तुम्ही धंदा कोणता करता याला महत्त्व नाही, तो कसा करता याला महत्त्व आहे!
आपण उद्योग-धंदा किंवा व्यवसाय कोणता करतो ? यापेक्षा तो कसा करतो याला खूप महत्त्व आहे. चीनमध्ये अशी म्हण आहे, “चेहऱ्यावर जर हसू नसेल, तर त्या दिवशी दुकान उघडू नये.‘ प्रत्येकाच्या व्यवसाय-धंद्याच्या क्षेत्रामध्ये तोच धंदा-व्यवसाय उत्तम प्रकारे करणारे व भरपूर पैसे कमावणारे अगदी मोजकेच चार-पाच उद्योजक असतात.
बाकीचे लोक रडतखडत किंवा अगदी नुकसानीत देखील व्यवसाय करीत असतात. धंदा तोच असतो, प्रॉडक्ट तेच असते, मार्केट तेच असते, तितकाच वेळ सर्वांकडे असतो. काही वेळेला तर भांडवल देखील कमी असते, तरी पण मोजके लोक चांगला धंदा करतात व बाकीचे रडतखडत किंवा कसा तरी धंदा चालवत असतात. मग दोघांमध्ये फरक काय आहे ? फरक आहे तो ऍटिट्यूडचा म्हणजे वृत्तीचा. एकाचे धंद्यावर प्रेम असते, तर दुसरा करावा लागतो म्हणून किंवा आता दुसरे काय करू म्हणून धंदा करीत असतो.
याच वृत्तीवर – “ऍटिट्यूड‘वर एक तत्त्व लागू होते. त्याला “पॅरेटोज लॉ‘ म्हणतात किंवा “80/20‘ म्हणतात. एकाच मार्केटमध्ये 20 टक्के उद्योजक मिळून 80 टक्के धंदा करतात. उदा. शंभरातील वीस व्यापारी. एकूण धंदा समजा शंभर कोटींचा असेल, तर ऐंशी कोटींचा धंदा ते करतात. उरलेले ऐंशी, वीस कोटींच्या धंद्यात मारामारी करतात, हे तत्त्व सगळीकडे लागू होते, कारखानदारीत, व्यापारात, पेठेत, रोडवर, डॉक्टर, वकील व इतर व्यवसायात. त्याचे प्रमाण कमी-अधिक असू शकते. अगदी नोकऱ्या मिळण्यामध्ये देखील म्हणजे काहींना अजीर्ण होईल इतके मिळते व काहींना उपाशी राहावे लागते. असे का होते, तर त्याला वृत्तीच कारणीभूत असते.
तुमचे जर तुमच्या व्यवसायावर प्रेम असेल, तर निश्चितच तुम्ही चांगला धंदा करू शकता. प्रेम कशाला म्हणतात, तर ज्याला कधी एकदा सकाळ होते व मी माझ्या उद्योगात जाऊन रमतो असे वाटते. जो कधीही आपल्या धंद्याबद्दल रडत बसत नाही, आपला धंदा वाईट आहे असे म्हणत नाही. धंद्यावर प्रेम असले की त्याला उत्साह असतो, जोश असतो, नवे विचार मनात येतात. अडचणी जरूर येतात; पण त्याला न घाबरता तो तोंड देतो, खचून तर निश्चितच जात नाही. उलट जोमाने कामाला लागतो.
काळाप्रमाणे बदल करून नवीन व वेगळेपणा धंद्यात आणला जातो. अशा व्यक्तीच्या धंद्यावरील प्रेमाची प्रसन्नता त्याच्या वृत्तीत बदल करून जाते. चेहऱ्यावर हसू असते, त्यामुळे गिऱ्हाईकालाही आनंद वाटतो, अर्थात विक्री (सेल) वाढते. दुःखी किंवा निराश सेल्समनकडून किंवा मालकाकडून कोणाला काही घ्यायला आवडेल का? डॉक्टरचे व्यक्तिमत्व व त्याच्या चेहऱ्यावरील हसू बऱ्याच प्रमाणात आजार बरा करून जाते. त्यांना भेटल्यावरच आराम मिळतो, असे वाटते. मालकाला उत्साह असला, की आपोआप हे “कल्चर‘ खालच्या लोकांपर्यंत पसरते; तसेच लोकही उत्साहाने वागतात. त्यांनाही काम करायला आवडते.
ज्यांचे धंद्यावर प्रेम असते, ती संस्था-कंपनी अगदी नोकरापासून मालकापर्यंत उत्तम काम करते व अर्थातच भरपूर नफा कमविते. एकदा का आपल्याला आपला धंदा मनापासून आवडतो म्हटले, की आपोआपच त्याला लागणाऱ्या योग्य गोष्टी घडतात. तुमचा स्टाफ, कामगार, ग्राहक, बॅंका, शेअरहोल्डर, आजूबाजूचा समाज सर्व जण खूष राहतात. कित्येक वेळेला, धंद्यामध्ये मागून आलेले लोक पुढे जातात, मोठे होतात. कारण अगोदरपासून त्या व्यवसायात असलेले लोक गाफील राहतात. धंदा ज्याप्रमाणे करायला पाहिजे, त्याप्रमाणे ते करीत नाहीत, योग्य बदल करीत नाहीत. निश्चितच कोठे तरी धंद्यावरचे प्रेम कमी झालेले असते. अलीकडे तर हे फार पाहायला मिळते.
प्रत्येकाला दुसऱ्याचा धंदा चांगला वाटतो. तिथूनच गडबड सुरू होते. अनेक वेळेला मालकाचे वय झालेले असते, उत्साह कमी झालेला असतो, नवीन पिढी व्यवसायात येणार नसते; मग प्रेम कमी व्हायला लागते. धंदा तोच, पण आवड कमी झाल्यावर निश्चितच धंदा कमी व्हायला सुरू होतो. त्यामुळे जो उत्साही आहे, ज्याला आपला धंदा आवडतो, त्यालाच संधी दिसते. त्याच्या मनाची दारे कायम उघडी असतात व तेथेच लक्ष्मी येते.
“आज हवाच खराब आहे‘, “खूप कॉम्पिटीशन वाढली आहे‘, “पूर्वीसारखे मार्जिन राहिलेले नाही‘, “धंद्यात दम नाही‘, “सरकारची पॉलिसी बरोबर नाही‘, “जागतिक मंदी आहे‘, “पाऊसच पडलेला नाही‘.. अशी कारणे बऱ्याचदा ऐकू येतात. ते अगदी खरेही असेल; पण नुसती चर्चा करून काय होते, बोलून काय होते? अशी वाक्ये रोज पावलो-पावली ऐकायला मिळतात. एकतर आपल्याला आपला व्यवसाय चिकाटीने करायचा असेल, तर अशी वाक्ये बोलूच नाहीत व तसे बोलणाऱ्यांपासून चार हात लांब राहावे. कारण त्यांना फक्त रडायला खांदा हवा असतो.
असे रडण्याऐवजी “आपल्याला तर आपला धंदा आवडतो आहे, आपण खूष आहोत, मस्त आहोत, आपल्याला वेळच नाही असे रडायला‘, अशी वृत्ती ठेवून पुढे चालले पाहिजे. “आहे तोच व्यवसाय-धंदा उत्तम आहे, तो मी उत्तम प्रकारे करणार आहे, काळाबरोबर बदलणार आहे, मी “टॉप‘च्या बिझनेसमनमध्ये कायम असणार आहे,‘ असा विश्वास, प्रेम व वृत्ती हवी. हा “फॉर्म्युला‘ वापरून पाहा व मग सांगा काय जादू झाली ती.. !!!
– अनामिक