तुम्ही पैशाला जपा, पैसा तुम्हाला जपेल
सध्याच्या सुशिक्षित समाजात मर्यादित उत्पन्न विचारात घेता कुटुंबसुद्धा मर्यादित ठेवण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. त्यामुळं कुटुंबात एक किंवा दोनच मुलं असल्याचं दिसून येतं आणि या मुलांची जास्तीत जास्त काळजी घेऊन त्यांना शक्य तेवढ्या सुविधा देण्याकडं पालकांचा प्रयत्न असतो. पण पोटच्या मुलामुलींप्रमाणे आपल्याला आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव असणारे पालक अभावानेच दिसून येतात. हा गोष्ट म्हणजे पैसा.
पैशाचीसुद्धा मुलांप्रमाणेच जास्तीत जास्त काळजी घेऊन त्याचे योग्य संगोपन करून त्यात वाढ घडवून आणणे गरजेचे असते. विशेष म्हणजे मुले मोठी झाल्यावर नोकरी-व्यवसायामुळे तुमच्यासोबत राहतीलच असे नाही आणि पालक म्हणून त्यांच्या प्रगतीच्या आड न येता त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देणे योग्य असते, पण पैशाची वेळोवेळी आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं. ती कशी घेता येईल हे आजच्या video मध्ये आपण पाहू ज्यामुळे त्याचे संगोपन केले, तर त्यात वृद्धी तर होईलच आणि आपल्या retirement नंतर तो आपली निश्चितच काळजी घेईल.
१. Retired Life साठी नियोजन हवं
समजा, आज तुमचे वय ३० वर्षे आहे. वयाच्या ६०व्या वर्षी नोकरी व्यवसायातून तुम्ही Retire होणार आहात असे गृहीत धरल्यास retirement नंतर आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल; तर आजपासूनच आपल्या पैशाची जपणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपल्याकडे किती पैसे असणे आवश्यक आहे याचा अभ्यास करून त्यानुसार आवश्यक ती गुंतवणूक नियमित करण्यास शक्य तितक्या लवकर सुरुवात करावी. उदाहरणार्थ, सध्या कुटुंबाच्या दरमहा खर्चासाठी ५०,००० रुपये लागत असतील, तर रिटायरमेंटनंतर जरी मुलांसाठीचे काही खर्च कमी झाले तरी वैद्यकीय खर्च या वयात वाढणार आहे. म्हणजेच ३० वर्षांनी आजच्या ५०,००० रुपयांची गरज भागविण्यासाठी आत्ताचा वाढता महागाई दर बघता त्या वेळचे सुमारे अडीच लाख रुपये दर महिन्याला मिळणे आवश्यक ठरेल.
२. गुंतवणुकीला लवकर सुरुवात व सातत्य आवश्यक
कमी वयात गुंतवणूक सुरू करणे आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या गरजांचा आढावा घेऊन त्या नियोजनात सतत सुधारणा करत राहणे गरजेचे असते. आर्थिक नियोजन जितक्या लवकर करू, तितका गुंतवणुकीसाठी जास्त कालावधी मिळत असल्याने कमी गुंतवणूक करून, उद्दिष्टपूर्तीसाठीची तरतूद करणे सोपे होते. नियोजनास उशीर झाल्याने बऱ्याचदा कमी वेळेमुळे पुरेशी तरतूद करणे शक्य होत नाही.
३. विम्याचे कवच गरजेचेच :
या नियोजनात काही कारणाने व्यत्यय आला, तर व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक असते. यासाठी शक्य तितक्या लवकर मुदतीचा जीवन विमा अर्थात टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ पट भरेल इतके कवच असलेली टर्म पॉलिसी घ्यावी. सोबतच सुरुवातीस किमान तीन लाखांचे कवच असणारी आरोग्य विमा (मेडिक्लेम) पॉलिसी घ्यावी. पुढे दर पाच वर्षांनी साधारण एक लाखाने तिचे कवच वाढवत न्यावे किंवा टॉप-अप पॉलिसी घ्यावी.
४. इच्छापत्र :
आपले आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने ही रक्कम पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. मात्र आपल्या पश्चात आपल्या मर्जीनुसार वाटप व्हावे यासाठी वेळीच ‘विल’ म्हणजेच इच्छापत्र तयार करून घ्यावे. अशा रीतीने पैशाचे योग्य ते नियोजन केल्यास सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्वातंत्र्य अबाधित राहून आपल्याला सेवानिवृत्तीचा आनंद स्वेच्छेने उपभोगता येईल.