उद्योजकताबिझनेस महारथी

इंग्रजांच्या घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून ठेवणारा सांगलीचा पठ्ठ्या

कोण होता कोण हा तरुण? तो कोणी क्रांतिकारक नव्हता, की स्वातंत्र्यसेनानी नव्हता. तो होता सांगलीतील तासगावातला भालचंद्र गरवारे अर्थातच आबासाहेब गरवारे.

गरवारे म्हटलं की आठवतं ते पुण्यातलं गरवारे कॉलेज आणि गरवारे चौक. यापलीकडे आपल्याला काय माहितीये? मित्रांनो पुण्यातल्या या कॉलेजला गरवारे नाव का दिलं गेलं? ते कॉलेज आबासाहेबांनी उभं केलं का? तर नाही. त्या कॉलेजचे संस्थापक आबासाहेब गरवारे नव्हते, मग का बरं गरवारे नाव दिलं गेलं असेल? जे जाणून घेण्यासाठी आपल्याला शंभर वर्ष मागं जावं लागेल.

वयाच्या 17 व्या वर्षी  गिरगावमध्ये डेक्कन मोटार एजन्सीची स्थापना करून तो जुन्या गाड्या खरेदी-विक्री करणारा एजंट बनला. सोबतच तो स्पेअर पार्ट, टायरची वगैरे विक्री करू लागला. थोड्याच दिवसात या व्यवसायात त्याचा चांगलाच जम बसला. त्याच्या गोडाऊनमध्ये आता गाड्यांना जागा नव्हती. सर्वसामान्य माणसापासून ते मुंबईतल्या राजे-रजवाड्यांपर्यंत सगळेजण डेक्कन मोटार एजन्सीमधून गाड्या घेऊ लागले. मुंबईत गाडी घ्यायचं म्हटलं की, प्रत्येकाच्या ओठांवर फक्त एकच नाव डेक्कन मोटार एजन्सी. एजन्सीचा नावलौकिक वाढला होता. त्यासोबतच भालचंद्र गरवारे मुंबईचे आबासाहेब म्हणून ओळखले जाऊ लागले. आबासाहेबांना पत, प्रतिष्ठा मिळू लागली. खिशात एक रुपयाही नसताना मुंबईत आलेला भालचंद्र आता आबासाहेब झाला होता. ब्रिटिशदेखील आबासाहेबांकडूनच गाड्या विकत घेऊ लागले. 

आबासाहेबांनी केवळ गाड्यांचाच व्यवसाय केला नाही, तर त्यांनी प्लॅस्टिक बनविणारे कारखाने देखील विकत घेतले. ज्याकाळात भारतीयांना प्लॅस्टिक म्हणजे काय? हे देखील माहीत नव्हतं, अशा काळात आबासाहेबांनी भारतात प्लॅस्टिक बटणं, नायलॉन यार्न, प्लॅस्टिक इंजेक्‍शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, नायलॉन ब्रिस्टल्स, फिशिंग नेट अशी प्लॅस्टिकची अनेक उत्पादने घेऊन गरवारे मोटर्स, गरवारे प्लॅस्टिक, गरवारे वॉल रोप्स, गरवारे  नायलॉन्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन अशा अनेक कंपन्यांची उभारणी केली. या व्यापारात त्यांनी भरपूर पैसा कमविला. ज्या गोऱ्यांनी भारतीयांचे जिणे हराम करून सोडले होते. त्या गोऱ्यांची नाचक्की करायचं हे आबासाहेबांनी आधीच ठरवलं होतं. लंडनमध्ये असताना बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन प्रिन्स ऑफ वेल्सची,  इंग्लंडच्या राजपुत्राचीच गाडी विकत घेतली. ती गाडी आणि त्यावर एक गोरा शोफर ठेऊन ते ताठ मानेने लंडनमध्ये फिरू लागले.

जे ब्रिटिश भारतीयांना गुलाम म्हणून वागवत होते, त्याच ब्रिटीशांना आबासाहेबांनी त्यांच्यात घरात घुसून त्यांचेच घर विकत घेऊन, त्यांनाच नोकर म्हणून आपल्या पदरी ठेवून एक स्वाभिमानी, यशस्वी, देशप्रेमी मराठी उद्योजक बनण्याचा मान मिळविला होता. आबासाहेबांनी केवळ उद्योगच केला नाही, तर आपल्या कर्तुत्वाने ब्रिटीशांना तोंडात बोटं घालायला लावली. आबासाहेबांनी केवळ व्यापारच नाही केला तर शैक्षणिक, सामाजिक संस्थांना देखील सढळ हाताने मदत केली. भारत स्वतंत्र झाल्यावर 1959 साली त्यांची मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली. शेरीफ म्हणजे नगरपाल. आबासाहेबांनी पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला चांगलीच आर्थिक मदत केली आणि त्यामुळेच संस्थेने कॉलेज आणि हायस्कूलला 1945 साली आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल अशी नावे दिली. मुंबई university च्या अंतर्गत त्यांनी सांगलीत मुलींसाठी महाविद्यालय सुरू केले,

त्यांच्या याच कार्यकर्तुत्वामुळे त्यांना आर्थिक अभ्यास संस्थेतर्फे उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच 1971 मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगलीतील एका खेड्यातल्या मुलाचा गॅरेजमध्ये काम करण्यापासून ते पद्मभूषण पुरस्कार मिळवण्यापर्यंतच प्रवास खरच विस्मयकारक होता. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं आपण यशवंतराव चव्हाणांच्या अतुलनीय कामाबद्दल अनेकदा म्हणतो, पण मित्रांनो हा भालचंद्र नामक सह्याद्री देखील हिमालयाच्या प्रत्येक अडिअडचणीत धावून गेला होता हे देखील विसरून चालणार नाही. त्यांच्या विचारांची ज्योत आज प्रत्येकाने आपल्या मनात निरंतर तेवत ठेवली पाहिजे.

हाच लेख युट्युबवर पाहण्यासाठी

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button