Fevicol Man: एका वॉचमन च्या कल्पनेतून साकारलेला ब्रॅण्ड


Fevicol Man: फेविकॉलची जाहिरात “फेविकॉल का मजबूत जोड, आसानी से टूटेगा नहीं” ही सर्वांनाच परिचयाची आहे. आजही “मजबूत जोड” म्हटलं की फेविकॉल आठवतं, कारण फेविकॉल असेल तर जोड खरोखरच टिकाऊ असतो. फेविकॉलच्या जाहिरातींनी आणि त्यांच्या Branding ने लोकांच्या मनात या नावाची छाप कायमची बसवली आहे. लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टी तुटल्या की फेविकॉल वापरायची सवय आहे, मग ती वस्तू कितीही लहान किंवा मोठी असो.
पण तुम्हाला कधी विचार आला आहे का की या यशस्वी Brand च्या मागे कोण आहे? हा ब्रँड उभा करणारी ती प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे बलवंत पारेख, ज्यांना “Fevicol Man” म्हणूनही ओळखलं जातं. गुजरातच्या भावनगरमधील एक साधा माणूस, ज्याने आपल्या मेहनतीने फेविकॉलला यशस्वी बनवलं आणि तो घराघरात पोहोचवला.
आजच्या या लेखात आपण बलवंत पारेख यांच्या प्रेरणादायी Life Journey वर एक नजर टाकूया, आणि पाहूया की त्यांनी कसं फेविकॉलसारख्या सामर्थ्यवान ब्रँडची निर्मिती केली.
प्रारंभिक जीवन (Early Life)
बलवंत पारेख यांचा जन्म १९२५ साली गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा या शहरात एका जैन कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा मॅजिस्ट्रेट होते, त्यामुळे कुटुंब सुशिक्षित आणि प्रतिष्ठित होते. लहानपणापासूनच बलवंत यांना शिक्षणाची आवड होती. त्यांच्या पालकांना वाटत होतं की त्यांनी कायद्याची पदवी घेऊन वकील व्हावे. त्यामुळे त्यांनी मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात (Government Law College) कायद्याचं शिक्षण घेतलं.त्याकाळी देशात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. महात्मा गांधींच्या विचारांची देशात लाट पसरली होती. बलवंत यांनी देखील स्वातंत्र्याच्या या संग्राममध्ये सक्रिय सहभाग घेतला, Quit India Movement मध्येही ते पूर्ण तन मनाने सहभागी झाले होते मात्र त्यांनी आधी आपला अभ्यास पूर्ण करावा असा घरच्यांचा दबाव होता.
शिक्षण घेत असतानाच बलवंत यांचा विवाह कांताबेन यांच्यासोबत झाला. कायद्याची पदवी तर त्यांना मिळाली पण बलवंत यांना वकिलीपेक्षा व्यवसायात अधिक रस होता. त्यांनी वकिली न करता मुंबईतील एका रंगाई आणि मुद्रणालयात काम करायला सुरुवात केली. काही काळानंतर त्यांनी ही नोकरी सोडली आणि एका लाकूड व्यापाऱ्याच्या कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी धरली, जिथे ते पत्नीसोबत गोदामात राहत होते. त्यांना स्वतःचा Business सुरु करायची तीव्र इच्छा होती म्हणून कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना त्यांनी मोहन नावाच्या गुंतवणूकदाराच्या (Investor) मदतीने पाश्चात्य देशांतून सायकल, सुपारी, आणि कागदी रंग आयात करण्याचा व्यवसाय सुरू केला. पण दुर्दैवाने तो व्यवसाय फार काळ टिकू शकला नाही, त्या काळात त्यांनीं व्यवसायासाठी घेतलेल्या विविध कर्जांमुळे त्यांना खूप आर्थिक बोजादेखील सहन करावा लागला.
संघर्षांतून सुरु केला यशाचा प्रवास (Success Story)
त्यांनी नंतर अनेक छोटी मोठी कामं करून आपल्या मेहनतीच्या बळावर थेट जर्मनी गाठली आणि फेडको या कंपनीत ते रुजू झाले. फेडकोमधील नोकरी बलवंत यांना उद्योग आणि व्यवसायाचे तंत्र शिकवणारी ठरली. फेडको या जर्मन कंपनीसोबत काम करताना त्यांना उत्पादकता, गुणवत्ता नियंत्रण आणि उत्पादनांच्या साठवण व्यवस्थापनाबद्दलची माहिती मिळाली. फेडकोने काही काळानंतर व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र बलवंत यांनी परत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. 1954 मध्ये त्यांनी आपल्या भावासह मुंबईच्या जेकब सर्कल येथे ‘Parekh Dyechem Industries‘ नावाने एक कंपनी स्थापन केली, जी औद्योगिक रसायने, रंगद्रव्य इमल्शन आणि रंगांचे उत्पादन आणि विक्री करत होती. ही त्यांची पहिली उद्योजकीय पायरी होती.
फेविकॉलचा शोध (Invention of Fevicol)
Pidilite Industries म्हणजेच पारेख डायकेम लाइट इंडस्ट्रीजने प्रथम औद्योगिक उत्पादनासाठी काम केलं , परंतु बलवंत यांना सुतारांच्या वापरासाठी एक नवीन उत्पादने तयार करण्याची संधी दिसली. सुतारांना कामासाठी लागणारे गोंद त्या काळात अनेकदा प्राण्यांच्या अवयवांपासून तयार होत असे, ज्यामुळे त्याच्या वापरात काही मर्यादा येत होत्या. यामुळे त्यांनी शाकाहारी म्हणजेच कोणत्याही प्राण्याची हत्त्या न करता गोंद तयार करण्याचा संकल्प केला. आपल्या जुन्या कंपनीच्या नावातला फेडको आणि कॉल म्हणजे गोंद हा जर्मन शब्द जोडून ‘Fevicol‘ नावाचा त्यांनी नवीन ब्रँड तयार केला. फेविकॉलची निर्मिती १९५९ सालापासून सुरु झाली. सुरुवातीला अपेक्षित असं यश त्यांना मिळालं नाही, मात्र फेविकॉलच्या उत्तम दर्जामुळे ते सुतारांच्या पसंतीस उतरू लागले.


Fevicol Man:फेविकॉलने सुतारांचा बाजार कसा काबीज करावा यासाठी एक अभिनव योजना आखली. बलवंत यांनी “Fevicol Champions Club” नावाचा एक समुदाय निर्माण केला. या क्लबने सुतारांना फेविकॉल उत्पादनांची माहिती देऊन त्यांच कौशल्य आणि व्यवसाय अधिक सुधारण्यासाठी मदत केली. या समुदायात फक्त उत्पादनाबद्दल शिकवलं गेलं नाही, तर सुतारांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि शिकण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. या मोहिमेमुळे फेविकॉलने त्या काळात देशभरातील ८०% पेक्षा जास्त सुतारांचा विश्वास प्राप्त केला.
जाहिरात आणि व्यवसाय विस्ताराचे धोरण (Marketing Strategy)
१९८९ मध्ये बलवंत पारेख यांनी फेविकॉलला एक सार्वत्रिक ब्रँड बनवण्याचा संकल्प केला. या उद्देशासाठी त्यांनी एक Advertising Strategy अवलंबली. “दम लगाके हैशा” आणि “फेविकॉल का मजबुत जोड़ है, टूटेगा नहीं” या प्रभावशाली स्लोगनद्वारे (Slogan) त्यांनी फेविकॉलला सर्वसामान्यांच्या वापरात आणलं. फेविकॉल केवळ सुतारांसाठी नाही, तर घराघरातील लोकांसाठी एक उपयोगी साधन बनले. या अनोख्या जाहिरातींमुळे फेविकॉलने भारतीय बाजारपेठेत एक विशेष स्थान प्राप्त केले आणि 20 वर्षांच्या आत अविश्वसनीय 70% Market Share मिळवला. या यशात, देशातील प्रत्येक दोन सुतारांपैकी एकाने फेविकॉल वापरण्यास सुरुवात केली.
Fevicol Man: 1993 पर्यंत, Pidilite ने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) IPO मध्ये प्रवेश केला, आणि सर्व काही ठीकटाक आणि सुरळीत असूनही बलवंत पारेख पूर्णपणे समाधानी नव्हते, कारण त्यांची इच्छा होती की फेविकॉल सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनावं. ग्राहकांच्या मागणीनुसार, त्यांनी फेविकॉलचा Logo बदलून दोन जोडलेले हत्ती बनवले, जे एकता आणि शक्तीचे प्रतीक झाले. यामुळे फेविकॉल 30 ग्रॅमच्या ट्यूबमध्ये उपलब्ध झाला, त्याला प्रचंड लोकप्रियता मिळली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवत बलवंत पारेख यांनी २००६ पर्यंत फेविकॉलचा विस्तार केला, फेविकॉल ७१ देशांमध्ये पोहोचले. त्याच वेळी, M-Seal आणि Dr. Fixit सारखे अन्य ब्रँड्स देखील यशस्वीपणे लाँच करण्यात आले. बलवंत यांच्या नेतृत्वाखाली Pidilite Industries जवळजवळ २००० कोटी रुपयांच्या मूल्याची कंपनी बनली, ज्यामुळे फेविकॉलने भारतीय बाजारपेठेत एक वर्चस्व प्रस्थापित केलं.
सामाजिक आणि शैक्षणिक कार्य (Philanthropy)
बलवंत पारेख हे केवळ उद्योगातच नाही तर समाजकार्यात देखील सक्रिय होते. त्यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच महुवा येथे दोन शाळा, एक महाविद्यालय, आणि एक रुग्णालयाची स्थापना केली. त्यांना आपल्या संस्कृती आणि इतिहासाची प्रचंड आवड होती म्हणून त्यांनी ‘दर्शक फाउंडेशन’ (Darshak Foundation) या संस्थेची स्थापना केली, ही संस्था भारतीय सांस्कृतिक इतिहासावर संशोधन करते. बलवंत यांचे स्वतःचे एक खाजगी ग्रंथालय होते ज्यामध्ये शास्त्र, साहित्य, कायदा, मानसशास्त्र, आणि सामान्य ज्ञानाचे विविध ग्रंथ होते. त्यांनी ‘Balwant Parekh Centre for General Semantics and Other Human Sciences‘ या संस्थेची स्थापना करून, लोकांच्या शिक्षणासाठी आणि विज्ञानविषयक संशोधनासाठी एक ठोस पाऊल उचलले.
मित्रांनो, बलवंत पारेख यांचा जीवनप्रवास आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. एका सामान्य व्यक्तीने जिद्द, मेहनत आणि सततची शिकण्याची तयारी याच्या जोरावर उद्योगजगताला नवी दिशा दिली. फेविकॉलचे माध्यमातून त्यांनी भारतीयांना एक असा ब्रँड दिला जो एकता, विश्वास, आणि अतूट बंधनाचे प्रतीक आहे. आजही बलवंत पारेख यांच्या योगदानाचे स्मरण त्यांच्या उद्योजकीय विचारसरणीतून आणि समाजसेवेच्या कार्यातून होते.
- अंध असूनही वयाच्या २३व्या वर्षी उभी केली ५०० कोटींची कंपनी
- आठवी नापास ते हजारो कोटींचा मालक. सीबीआय, रिलायन्स चालतात याच्या इशाऱ्यावर- त्रिशनित अरोरा
- शार्क टॅंकमधील नमिता थापर, भारतातील एकमेव Phar’Maa’ चा असा आहे प्रवास…



