स्वतःमध्ये बदल घडवून मग हक्काने म्हणा ‘मेरा भारत महान’
“भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही ओळ आपण प्रत्येकानेच शाळेत असताना अगदी जोरात म्हटलीच असेल, मात्र यापलीकडचा भारत आपल्यापैकी किती जणांनी उलघडून पहिला? इतिहासाचा तास तर जांभया देत आणि हा विषय किती रटाळ आहे हेच सांगण्यात गेला आणि वाचनाची आवड नसल्याने इतिहासाची पानं चाळली गेली नाहीत. केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला रांगेत उभं राहून “भारत माता की जय” म्हटलं आणि चॉकलेट खाल्ली म्हणजे देशाविषयी आदर व्यक्त केला असं होतं का? भारतीय क्रिकेट संघ बाजी मारत असेल तर “मेरा भारत महान” आणि इतर विविध पैलूंकडे दुर्लक्ष करण्यात भारत स्वतंत्र होऊन 77 वर्ष होऊन गेली. आपल्या आजच्या विषयाकडे वळण्याआधी सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
देश परकीय राजवटीतून मुक्त होऊन आज 77 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे भारतमातेच्या जयघोषात आजचा संपूर्ण दिवस भरून जाईल यात शंका नाही. मात्र उद्याचं काय? आजच्या रॅलीमध्ये हातात झेंडा घेऊन गेल्यानंतर उद्या तोच झेंडा रस्त्यावर पडलेला तर दिसणार नाही ना? दरवर्षीप्रमाणे आजही भाषण ऐकताना “अनेकांनी प्राणांची आहुती दिली आणि म्हणून आपल्याला आजचा सूर्य स्वतंत्रतेत अनुभवायला मिळतोय” हे वाक्य आपल्याला रटाळ वाटेल, कारण “स्वातंत्र्य” या शब्दाची खरी ओळख गेल्या 77 वर्षात आपल्याला पटलेलीच नाही. आपण केवळ परकीयांच्या गुलामगिरीतूनच मोकळे झालेलो नाही, तर लोकशाहीमध्ये वावरणारे सर्वात भाग्यवान देशवासी आहोत. आपल्यावर कोणीही कसल्याही प्रकारची सक्ती करू शकत नाही याचे महत्त्व काय हे जो पिंजऱ्यात जखडलेला आहे त्यालाच कळेल. मात्र मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगताना आपण मानसिकदृष्टया अजूनही मागासलेले आहोत याची जाणीव काही केल्या होत नाहीये.
गेल्या 77 वर्षांत नक्कीच आपण अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. भारताचा इतिहास हा एकेकाळी वैभवशाली होता. असं म्हणतात, इथून सोन्याचा धूर निघायचा मात्र केवळ इंग्रजच नाही, तर अनेक परकीय आक्रमकांनी अनेकवेळा भारताला लुबाडलं, लुटून नेलं आणि तरीही आज भारत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. आज आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत नसला तरीही भारताच्या अंतराळवीरांनी चंद्राला गवसणी घातली आहे, इथे अनेक राज्यांमध्ये आज मेट्रोच्या वेगवान गतीने प्रवास केला जातो, भारताच्या सीमेवर उभ्या असलेल्या सेनेच्या वाकड्यात जाण्याची हिंमत जगभरातील कोणतीही ताकद करत नाही किंवा करणार नाही, आपली अर्थव्यवस्था दरदिवशी सकारात्मक प्रगती करतेय, दूरसंचार क्रांती विविध क्षेत्रांना एका धाग्यात जोडून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. हे आणि असे अनेक बदल पाहिले की सोन्याचा धूर पुन्हा निघायला जास्ती वेळ जाणार नाही यावर विश्वास बसतो.
मात्र चौफेर नजर फिरवल्यास प्रश्न पडतो की भारतात वावरणारा प्रत्येक माणूस सामान स्वातंत्र्य अनुभवत आहे का? पूरग्रस्त भागांमध्ये लोकं तेवढ्याच आनंदाने आजचा दिवस साजरा करत असतील का? सोशल मीडियाने जरी संपूर्ण देशाला एकत्र जोडलेलं असलं तरीही तुटलेल्या तारा आणि भंग झालेल्या कनेक्शनमुळे किती लोकं कोपऱ्यांमध्ये अडकून पडलेली असतील? धरतीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरच्या भागात आजही कोणीतरी जीव मुठीत धरून तर बसलेलं नसेल ना? लोकशाहीच्या राज्यात कुणावर धर्म बदलण्याची सक्ती केली जात नसेल ना? सरकारने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरीही भारतात आजही अनेक गावांमध्ये शिक्षणाचा अभाव आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता यांमुळे स्वतःच्या घरात प्रसूतीची पीडा सोसणारी बाई आढळतेच. भारताच्या कितीतरी गावांची नावं देखील आपल्याला माहिती नाही, त्यांचा उल्लेख नकाशात नाही स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर देखील जिथे बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या, बलात्कार, बालमजुरी असे कितीतरी माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार घडतात. शिक्षणाची इच्छा मनात बाळगून स्वतःच्या आई-वडिलांची नजर चोरून पावसाचं पाणी अंगावर सोसत जाणाऱ्या लहानग्यांच्या आणि अनेक पीडितांच्या डोक्यावर खरंच स्वातंत्र्याचा सूर्य उगवला आहे का असा प्रश्न पडतो.
म्हटलं तर भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. येणाऱ्या काळात भारतातील तरुणांच्या मेहनतीवर इतर जगभरातील देश चालणार आहेत मग याच हुशारीचा उपयोग भारतालाच करवून दिला तर? तरुणपिढी देशाच्या भक्कम पाया आहे, मात्र हीच वयातील मुलं सोशल मीडियाचा गैरवारपर करताना किंवा संध्याकाळच्यावेळी मित्रांसोबत गप्पाष्टके करताना आढळतात.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथे कामाच्या संधी नाही म्हणत परदेशात जाणारे अनेक असतील पण मी माझ्या देशात राहून स्वतःसाठी तसेच इतरांसाठी देखील नोकरीच्या संधी तयार करेन असं देशाचा तरुण का म्हणत नाही? गावातील लोकं अशिक्षित आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही, कामाच्या शोधात शहरात येऊन ते शहराला मळवून टाकतायत असं म्हणत आपणच सुशिक्षित लोकं भारत सोडून परदेशी जातो. अशावेळी प्रश्न उभा राहतो की ज्या देशाला नावं ठेऊन, अशिक्षित म्हणत आपण अर्ध्यावर सोडून आलो त्याच भारताच्या स्वातंत्र्यदिनादिवशी “भारत माता की जय” म्हणावं तरी का? परदेशात ट्रॅफिकचे नियम किती कडक आहे हे सांगताना आपण थकत नाही, मात्र उठायला उशीर झाल्याने वाया गेलेला वेळ भरून काढताना ट्रॅफिक नियम मोडणारे देखील आपणच असतो. गावाकडून आलेली लोकं बेशिस्त आहेत, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व माहिती नाही असं म्हणत स्वतःचं घर नीटनेटकं ठेऊन तोच कचरा बाहेर नेऊन टाकणारे देखील आपणच असतो. रस्त्याने चालताना खाल्लं जाणाऱ्या केळ्याची साल कचरापेटीत टाकणं आपल्याला शक्य होत नाही आणि दिवसभर उन्हात भूक आणि तहान विसरून केवळ दोन वेळचं जेवण मिळावं म्हणून तडफडणारा कचरा कर्मचारी आपल्याला मळकट वाटतो.
आज जिथे पुरात अनेक संसार वाहून निघालेत तिथे जाऊन पाण्यासोबत सेल्फी काढणारे आपण भारतीय जास्तीत जास्त “Save Wayanad” अशी इंस्टाग्रामवर स्टोरीच ठेऊ शकतो. स्वतंत्रता आणि स्वैराचार यांमध्ये असलेला फरकच ओळखण्याची मानसिक तयारी नसेल, तर असा सुशिक्षित भारत किती काळासाठी प्रगतिशील राहील याची शाश्वती देत येत नाही. शासन आणि प्रशासन कसे असावे, ट्रॅफिक पोलीसवाल्याने कसे वागावे, स्वछता कर्मचाऱ्यांची जबाबदारी काय आहे यावर मतं मांडण्यापेक्षा 77 वर्षानंतर का होईना ‘मी काय केलं पाहिजे’ याचा विचार करून बघूया.
कुठलाही देश हा तिथल्या देशवासियांमुळे ओळखला जातो, त्यामुळे आपल्याला लाभलेल्या गौरवशाली इतिहासाकडून शिकत पुढे जाऊया. कदाचित आत्ताच्या घडीला आपल्या देशाला मानसिक क्रांतीची गरज असावी, आजपासून स्वतःमध्ये बदल घडवून हक्काने “मेरा भारत महान” म्हणून तर बघूया, कदाचित देशाप्रती अभिमान म्हणजे काय याची खरी प्रचिती तेव्हा येईल…