व्यवसाय : छोट्या गोष्टी, मोठा परिणाम
सध्या लोकांचा कल या बिझनेस किंवा व्यवसाय या क्षेत्रात वाढताना जास्त दिसतोय. व्यवसाय करून स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करण्यावर अनेकांचा भर दिसून येतो आहे. उद्योजक व्हा आणि आपली स्वप्नं पूर्ण करा किंवा मोठी स्वप्नं पूर्ण करायची असतील, तर उद्योजक व्हावे लागेल असे मोटिव्हेशनल डायलॉग वाचून सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणात उद्योगाकडे वळताना आपल्याला दिसत आहे.
व्यवसाय किंवा उद्योग सुरु करताना तुमच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी असणे गरजेचे आहे. आता हा अनुभव एकतर तुम्हाला तुमच्या घरातच परंपरेने चालत आलेल्या व्यवसायात मिळू शकतो किंवा त्यासाठी काही काळ एखाद्या ठिकाणी नोकरी करून तुम्ही तो मिळवू शकता. अनेक संस्थांमध्ये तुम्हाला व्यवसायाचे परिपूर्ण आणि शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन तयार केले जाते. हे सर्व आजमावल्यानंतर तुम्ही नेमकी व्यवसायाला सुरुवात करता, तेव्हा मात्र तुम्हाला वेगळेच अनुभव येतात. एकाच आजारावरील औषधाची मात्रा सर्वांना एकसारखी लागू पडत नाही तसेच व्यवसाय किंवा उद्योग ठराविक अशा एकाच मार्गाने चालवता येत नाही. प्रत्येकाच्या अनुभवातून तो वेगवेगळ्या पद्धतीने फुलवता जरूर येतो. यासाठीच व्यवसाय करताना काही टिप्सची गरज पडते.
या टिप्स म्हणजे कोणतं व्यवसाय पुराण नसून अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला तुमचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्याची व्यापकता वाढवण्यासाठी कामी येऊ शकतात.
व्यवसायाच्या अगदी सुरुवातीपासून बोलायचे झाल्यास व्यवसायाची सुरुवात करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा जो बिझनेस प्लॅन तयार करत असतो, तो बिझनेस प्लॅन इन डिटेल प्रत्येकासोबत शेअर करू नका. कदाचित तुमचा हा बिझनेस प्लॅन पूर्णपणे चोरीला जाऊ शकतो आणि त्याचा तुम्हाला नाहक मानसिक किंवा आर्थिक त्रास सहन करावा लागू शकतो. योग्य आणि भरवश्याच्या व्यक्तींना हा प्लॅन दाखवा आणि गरज असेल तर सुधारणा करा…
सुरुवातीला येणाऱ्या अनुभवांमध्ये निरीक्षणास येणाऱ्या चुका लक्षात घेऊन त्या चुका पुन्हा पुन्हा होणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सुरुवातीला तुमच्या पदरात अपयश आले, तर त्याला अनुभव म्हणून पाठीशी घ्या आणि चुकांची पुनरावृत्ती न करता, यशस्वी व्यवसाय करण्यासाठी सातत्य ठेवा.
एखादा व्यवसाय सुरु करत असताना आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईंकांमध्ये आपले अनेक हितचिंतक असतात ज्यांना आपल्यासोबत यायचे असते, अशा काही विश्वासू लोकांना भागीदार किंवा गुंतवणूकदार म्हणून सोबत घेऊ शकता. यामुळे तुमच्या व्यवसायाला अधिक बळ मिळू शकते. त्यासोबतच आपल्या व्यवसायात आपण एकटेच जर सगळ्या प्रकारची व्यवस्था आणि काम करत असू, तर त्यामुळे आपल्या व्यवसायाच्या प्रगतीची गती कमी होऊ शकते. एकाचवेळी व्यवसायाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल, तर एक ग्रुप म्हणून अनेक सभासदांना सोबत घेऊन तम्ही व्यवसाय सुरु ठेऊ शकता.
एकत्र येऊन एक ग्रुप म्हणून काम करत असताना संघटनात्मक वृत्तीतून व्यवसायातले अनेक विभाग एकाचवेळी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले जाऊ शकतात. व्यवसाय सुरु केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय सुरु केला आहे, तेथील स्थानिकांना व्यवसायात सामावून घ्या. यामुळे व्यवसायाच्या अनेक लहान मोठ्या गरजांसाठी स्थनिकांच्या मदतीमुळे कमीतकमी खर्चात अनेक प्रकारची कामं पूर्ण होऊ शकतात. व्यवसायाच्या सुरुवातीला आणखी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे पैशांची आगाऊ व्यवस्था. अगदी सुरुवातीच्या काळात तुम्हाला अपेक्षित असा व्यवसाय किंवा नफा नाही झाला, तर तूट भरून काढण्यासाठी गाठीशी पैशांची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे असते. व्यवसाय सुरु केल्यानंतर ज्या नावाने आपण व्यवसाय सुरु केला आहे त्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यवसायाने थोडीशी गती मिळवल्यानंतर आपण त्याचा ऑनलाईन मार्केटिंगचा उत्तम प्लॅन बनवणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी एखाद्या वेबसाईटचा तसेच सोशल मीडियाचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याकडे आपण कळत नकळत दुर्लक्ष करू शकतो ती गोष्ट म्हणजे कायदेशीर बाबी. व्यवसाय सुरु होताच स्थानिक आणि राज्य यांचे कर कशापद्धतीने आहेत ते समजून घेऊन त्याप्रमाणे सर्व तरतूद करणे गरजेचे आहे.
तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही काही कर्मचारी घेतले असतील, तर त्यांच्याकडे लक्ष देणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या जर काही समस्या असतील तर त्या आणि त्यांच्यासाठी योग्य व मूलभूत सुविधा देणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा रीतीने अगदी सुरुवातीपासून व्यवसायाच्या लहान-लहान गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष दिले तर व्यवसायाची प्रगती आणखी जोमाने नक्कीच होऊ शकते.
बाकी तुम्हाला आजचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर लेखला like आणि share करा channel ला subscribe करा.