अपमानाचे उत्तर ‘यशाने’ दिलं! सुधीर जाटिया आणि ‘सफारी’ ब्रँडचा प्रेरणादायी प्रवास

यशाचा ‘सफारी’ पॅटर्न: हार न मानता अपयशालाच ताकद बनवणाऱ्या सुधीर जाटियांची गोष्ट.
यश हे कधीच एका रात्रीत मिळत नाही. त्यामागे सातत्यपूर्ण मेहनत, स्वतःवरचा ठाम विश्वास, प्रचंड जिद्द आणि अपयशातून शिकण्याची तयारी लागते. अनेक लोक अडचणी आल्या की थांबतात, पण काही मोजकेच लोक अपयशालाच आपली ताकद बनवून पुढे जातात आणि खऱ्या अर्थाने यश मिळवतात. अशा लोकांचा प्रवास नेहमीच प्रेरणा देणारा असतो.
कधी कधी यशाची खरी सुरुवात अपमान, दुर्लक्ष आणि नाकारण्यातून होते. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाचं नाव आहे, सुधीर जाटिया. अत्यंत साध्या सुरुवातीपासून ते आज करोडोंची कंपनी उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. आजच्या लेखात आपण त्यांच्या व्यवसायिक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.
करिअरची सुरुवात
वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी सुधीर जाटिया यांनी VIP Industries मध्ये Aristocrat (Value Luggage) या विभागात ट्रेनी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्या काळात अनेकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास नव्हता. मात्र त्यांनी हार न मानता मेहनत, बारकाईने निरीक्षण करण्याची सवय आणि बाजाराची सखोल समज विकसित केली.
या गुणांच्या जोरावर त्यांनी हळूहळू स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि सर्व शंका चुकीच्या ठरवल्या. अवघ्या १२ वर्षांत ते VIP Industries चे Vice President (VP) बनले. ट्रेनीपासून VP पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा खरा पुरावा आहे.
ब्रँडिंगचा मास्टरस्ट्रोक
सुधीर जाटिया यांनी VIP Industries च्या ब्रँडिंगमध्ये मोठा आणि धाडसी बदल केला. त्यांनी कंपनीचं संपूर्ण पोर्टफोलिओ नव्यानं मांडून प्रत्येक ब्रँडची वेगळी ओळख ठरवली. VIP ब्रँडला त्यांनी प्रीमियम आणि बिझनेस-क्लास सेगमेंटमध्ये स्थान दिलं, ज्यामुळे तो दर्जेदार आणि विश्वासार्ह ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला.
त्याच वेळी Aristocrat ब्रँडला तरुण पिढीसाठी परवडणारा, मजबूत आणि व्हॅल्यू-फॉर-मनी ब्रँड म्हणून सादर करण्यात आलं. या स्पष्ट रणनीतीचा थेट परिणाम कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर दिसून आला आणि २०१० पर्यंत VIP Industries ही कंपनी १० कोटींच्या तोट्यातून बाहेर येत थेट ५६ कोटींच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नफ्यापर्यंत पोहोचली.

टर्निंग पॉइंट
इतकं मोठं यश मिळवूनही २०१० साली व्यवस्थापनाने नवीन Lead VP नेमला आणि सुधीर जाटिया हळूहळू निर्णयप्रक्रियेतून बाजूला केलं. हा प्रसंग कुणालाही खचवणारा ठरला असता, कारण इतक्या मेहनतीनंतरही दुर्लक्ष होणं वेदनादायक असतं.
पण सुधीर यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वतःशीच एक ठाम निर्णय घेतला की उत्तर शब्दांनी नाही, तर यशातून द्यायचं. त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या आयुष्यातील खरा वळणबिंदू ठरला.
Safari ची निवड
२०११ मध्ये Safari ही एक लिस्टेड लगेज कंपनी होती, मात्र तिचा वार्षिक नफा केवळ २.६५ कोटींच्या मर्यादेत अडकलेला होता. VIP ला खऱ्या अर्थाने टक्कर देण्यासाठी Safari हाच योग्य ब्रँड आहे, हे सुधीर जाटिया यांनी अचूक ओळखलं. सप्टेंबर २०११ मध्ये त्यांनी २९ कोटींची गुंतवणूक करत Safari मध्ये ४१.३४% भागीदारी मिळवली आणि कंपनीच्या मालकीत प्रवेश केला.
Safari मध्ये पाऊल टाकताच सुधीर यांनी ग्राहककेंद्री धोरण राबवलं. त्यांचा पहिला निर्णयच धक्कादायक होता तो म्हणजे वॉरंटीमध्ये आलेल्या बॅग दुरुस्त न करता थेट नवीन बॅग देण्याचा आदेश. यामुळे डिझाईन आणि उत्पादन टीमवर गुणवत्तेबाबत प्रचंड दबाव आला. त्याचबरोबर त्यांनी मटेरियल, टिकाऊपणा आणि उत्पादन प्रक्रियेवर पुन्हा लक्ष केंद्रित केलं आणि “Quality First” ही फक्त टॅगलाईन न राहता कंपनीची संस्कृती बनली. विक्री वाढवण्यासाठी त्यांनी Big Bazaar, Reliance Trends, Spencer’s यांसारख्या रिटेल चॅनेल्ससोबत भागीदारी केली आणि Amazon व Flipkart वर जाणारा भारतातील पहिला लगेज ब्रँड म्हणून Safari ने आपली वेगळी ओळख निर्माण केली. याच टप्प्यावरून Safari च्या यशाची खरी सुरुवात झाली.
झपाट्याने वाढ आणि स्पर्धेत आघाडी
२०१५ पर्यंत Safari ची विक्री १५० कोटींवर पोहोचली होती, ज्यातील सुमारे ३०% विक्री ई-कॉमर्समधून होत होती. २०१६ मध्ये Genius आणि Magnum या ब्रँड्सचे अधिग्रहण करून Safari ने शालेय बॅग्स आणि बजेट लगेज सेगमेंटमध्ये आपला विस्तार केला. या झपाट्याने होत असलेल्या वाढीमुळे VIP आणि Samsonite सारखे दिग्गज ब्रँडही सावध झाले.
VIP ने aspirational branding वर भर दिला, Samsonite ने पूर्णपणे ऑफलाइन नेटवर्कवर विश्वास ठेवला, तर Safari ने स्टायलिश जाहिराती, मोठ्या रिटेल स्टोअर्स आणि मजबूत ई-कॉमर्स या तिन्हींचा प्रभावी मेळ साधला. या स्मार्ट रणनीतीचा परिणाम असा झाला की २०१९ पर्यंत Safari ची विक्री ६०० कोटींवर पोहोचली आणि Samsonite ला मागे टाकत Safari भारतातील नंबर २ लगेज कंपनी बनली. COVID-19 च्या कठीण काळातही Safari ने १००% ऑर्डर्स पूर्ण करून आपली विश्वासार्हता आणि ताकद सिद्ध केली.
यशाच्या शिखरावर
२०२३ पर्यंत VIP Industries ची मार्केट कॅप ८,४७६ कोटी होती, तर Safari ची विक्री १,२१२ कोटींवर पोहोचली. कंपनीची एकूण मार्केट व्हॅल्यूएशन ९,२७३ कोटी झाली आणि सुधीर जाटिया यांचं “उत्तर” सगळ्यांनाच दिसून आलं.
आज Safari ची स्थिती आणखी मजबूत आहे . विक्री १,८०० कोटी, नफा १८५.५७ कोटी, ८०० हुन अधिक प्रॉडक्ट्स आणि ९,३०० टचपॉइंट्ससह. कंपनीची मार्केट व्हॅल्यूएशन आता १०,७३४ कोटींवर पोहचलं आहे आणि Safari आज भारतातील सर्वात वेगाने वाढणारी लगेज कंपनी म्हणून ओळखली जाते.
आणखीन वाचा:
- मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
- ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.
- इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत




