्यम आहे, जे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीला आपलेसे करणाऱ्या या फेसबुकची सुरुवात होण्याची कहाणी खूपच रंजक आहे. खरं तर, २००३ मध्ये मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) हा पठ्ठ्या हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्याच्या भूमिकेत होता. मार्कचा सुरुवातीपासूनच कम्प्यूटर प्रोग्रॅमिंगमध्ये हातखंडा होता. २००३ मध्ये मार्कने हार्वर्ड स्टुडंट डिरेक्टरी सर्व्हर हॅक करून त्यातील सर्व प्रोफाईल गोळा करून फेसमास नावाची नवीन साईट तयार केली होती.
या मजेशीर प्लॅटफॉर्मवर सुंदर तरुणींचे फोटो लावले जात होते. तसेच, यांपैकी सर्वात आकर्षक कोण आहे? याचं मत घेतलं जायचं. याबद्दलची माहिती हार्वर्डच्या व्यवस्थापनाला समजताच, त्यांनी तातडीने ही वेबसाईट बंद करून टाकली. यानंतर २००४ साल उजाडतं. वर्षाच्या सुरुवातीला मार्क झुकरबर्गने त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या (डस्टिन मोस्कोवीट्ज, एड्युर्डो सॅव्हेरिन आणि ख्रिस ह्यूज) मदतीने भागीदारी करून फेब्रुवारी २००४मध्ये फेसबुक डॉट कॉमची सुरुवात केली.
अशी झाली Facebook ची सुरुवात
फेसबुकची सुरुवात ४ फेब्रुवारी, २००४ रोजी झाली. खरं तर, हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपल्या काही मित्रांसोबत कॉलेजात एकमेकांशी जोडण्यासाठी फेसबुक बनवले होते. लाँचिंगवेळी त्याने याचे नाव ‘द फेसबुक’ ठेवले होते. मात्र, नंतर द काढून फक्त फेसबुक असे नाव देण्यात आले. फेसबुकला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत.
Facebook ने लाँच होताच गाठले यशाचे शिखर
विशेष म्हणजे, हार्वर्डमध्ये विद्यार्थांना एकमेकांशी जोडून ठेवण्याच्या उद्देशामुळे फेसबुकपूर्वी २८ ऑक्टोबर २००३ रोजी मार्क झुकरबर्गने ‘फेसमास’ नावाची एक वेबसाईट लाँच केली होती. फेसमासनेच झुकरबर्गला फेसबुक (Facebook) बनवण्यासाठी प्रेरित केले आणि २००४ साली फेसबुकने जन्म घेतला. लाँच झाल्यानंतर काही काळातच फेसबुकने यशाचे शिखर गाठले. एका रिपोर्टनुसार, फेब्रुवारीमध्ये सुरू झाल्यानंतर डिसेंबर २००४पर्यंत ११ महिन्यातच फेसबुकच्या युजर्सची संख्या १० लाखांपर्यंत पोहोचली. त्यानंतर झुकरबर्गने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही.
विशीतच झाला अब्जपती
कीर्ती लहान, मूर्ती महान ही म्हण खरी करून दाखवण्याचं धाडस झुकरबर्गने केले. फेसबुकचे युजर्स दिवसेंदिवस वाढत गेले आणि ही जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट म्हणून उदयास आली. फेसबुकची वाढती लोकप्रियता पाहून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचीही रांगच लागली. यामुळे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग वयाच्या अवघ्या २३ वर्षांच्या वयात अब्जपतींच्या यादीत सामील झाला. फेसबुकच्या लोकप्रियतेचा हा प्रवास अजूनही सुरूच आहे.
Facebook मध्ये मोठा बदल
तब्बल १८ वर्षे फेसबुक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीला २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी वेगळे नाव मिळाले. मार्क झुकरबर्गने पॅरेंट कंपनीचे नाव बदलून मेटा (Meta) ठेवले. याचे उद्दिष्ट हे होते की, कंपनी मेटाव्हर्सच्या निर्माणावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करू इच्छित होती. मेटाव्हर्स शब्दाचा वापर डिजिटल जगात व्हर्च्युअल आणि इंटरऍक्टिव्ह स्पेस समजून घेण्यासाठी केला जातो. मेटाव्हर्स खरं तर एक व्हर्च्युअल जग आहे, जिथे एक व्यक्ती शारीरिकरीत्या उपस्थित नसूनही उपस्थित राहू शकतो. मेटाच्या अंतर्गत येणाऱ्या फेसबुक, व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम यांची नावे तीच राहतील, जी आधीपासून आहेत. झुकरबर्गच्या मते, कंपनीचे नाव बदलल्यानंतरही आमचे ध्येय लोकांना एकत्र आणणेच राहील.
वाचक मित्रांनो, तुम्हाला हा लेख कसा वाटला? आवडला असेल, तर मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच, तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरील लेख वाचायला आवडतील? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.