दिनविशेष

अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती. विनम्र अभिवादन!

त्यांचे खरे सामर्थ्य कीर्तनात होते. वास्तविक संत गाडगेबाबा अडाणी होते, शिकलेले नव्हते. त्यांना आपली स्वाक्षरीसुद्धा करता येत नव्हती. पण त्यांच्या जिभेवर मात्र तुकोबांचे अभंग नाचत असत. त्यांचा वेशही साधाच होता. अंगावर फाटक्या चिंध्या, एका हातात खराटा आणि दुसर्‍या हातात मडक्याचे फुटके खापर घेऊन संत गाडगेबाबा गावोगावी कीर्तन करत फिरत असत.

250px Maharaj Baba

ते ज्या गावात जात त्या गावातले रस्ते पहिल्यांदा खराट्याने साफ करत आणि रात्रीच्या वेळेला कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत. एरवी कोणाशी न बोलणारे बाबा कीर्तनासाठी उभे राहिले की; शब्दांचा, साहित्याचा सद्विचारांचा असा काही मारा करत की; ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. मुखाने देवाचे नाव घेत गावोगाव बाबा फिरत, दिसेल त्या गावातील रस्ते, गटारे, देवालये, नद्यांचे घाट कोणाशीही न बोलताच ते स्वच्छ करू लागत. तसे करताना त्यांना पाहिल की , गावातील इतर माणसे आपापली कुदळ, फावडी, टोपल्या, खराटे घेऊन बाबांच्या मदतीला येत असत.

संत गाडगेबाबांनी जाणले होते की, समाजातील लोक अज्ञानी, अंधश्रद्धाळू आहेत. त्यांना दगडात परमेश्वर दिसतो, परंतु माणसातला देव दिसत नाही. भूत, भानामती, करणी, जादूटोणा यावर लोकांचा दाट विश्वास आहे. समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. भयाण दारिद्र्याची कारणे केवळ व्यसन व रोगराई नसून निरक्षरता, अंधश्रद्धा हीच आहेत. म्हणून रोग, गरिबी, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध गाडगेबाबा जन्मभर लढले. व्यसन संपले की गरिबी संपणार, व्यसन संपले की रोगराई संपणार म्हणून प्राण्यांची हत्या करू नका, कर्ज काढू नका, भोंदू गुरूकडून मंत्र घेऊ नका, हाच मंत्र गाडगेबाबांनी दिला.

संत गाडगेबाबांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा, गोरक्षण संस्था व शाळा- कॉलेजेस काधली. त्यांच्याजवळ पोथी नव्ह्ती. पूजा-अर्चा करा, असा उपदेश नव्हता. त्यांचे कीर्तन दु:खितांसाठी व अज्ञानासाठी होते. परखड कीर्तनातून सार्‍या महाराष्ट्राला उपदेश केला. अनेक धर्मशाळा बांधून यात्रेकरूंसाठी सोय त्यांनी केली. दु:ख , दारिद्र्य व अज्ञान दिसताच तिथे ते धावून जात. त्यांनी देशाला व समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. ‘ गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाने ते लोकांना मंत्रमुग्ध करत.

संत गाडगेबाबा म्हणजे एक क्रांतिसूर्य होय. माणसाने माणसाला कमी लेखावे यासारखा अधर्म नाही. ब्राम्हणापासून महारापर्यंत सगळी माणसे एकच आहेत. ‘ कोंबडे- बकर्‍या खाणारा देव नसून सैतानच आहे’ हे बाबांचे मत. गाडगेबाबा म्हणजे मानवतावादी स्वाभिमान शिकवणारे अदभूत संत! भोळ्याभाबड्या लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी केले ते म्हणतात,’ देव देवळात नाही, दगडात नाही. माणसात आहे.’ पन्नास वर्षे गाडगेबाबांनी लोकांना आवर्जून सांगितले की, बाबांनो, दगडधोंड्यांची पूजा करून काहीही मिळणार नाही. माणसांची पूजा करा. मानवतेची पूजा करा.

640px Gadge Maharaj and Tukdoji Maharaj

बाबांचे कीर्तन अशिक्षितांसाठी होते. तसेच तथाकथित सुशिक्षितांसाठीही होते, दु:खितांसाठी होते. त्यात योग नव्हता, अध्यात्मवाद नव्हता, पोथी नव्हती, पुराण नव्हते, देवांची वर्णने नव्हती, त्यात पूजा-अर्चा यांचा उपदेश नव्हता. त्यात शुद्ध जीवन होते. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रुढीखाली भरडून निघालेल्या दूधखुळ्या, भोळ्या आणि हीन-दीन समाजांच्या उद्धाराचा धगधगीत प्रकाशझोत म्हणजेच गाडगेबाबांचे कीर्तन.

माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणार्‍या या संताने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण केले. अविश्रांत कीर्तने , धावपळ यामुळे त्यांच्या मजबूत देहावर दगदगीचा परिणाम होऊ लागला. काही अनुयायांच्या काही विचित्र वर्तनांची त्यांच्या मनावर तीव्र परिणाम झाला. मधुमेहाच्या आजारानेही त्यांना जर्जर केले. बाबांनी शेवटी शेवटी अन्नही वर्ज्य करून आमटीचे पाणी व भाजी यावरच आपला निर्वाह चालवू लागले.

collage 1450763080 148238

बाबा म्हणजे माणसात देव पाहणारा मानवतापूजक संतश्रेष्ठ. अमरावती येथे गाडगेबाबांच्या जन्मशताब्दी समारोहात मदर तेरेसा म्हणाल्या, ‘ परमेश्वराने संत गाडगेबाबांसारख्या व्यक्ती निर्माण करून मानवतेवर अनंत उपकार केले आहेत.’ मात्र मानवतावादी गाडगेबाबांकडे आणि त्यांच्या परखड तत्त्वज्ञानाकडे म्हणावे तसे देशाने, त्यांच्या अनुयायांनी , लोकांनी आणि इतिहासानेही लक्ष दिल्याचे दिसत नाही. अशा या मानवतावादी युगप्रवर्तक संताबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’ ते खरे संत आहेत. इतर बुवांपेक्षा गाडगेबाबांसारखे संत आपल्या देशात अधिक झाले पाहिजेत. त्यांना तुमच्या धनाची, मानाची पर्वा नाही. त्यांना समाजपरिवर्तनाचा विचार श्रेष्ठ वाटतो, तेच खरे मानवतादी संत आहेत.’

रंजल्या-गांजल्यांना ‘आपुले’ म्हणणारा आणि अनाथ -अपंगांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू ही तुकोबांची व्याख्या गाडगेबाबांना तंतोतंत लागू पडते. बाबांनी आपल्या उपदेशात म्हटले की, ‘ बाबांनो, दया हा जगातल सर्वात मोठा धर्म आहे.’

कबीर कहे कमालकू सबसे बडी दया |

तीर्थ जावो, काशी जावो, चाहे जावो गया ||

अशा या महामानव युगप्रवर्तकाची प्राणज्योत २० डिसेंबर १९५६ रोजीच्या रात्री मावळली.

— मच्छिंद्र ऐनापुरे

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button