Harshit Godha Success Story: Avocado Farming ने कमावले कोट्यवधी


Avocado Farming: युवा शेतकरी हर्षित गोधा हे मुळचे मध्य प्रदेशमधील भोपाळचे. मूळचे भोपाळचे असलेले हर्षित यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वकिलीची असली, तरी त्यांना मात्र स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती.
ब्रिटनमध्ये डिग्रीचे शिक्षण घेऊन त्यांनी स्वत:च्या मातीत प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून एव्होकॅडोची शेती करण्यास सुरुवात केली.
ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना हर्षित यांना एव्होकॅडो या फळाबद्दल माहिती मिळाली आणि त्या फळाचे आरोग्यविषयक फायदे त्यांच्या लक्षात आले. अधिक माहिती घेतल्यावर हे फळ इस्त्राईलमध्ये पिकवले जाते हे त्यांच्या लक्षात आले. इंग्लंडसारखा देश हे फळ इस्त्राईलमधून आयात करत आहे म्हणजे नक्कीच या इस्रायली एव्होकॅडोमध्ये काहीतरी खास आहे.
सामान्यतः एव्होकॅडो या फळाच्या वाढीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. परंतु इस्राईलसारख्या कोरड्या आणि उष्ण देशामध्ये एव्होकॅडो कसे वाढू शकतात यावर आश्चर्यचकित होऊन हर्षित यांनी अधिक संशोधन सुरू केले.
अभ्यासाअंती हर्षित यांच्या लक्षात आले की इस्त्राईलने परिस्थितीवर मात करत आणि समस्यांवर उपाय शोधत यशस्वी शेती केली आहे आणि त्याचे अनेक संकरित वाण देखील तयार केले आहेत
इस्त्राईलसारख्या उष्ण वातावरणात जर ही शेती होऊ शकते तर आपण देखील का करू नये? हा विचार त्यांच्या डोक्यात चमकला.
त्यांनी इस्त्राईलमध्ये जाऊन या शेतीविषयी अभ्यास केला, तेथील शेतकऱ्यांकडून आवश्यक प्रशिक्षण देखील घेतले.
प्रशिक्षण घेतल्यानंतर हर्षित यांनी ॲव्होकॅडोच्या रोपांची इस्त्राईलमधून भारतात आयात केली. आयात प्रक्रियेत देखील हर्षित यांना बऱ्याच अडचणी आल्या.
Avocado Farming: 2019 मध्ये Order केलेली रोपं त्यांना 2021 मध्ये प्राप्त झाली. यानंतर मात्र हर्षित यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सध्या 28 वर्षीय हर्षित यांनी 100 एकर जमिनीवर ॲव्होकॅडोची लागवड केली असून त्यातून त्यांना 10 कोटींचे वार्षिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. आज हर्षित संपूर्ण भारतात ॲव्होकॅडोची रोपे विकतात आणि करोडोंची उलाढाल करतात.
शेती करणं हे केवळ कमी शिक्षण असलेल्या गावाकडील लोकांचं काम आहे अशी समजूत असणाऱ्यांच्या डोळ्यात हर्षित यांनी त्यांच्या कर्तृत्वाने झणझणीत अंजन घातलं आहे.
आणखी वाचा:
- शेअर बाजारातील करिअर आणि व्यवसाय संधी
- कशी करावी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक?
- भविष्यात आर्थिक टेन्शन नको असेल, तर ‘या’ 5 सवयी पाळा



