लेखउभारी देणारं असं काहीप्रेरणादायी

रेल्वे रुळांवर इतिहास घडवणारी मराठमोळी लेक | Surekha Yadav

“महिलांना जगातली सर्व कठीण कामे जमतील, पण ड्रायव्हिंग हे त्यांचे काम नाही,” हे वाक्य आपण आजही अनेकदा ऐकतो. पण या पुरुषी मानसिकतेला खोटं ठरवत एका मराठमोळ्या लेकीने थेट रेल्वे इंजिनचं सारथ्य केलं. ती लेक म्हणजे साताऱ्याच्या कन्या, सौ.. सुरेखा यादव. भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक (लोको पायलट) होण्याचा मान मिळवून त्यांनी इतिहास घडवला. तब्बल ३६ वर्षांच्या शानदार सेवेनंतर त्या या नवरात्रोत्सवात  निवृत्त होत आहेत. चला, जाणून घेऊया रुळांवर आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या या असामान्य व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी गोष्ट.

जन्म आणि शिक्षण: साताऱ्याच्या मातीतील अंकुर

सुरेखा यादव (Surekha Yadav) यांचा जन्म २ सप्टेंबर १९६५ रोजी महाराष्ट्राच्या साताऱ्यात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामचंद्र भोसले आणि आई सोनाबाई. पाच भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या सुरेखा लहानपणापासूनच हुशार आणि महत्त्वाकांक्षी होत्या. त्यांचे शालेय शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले. खरं तर, त्यांना शिक्षिका व्हायचे होते आणि त्यासाठी त्यांनी बी.एड. करण्याची योजनाही आखली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

शालेय शिक्षणानंतर त्यांनी तांत्रिक शिक्षणाची वाट धरली आणि कराड येथील सरकारी पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. याच तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर त्यांनी भविष्याची एक नवी दिशा निवडली.

रेल्वे रुळांवरचा ऐतिहासिक प्रवास

१९८६ साली रेल्वेमध्ये असिस्टंट ड्रायव्हर पदासाठी भरती निघाली. त्या काळात हे क्षेत्र पूर्णपणे पुरुषांची मक्तेदारी मानले जायचे. पण सुरेखा यांनी धाडसाने अर्ज केला. लेखी परीक्षा आणि मुलाखत यशस्वीपणे पार करत त्यांनी रेल्वेमध्ये प्रवेश निश्चित केला. कल्याणच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून १९८८  साली त्या भारतीय रेल्वेमध्ये सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या आणि एका नव्या इतिहासाला सुरुवात झाली.

त्यांचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांनी मालगाडी चालवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांची मेहनत, अचूकता आणि कौशल्य पाहून रेल्वे प्रशासनाचा विश्वास वाढत गेला.

यशाचे एकेक शिखर

  • २०००: त्यांना ‘मोटरवुमन’ म्हणून बढती मिळाली.
  • २०१०: पश्चिम घाटासारख्या आव्हानात्मक आणि कठीण रेल्वे मार्गावर गाडी चालवण्याची जबाबदारी त्यांना मिळाली.
  • ८ मार्च २०११: ‘डेक्कन क्वीन’ अर्थात ‘दख्खनच्या राणी’ या प्रतिष्ठित गाडीचे पुणे ते मुंबई सारथ्य करण्याचा ऐतिहासिक मान त्यांना मिळाला. हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.
  • २०११: त्यांची एक्सप्रेस मेल पायलट म्हणून नियुक्ती झाली, ज्यामुळे त्या आशियातील पहिल्या पूर्णवेळ महिला ड्रायव्हर ठरल्या.
  • १३ मार्च २०२३: त्यांनी सोलापूर ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चालवून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. वंदे भारत चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या.

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

सुरेखा यादव यांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे पती शंकर यादव हे महाराष्ट्र पोलिसात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. दोन मुलांची आई असलेल्या सुरेखा नेहमी सांगतात की, “कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते.” नोकरीची वेळ, जबाबदारी आणि ताण सांभाळून घराची जबाबदारी सांभाळण्यात त्यांच्या पतीने आणि कुटुंबाने दिलेली साथ मोलाची ठरली.

सेवानिवृत्ती आणि प्रेरणादायी वारसा

तब्बल ३६ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर, सुरेखा यादव ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या कारकिर्दीतील शेवटची फेरी त्यांनी हजरत निजामुद्दीन (दिल्ली) – CSMT राजधानी एक्सप्रेस चालवून पूर्ण केली.

त्यांच्या सेवानिवृत्तीवर मध्य रेल्वेने अत्यंत भावनाप्रधान शब्दात म्हटले आहे, “श्रीमती सुरेखा यादव या एक खऱ्या अर्थाने पथप्रदर्शक (trailblazer) आहेत. त्यांनी अडथळ्यांना पार करून अगणित महिलांना प्रेरणा दिली आणि हे सिद्ध केले की परिश्रम घेण्याची तयार असेल तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहू शकत नाही. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वेमध्ये महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहील.”

सुरेखा यादव यांची गोष्ट केवळ एका नोकरीची कहाणी नाही, तर ती स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मर्यादा न मानण्याची गाथा आहे. ‘चूल आणि मूल’ या चौकटीतून बाहेर पडून महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आणि दीपस्तंभ म्हणून कायम प्रकाश देत राहील.

आणखीन वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button