उद्योजकतासोप्या भाषेत... बिझनेस

तुमचा बिझनेस हा नेहमी Updated असणं गरजेचं आहे.

व्यवसाय! हा शब्द उच्चारला की संपूर्ण सोशल मीडिया पटकन डोळ्यासमोरून तरळून जातो. व्यवसाय असा करा, तसा करा, तुम्ही अमकं केलं पाहिजे, तमकं केलं पाहिजे. अशा सतरा गोष्टी आणि या गोष्टी सांगणारे अठरा गुरु.

खरं सांगायचं झालं तर बिझनेस शिकवून किंवा वाचून शिकता येत नाही. तो करताना येणारे अनुभव आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातात. अत्यंत समर्पित वृत्तीने झोकून देऊन बिझनेससाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. बिझनेसची संपूर्ण रचना आणि व्यवस्था यावर नीट अभ्यास करून शुभारंभ केला की मागे वळून पाहण्याची गरज नाही.

जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बिझनेस सुरू करता, तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळात तुमचा चांगला जम बसलेला असतो. तुम्ही मन लावून आणि लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करत असता, पण जेव्हा तुमचा बिझनेस ग्रो होतो आणि तुम्हाला सगळेजण एक यशस्वी बिझनेसमन म्हणून बघायला लागतात, तेव्हा नेमकं असं होतं की; आपल्या बिझनेसपेक्षा आपण बाकीच्या गोष्टींवर जास्त लक्ष देतो. ते म्हणतात ना, यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणं फार जास्त अवघड असते. अगदी याच म्हणीप्रमाणे बिझनेसचा जम बसायला लागल्यानंतर आपले लक्ष विचलित होते आणि कळत नकळत आपण रोज वेगवेगळ्या चुका करायला लागतो. या चुका जेव्हा एक मर्यादा गाठतात, तेव्हा तुमच्या बिझनेसला उतरती कळा लागली म्हणून समजा.

नेमकं याच विषयावर आपण या लेखामध्ये बोलणार आहोत. तुम्ही जेव्हा नुकताच बिझनेस सुरु केलेला असतो, तेव्हा तो तुमच्या ग्राहकांसाठीही नवीन असतो. अशावेळी तुमची आणि तुमच्या प्रॉडक्टची त्यांना आणि त्यांची तुम्हाला नुकतीच ओळख झालेली असते. सगळं नवीन नवीन असताना दोन्हीकडून समजुतदारपणा दाखवला जातो. पण जेव्हा हा सगळा नवा काळ ओसरून जातो, खरी मजा तेव्हा सुरु होते. बिझनेसमध्ये तोचतोचपणा येऊ नये यासाठी तुमची कसरत सुरु होते. त्यामधीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉडक्टचा दर्जा कायम टिकवून ठेवणे.

उदाहरण म्हणून आपण एक गोष्ट घेऊ. गोपाळला खाद्यपदार्थांचा भलताच नाद होता. एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ तो नेहमीच सर्वांसाठी बनवायचा. हळूहळू त्याचे हे पदार्थ त्याच्या नातेवाईकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले आणि त्यासोबत गोपाळसुद्धा लोकप्रिय होऊ लागला. अशातच त्याच्या सर्व मित्रांनी त्याला इडलीचा व्यवसाय सुरु करण्याचा आग्रह केला. स्वतःचे हे नवे स्वप्न आणि थोडाफार अनुभव घेऊन इडलीच्या व्यवसायात गोपाळने एन्ट्री केली. बघता बघता त्याचा व्यवसाय त्याच्या हाताच्या उत्कृष्ट चवीमुळे सर्वदूर प्रसिद्ध झाला. ज्यामुळे त्याच्याकडे ग्राहकांची संख्या प्रचंड वाढू लागली आणि त्याच्यावर कामाचा ताण वाढू लागला. या वाढत्या गर्दीबरोबर त्याने त्याच्या सोबतीला कामासाठी कोणीच व्यक्ती ठेवली नसल्यामुळे इडलीच्या चवीवर, सर्व्हिसवर प्रचंड परिणाम होऊ लागला. ज्यामुळे त्याचा व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आला.

गोपाळच्या या गोष्टीवरून आपण काय शिकलो? कळत नकळत चुका होत जातात, वेळीच त्या सुधारल्या जात नाहीत, त्याकडे पाहिलं जात नाही आणि या दुर्लक्षामुळे व्यवसाय कोलमडून पडू शकतो. म्हणजेच काय व्यवसायाची सुरुवात झाल्यांनतर एकदा जम बसला की त्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी गरजेनुसार जे बदल करणे महत्वाचे आहे, त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे.

गोपाळचे उदाहरण घेतले, तर नेमक्या कोणत्या चुका झाल्या ते आपण पाहूया. जेव्हा तुमचा बिझनेस वेगाने प्रगती करत असतो, तेव्हा बिझनेसच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेक प्रकारचे बदल अपेक्षित असतात, हे बदल करत असताना बिझनेसच्या प्रॉडक्टवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. गरजेनुसार मनुष्यबळ वाढवणे, कामाची रचना नीट लावणे, सर्व कामं शिस्तीने पूर्ण होत आहेत ना याकडे लक्ष देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून वैयक्तिकपणे याकडे नीट लक्ष देणे. हे सगळं जमून आलं की, दर्जा टिकून राहतो आणि ग्राहकांचा उत्साहदेखील.

थोडक्यात काय, तर तुमचा बिझनेस हा नेहमी updated असणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं व्यावसायिक म्हणून किंवा ग्राहक म्हणून अजून कोणते बदल तुमच्या दृष्टीने करणे गरजेचे आहे. आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button