यशस्वी उद्योजक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे गुण

जर तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल, तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालतील, पण असावेतच. नसतील, तर ते सरावाने व माहिती घेऊन विकसित करावेत. मी असे अत्यंत महत्वाचे ३० गुण देत आहे :
१) डोमेन एक्सपर्ट :
उद्योजक हा आपल्या क्षेत्रातील डोमेन एक्सपर्ट असला पाहिजे. तो ज्या क्षेत्रात व्यवसाय करतो त्या क्षेत्राची माहिती त्याला हवी. त्या क्षेत्रातील ज्ञानी म्हणून त्याची मार्केटमध्ये ओळख हवी. तेव्हाच तो आपल्या क्षेत्रातला एक आघाडीचा व्यावसायिक मानला जाईल.
२) अस्वस्थ :
यशस्वी व्यावसायिक हा कधीही एका ठिकाणी स्वस्थ बसत नाही, काही ना काही व्यावसायिक कुरापती चालू असतातच. स्वस्थ बसेल तो उद्योजक कसला? यशस्वी उद्योजक वर्षाचे ३६५ दिवस, २४ तास सतत व्यस्त व अस्वस्थ असतो. तो सतत असमाधानी असतो, त्याला अजून पुढे जायचे असते.
३) रीचेबल :
हा आपले लोक व व्यवसायासंबधी जे कोणी आहेत, त्यांच्यासाठी नेहमी रीचेबल असतो, फोनद्वारे, इमेलद्वारे, व्हॉटसअपने व प्रत्यक्ष भेटण्यासाठी. हा कोणत्याही व्यवसायिकांचा अत्यंत महत्वाचा गुण आहे, व्यावसायिक अधिक मोठा असल्यास त्याचे पी. ए. व पी. आर. ओ. असतात.

४) प्रवासी :
यशस्वी व्यावसायिक हा प्रवासी असतो. तो जेव्हा संधी मिळेल, तेव्हा देश विदेशात प्रवास करत असतो. प्रवासामुळे आपणास अनेक संधी, कल्पना सुचतात. त्याचा आपल्या व्यवसाय वाढीसाठी खूप उपयोग होतो, तेव्हा प्रवासाची आवड असावी.
५) शिस्तशीर :
तो खूप शिस्तशीर असतो. त्याच्या जीवनात व व्यवसायात अस्ताव्यस्तपणा नसतो. सर्व काही जिथल्या तिथे असते, मग ते ऑफिस असो, घर असो, गाडी असो किंवा इतर कोणतीही गोष्टी. व्यवस्थितपणा हा खूप महत्वाचा गुण आहे.
६) व्यवहार कौशल्यता :
कोणत्या गोष्टीला किती पैसे द्यायचे? कोणामागे किती वेळ घालवायचा? पैसे कोठे वाचवायचे व कोठे खर्च करायचे? इत्यादी व्यवहारात चाणाक्षपणा असायला हवा.
७) निर्लज्जपणा व बिनधास्त :
व्यावसायिक आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी, तो लोकांना सांगण्यासाठी अत्यंत निर्लज्ज व बिनधास्त असावा. माझा एक व्यावसायिक मित्र त्याच्या नवीन उत्पादनाबद्दल स्मशानात माहिती देत होता. तेव्हा प्रसंग कोणताही असो, आपल्या व्यवसायाबद्दल निर्लज्जपणे काम करा.

८) अर्थिक साक्षरता :
पैसा, गुंतवणूक, अर्थसहाय्य, कर्ज, सबसिडी, कर, शेअर्स, खेळते भांडवल, अकाउंटिंग, फायनान्स इत्यादी सर्वांबद्दल चांगली माहिती ही उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.
९) अत्यंत आवड :
व्यवसाय व उद्योग हा नोकरीसारखा नसतो. ती थोडावेळ लागली म्हणून करण्याची गोष्ट नव्हे, ती एक स्वत:हून स्वीकारलेली जीवनपद्धती असते. तुम्हाला उद्योगाच्या जीवनपद्धतीची अत्यंत आवड असावी.
१०) गंभीर :
यशस्वी व्यावसायिक आपले काम, उत्पादन, उद्योग इत्यादी सर्व गोष्टीबद्दल अत्यंत गंभीर असतो, त्याला थोडादेखील हलगर्जीपणा चालत नाही.
११) प्लॅनिंग :
तो अत्यंत चांगला प्लॅनर असतो, तो स्वतःच स्वतःच्या जीवनाचा आर्किटेक्ट असतो. प्लॅनिंग हे शास्त्र आहे, ते शिकून घेऊन आपण तसे गुण डेव्हलप केले पाहिजेत.
१२) विपणन तज्ञ :
त्याला मार्केटिंग व जाहिरात क्षेत्रातील चांगले ज्ञान असते. मार्केटिंग व जाहिरात हा त्याचा अंगभूत गुण झालेला असतो. मार्केटिंग हा कोणत्याही व्यावसायिकासाठी अत्यंत महत्वाचा गुण आहे.
१३) सकारात्मक :
त्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असतो. नाही हा शब्द त्याच्या शब्दकोशात नसतोच. जसे ‘दुनिया उम्मीद से चलती है’, तसे उद्योग उद्योजकाच्या सकारात्मक गुणावर चालतो.
१४) तंत्रज्ञानी :
आजच्या युगात टेक्नॉलॉजीची माहिती असणे अनिवार्य झाले आहे, आपल्या व्यवसायासाठी व प्रगतीसाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजीची त्याला चांगली माहिती असते.
१५) विश्वासार्हता :
त्याची खूप मोठी विश्वासार्हता मार्केटमध्ये असते. त्याच्या शब्दाला खूप मोठा मान व भरोसा असतो. केवळ शब्दावर कोट्यावधीचा माल उधार मिळतो. तेव्हा स्वत:च्या शब्दाला मोठी किंमत निर्माण केली पाहिजे.

१६) सहभागी :
हा समाजातील, व्यवसायातील बऱ्याच संघटना, मित्र, कुटुंबे यांच्याशी संबंधित व सहभागी असतो. तो एकटा राहत नाही. तो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कार्यक्रमांत आवर्जून सहभागी होतो.
१७) ग्राहक जाणकार :
हा व्यवसायाचा की-पॉईंट आहे. जो आपल्या ग्राहकांना, श्रोत्यांना चांगला जाणतो. त्यांना केव्हा काय हवं आहे, ते तो जाणतो व अत्यंत यशस्वी होतो. हा गुण अनुभवाने व अभ्यासाने डेव्हलप होतो.
१८) स्वतःमध्ये गुंतवणूक :
व्यायाम, अभ्यास, ट्रेंनिग, तंत्रज्ञान इत्यादी शिकण्यामुळे स्वतःचा वेळ व पैसा कारणी लागतो व स्वत:चे व्यक्तिमत्व सतत प्रगल्भ बनवत राहतो.
१९) हॉलीडे मॅन :
स्वत:चे जीवन व कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी वर्षातून काही दिवस सुट्टी घेवून फिरायला जातो. कामाचा ताण कमी करून तो मन फ्रेश करून परत येतो. तेव्हा थोडा थोडा हॉलीडे ब्रेक हा गरजेचा गुण आहे.
२०) डेलीगेशन :
काम सोपवण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते, कोणाला कोणते काम सांगायचे व कसे करून घ्यायचे हे त्याला माहीत असते. यालाच ‘आर्ट ऑफ डेलीगेशन’ म्हणतात.
२१) सातत्य :
कोणतेही काम, उत्पादन, व्यवसाय यात कमालीचे सातत्य असते. एखादे काम उत्साहाने कित्येक वर्षे, दशके तो चालवतो, वाढवतो. तेव्हा सातत्य हा मोठा गुण यशस्वी उद्योजकांत दिसून येतो.
२२) दूरदृष्टी :
त्याला पुढील ५, १०, २० वर्षांनंतरच्या गोष्टीचा सेन्स असतो. आज काय करावे, म्हणजे पुढील काही वर्षात आपल्याला फायदा होईल, याचा सेन्स त्याला असतो व तसे तो निर्णय आजच घेतो. यालाच दूरदृष्टी म्हणतात.

२३) मोटीव्हेटर :
तो खूप चांगला मोटीव्हेटर असतो. तो लोकांना, कर्मचाऱ्यांना, मित्रांना सतत प्रेरणा देत असतो. त्याला बघितल्यावर आजूबाजूच्या लोकांना उत्साह येतो. त्याच्या डोळ्यात एकप्रकारचे तेज असते.
२४) स्वप्नाळू :
तो सतत स्वप्नं पाहतो. स्वप्नं पाहणे व ती सत्यात उतरवणे हा जणू काही त्याचा छंद असतो. आज सायकलवरून फिरणारा उद्योजक कारची स्वप्नं बघतो व पुढील २-३ वर्षात तो कारने फिरतो. तेव्हा स्वप्नं पहा.
२५) खवय्या :
हा खूप चांगला खवय्या असतो. चांगले चांगले पदार्थ शोधणे, ते खाणे याचा तो शौकीन असतो. त्याला नेहमी आवडीचे व चटकदार खाण्याची सवय असते.
२६) रिस्क टेकर :
रिस्क घेण्याची तयारी नेहमी असावी लागते. खूप विचार करणारा, घाबरणारा व्यक्ती कधीही उद्योजक होऊ शकत नाही. तेव्हा रिस्क टेकिंग हा खूप महत्वाचा गुण असावा लागतो.

२७) दुर्दम्य आत्मविश्वास :
आपल्या कामावर, उत्पादनावर, व्यवसायात व स्वतःवर अत्यंत दुर्दम्य आत्मविश्वास असतो. कोणत्याही परिस्थितीत आपली योजना व उद्योग यशस्वी होणारच असा त्यांचा कमालीचा विश्वास असतो.
२८) स्वीकारणारा :
नवीन येणाऱ्या गरजेच्या गोष्टी तो परत शिकतो व स्वीकारतो. त्यासाठी स्वत:च्या विचारसरणीत पटकन बदल करतो. तो जगाबरोबर ताबडतोब स्वतःला बदलतो व अपडेट राहतो.
२८) संवादक :
याचे कम्युनिकेशन स्किल खूप चांगले असते. आपले म्हणणे दुसऱ्याला कसे पटवून सांगायचे, आपले काम कसे काढून घ्यायचे हे यांना चांगले माहित असते. तेव्हा चांगला संवादक असणे हा महत्वाचा गुण आवश्यक आहे. मग संवाद फोनद्वारे असो, इमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष.
३०) सेल्फ आणि फास्ट स्टार्टर :
एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर ती स्वतः व पटकन सुरुवात करतो. तो विचार करण्यात, ठरविण्यात फारसा वेळ घालवत नाही. फटाफट सुरुवात करणे हा त्याचा गुण आहे, त्याला फास्ट मुव्हर म्हणतात. बाकीचे लोक काय करायचे व कसे करायचे याचा विचार करतात, तेवढ्या वेळेत उद्योजक काम सुरू करून बराच पुढे निघून गेलेला असतो.
महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा, मराठी मुलं उच्चतम स्पर्धेत यशस्वी व्हावीत यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
आणखी वाचा
- जगप्रसिद्ध अंतराळ संशोधक स्टीफन हॉकिंग यांचा आज जन्मदिन.
- यंत्रांनाच देव मानणारा भक्त – बाबा कल्याणी
- Small Business Marketing Strategy: तुमच्या बिझनेसला ‘असे’ करा सुपर बुस्ट