उंच उंच डोंगर, चहू बाजूंनी असलेली मोठी झाडी, स्लो मोशनमध्ये पडत असलेला बर्फ, अंग गोठवणारी थंडी अशा या गुलाबी थंडीत एक जोडपं वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेत आहे…. आहाहाऽऽ! पिक्चरमध्ये येणारे असे सीन्स पाहून तुम्हीसुद्धा हिरो हिरोईनच्या जागी स्वतःला imagine केलंच असेल. तुम्हालाही वाटत असेल की आपणसुद्धा जावं अशा ठिकाणी, आनंदाचे चार क्षण जगावे; पण परदेशी जाऊन एवढे पैसे घालवण्याऐवजी तुम्ही तो plan cancel करता आणि इथंच “The End” होतो! पिक्चरचा नाही ओ… तुमच्या फिरायला जायच्या plan चा! पण रील टू रिअल लाईफ मध्ये जर तुम्हाला हा सीन अनुभवायला मिळाला तर? आणि तेही आपल्या मायभूमीत… भारतात! आनंद होईल की नाही? चला मग उपजत निसर्गसौंदर्य लाभलेलं हे ठिकाण कोणतं आहे हे पाहूया आजच्या लेखात…
मित्रांनो आपल्याला माहितीच आहे हिमाचल प्रदेश हे आपल्याकडचं असं ठिकाण आहे जे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकालाच आकर्षित करत आलंय. इथलं निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक इथं येत असतात. इथं वेगवेगळे फेमस टूरिस्ट स्पॉट्ससुद्धा आहेत. रोजच्या गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्य अनुभवायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं आणि अशाच शांततेचा जर तुम्हालाही अनुभव घ्यायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातल्या खजियारला तुम्ही नक्कीच भेट द्यायला हवी. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारला अलौकिक निसर्गसौंदर्य लाभलं आहे.
खजियार हा तलाव हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामध्ये समुद्र सपाटीपासून 1,920 मीटर उंचावर आहे. याच्या चारही बाजूंना असलेल्या देवनार वृक्षांची तलावाच्या निळ्याशार पाण्यामध्ये सुंदरशी प्रतिमा उमटते. इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, तलावामध्ये तरंगणारा गवताचा गुच्छ. निळ्याशार पाण्यामध्ये तरंगणारा हा गुच्छ पाहायला खूप सुंदर दिसतो. खजियारमध्ये गेल्यानंतर तेथील निसर्गसौंदर्य पाहून तुम्हाला एक क्षण खरंच वाटेल की तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये आला आहात की काय.
खजियारच्या या मखमली प्रदेशात एका बाजूला बाराव्या शतकातील लाकडातील कोरीव कारागिरीचं “खज्जिनाग मंदिर” असून, त्याच्या गर्भगृहात नागदेवतेची मूर्ती आहे. १६व्या शतकात राजा बलभद्र बर्मनने येथे पांडवांच्या लाकडातील मूर्ती उभारल्या. राजा पृथ्वीसिंग यांची धार्मिक प्रवृत्तीची दाई “बाल्टू” ने १७ व्या शतकात या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. “मिनी स्वित्झर्लंड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारमध्ये तुम्ही adventure ही करू शकता. इथं तुम्ही Paragliding पासून ते Horse Riding पर्यंत अनेक वेगवेगळ्या activities करू शकता. एवढचं नाही तर खजियारमध्ये तुम्ही trekking चाही अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक गेस्ट हाउसही आहेत. इथं तुमच्या राहण्याची उत्तम सोय होऊ शकते.
खजियारला जाणार कसं?
चंबा किंवा डलहौसीपासून खजियार फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. खजियारला पोहोचण्यासाठी शिमलापर्यंत रेल्वे मार्गाने किंवा फ्लाइटने तुम्ही जाऊ शकता. यानंतर तुम्हाला बस किंवा टॅक्सी घेऊन खजियारपर्यंत पोहोचता येईल. याव्यतिरिक्त खजियारसोबतच हिमाचल प्रदेशातील इतरही अनेक वेगवेगळ्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
आणखी वाचा
- दांडेली अभयारण्य: कर्नाटकातील नैसर्गिक सौंदर्याचा खजिना
- तीर्थन व्हॅली : याहून सुंदर अजून काय?
- महा सौंदर्य महाराष्ट्राचं !