नादच खुळा! सॉफ्टवेअर इंजिनिअरने उभारला ११,२२७ कोटींचा ब्रँड; BlueStone च्या यशाचं नेमकं गुपित काय?

आजच्या काळात ‘Set Life’ सोडून अनिश्चिततेच्या वाटेवर चालण्याचं धाडस फार कमी लोक करतात. जेव्हा हाताशी IIT दिल्लीची पदवी आणि खिशात Amazon सारख्या जागतिक कंपनीचा कोट्यवधींचा पगार असतो, तेव्हा लोक सहसा स्थिरावण्याचा विचार करतात. पण गौरव सिंग कुशवाहा हे वेगळ्या मातीचे बनले होते. एका साध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने भारतातील ज्वेलरी मार्केटचा चेहरामोहरा कसा बदलला आणि ११,२२७ कोटींचे साम्राज्य कसे उभे केले? चला जाणून घेऊया BlueStone च्या यशाचं ‘अस्सल’ गुपित!
करिअरची सुरुवात
गौरव सिंग कुशवाहा यांचा प्रवास सुरू झाला IIT दिल्ली मधून. कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर त्यांच्यासमोर यशाचे पायघड्या अंथरल्या होत्या. त्यांनी Amazon मध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून भारत आणि अमेरिकेत काम केले. पैसा, प्रतिष्ठा आणि सुख सोयी सर्व काही होते. पण त्यांच्या मनात एक स्वप्न सतत धडका मारत होतं – “स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं!”
ठरलेल्या चौकटीत राहण्यापेक्षा स्वतःचा नवा रस्ता शोधण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर दीड वर्षातच त्यांनी सुरक्षित नोकरीला रामराम ठोकला आणि उद्योजकतेच्या मैदानात उडी घेतली.
पहिलं अपयश: जेव्हा स्वप्नांना ब्रेक लागला
Amazon मध्ये सुमारे दीड वर्ष काम केल्यानंतर गौरव सिंग कुशवाहा यांनी धाडसी निर्णय घेत नोकरी सोडली आणि “Chapak” नावाचं ऑनलाइन मूव्ही पोर्टल सुरू केलं.
तब्बल ४ वर्षे त्यांनी यावर जीवापाड मेहनत घेतली. पण म्हणतात ना, “वेळ आणि काळ” नेहमी आपल्या बाजूने नसतो. त्या काळात स्मार्टफोनचा वापर फारसा नव्हता आणि व्यवसायासाठी ठोस कमाईचं मॉडेल तयार झालं नव्हतं. त्यामुळे Chapak अपेक्षेप्रमाणे वाढू शकला नाही.
पण गौरव खचले नाहीत. या अपयशाने त्यांना एक मौल्यवान धडा दिला: फक्त कल्पना चांगली असणं पुरेसं नसतं, तर योग्य वेळ, योग्य बाजारपेठ आणि लोकांची खरी गरज ओळखणं तितकंच महत्त्वाचं असतं.
समस्येतून संधीचा शोध
या अपयशाच्या काळात गौरव सिंग कुशवाहा यांनी बाजाराकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्यांना जाणवलं की भारतातील ज्वेलरी मार्केट प्रचंड मोठं आहे, तरीही त्याचा अगदी कमी भाग ऑनलाइन उपलब्ध आहे. Flipkart आणि Amazonसारखे प्लॅटफॉर्म असूनही फाइन ज्वेलरीची विक्री जवळजवळ पूर्णपणे ऑफलाइनच होत होती.
ज्वेलरी खरेदी ही केवळ वस्तू खरेदी नसून ती विश्वासावर आधारित प्रक्रिया होती. मर्यादित डिझाइन्स, किमती आणि शुद्धतेबाबत स्पष्ट माहिती नसणं, तसेच ग्राहकांना योग्य मार्गदर्शन न मिळणं या मोठ्या अडचणी होत्या. ह्याच समस्या ओळखून गौरव यांनी त्यावर उपाय शोधण्याचं ठरवलं आणि इथूनच एका नव्या संधीची बीजं रोवली गेली.

BlueStone चा जन्म
ऑनलाइन शॉपिंगची लाट येत असताना सोन्या-चांदीचे दागिने ऑनलाइन का विकले जाऊ नयेत? याच प्रश्नातून२०११ साली गौरव यांनी विद्या यांना सहसंस्थापक म्हणून सोबत घेतलं आणि BlueStone या ऑनलाइन ज्वेलरी ब्रँडची सुरुवात केली. हा ब्रँड डिझाइनला प्राधान्य देणारा आणि तंत्रज्ञानावर आधारित होता. “Blue” म्हणजे विश्वास आणि “Stone” म्हणजे कारागिरी, या दोन मूल्यांवर BlueStone उभा राहिला.
ऑनलाइन ज्वेलरी खरेदी ही संकल्पनाच नवीन असल्याने सुरुवातीपासूनच हा प्रवास आव्हानात्मक होता. ग्राहकांचा विश्वास जिंकणं हे BlueStone समोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. सुरुवातीला लोकांच्या मनात भीती होती – “ऑनलाइन सोनं कसं काय घ्यायचं?” ही भीती घालवण्यासाठी गौरव यांनी भन्नाट आयडिया वापरल्या:
- Try at Home: दागिने विकत घेण्यापूर्वी घरी बसून ट्राय करण्याची सोय.
- पारदर्शकता: प्रत्येक दागिन्याचं कॅरेट वजन, शुद्धता आणि हॉलमार्क सर्टिफिकेटची पूर्ण माहिती.
- Customization: ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने बनवून मिळण्याची सोय.
यामुळे BlueStone वरचा लोकांचा विश्वास वाढला आणि ऑर्डरचा ओघ सुरू झाला
गुंतवणूक आणि वेगवान वाढ
BlueStone ने इन्व्हेंटरी-लाइट आणि ऑर्डर-वर-निर्मिती मॉडेल स्वीकारलं, ज्यामुळे खर्च कमी राहिला आणि व्यवसाय सहज वाढू लागला. सुरुवातीला Accel, Kalaari आणि Saama कडून ६० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, आणि २०१५ पर्यंत महसूल ८० कोटी रुपये झाला. नंतर Accel, IvyCap आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली १०० कोटी रुपये अधिक गुंतवले गेले. एका वर्षातच कंपनी दरमहा ७,००० ऑर्डर्स पूर्ण करू लागली, ज्यात सरासरी विक्री २५,००० रुपये होती.
ऑनलाइन ते ऑफलाइन प्रवास
गौरव यांना लक्षात आलं की ज्वेलरी मार्केटमधला ऑनलाइन हिस्सा फक्त 0.५% आहे. मोठ्या प्रमाणावर वाढीसाठी ऑफलाइन स्टोअर्स उघडणे आवश्यक होते. त्यामुळे २०१८ मध्ये दिल्लीच्या Pacific Mall मध्ये पहिलं फिजिकल स्टोअर उघडलं. २०१९ पर्यंत BlueStone कडे २० स्टोअर्स झाले आणि महसूल ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. रोमँटिक-मुव्ही थीमवर आधारित LoveLike कॅम्पेनमुळे Millennials आणि Gen Z मध्ये ब्रँड खूप लोकप्रिय झाला. पाहता पाहता स्टोअर्सची संख्या १७५ च्या पार गेली.
आणखीन वाचा:
- मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
- ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.
- इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत




