बारावीत नापास झालेला मुलगा बनला आयपीएस अधिकारी IPS Manoj Kumar Sharma
प्रबळ इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचा मिलाफ झाला की, क्षेत्र कोणतेही असो तिथे यश हे मिळणारच. फक्त गरज आहे, तो मिलाफ स्वतःहून घडवून आणण्याची. मित्रांनो प्रबळ इच्छाशक्ती असेल ना, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही.
इतिहासात अश्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर अजरामर झाल्या.
9 वी, 10 वी, 11 वी तिन्ही इयत्तेत कॉपी करून काटावर पास होऊन बारावीत नापास झालेल्या मुलाला तुम्ही काय म्हणाल? अर्थातच टपोरी, वाया गेलेला, बिनकामी; पण जर मी म्हणाले, की तोच बारावीत नापास झालेला मुलगा जर पोलिस आधिकारी बनला तर? तुमचा विश्वास बसणार आहे का? पण हे खरंय!
आम्ही सांगतोय, त्या आयपीएस अधिकाऱ्याबद्दल ज्याने गडचिरोलीत नक्षलवाद्यांना पाणी पाजलं. तो डॅशिंग अधिकारी म्हणजे आयपीएस मनोज कुमार शर्मा. 12 वी मध्ये केवळ हिंदी सोडून बाकी सगळ्या विषयात नापास झालेले मनोज कुमार परिस्थितीशी झगडत अखेर आयपीएस बनले ते केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. नुकताच त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर आधारित “12th फेल” हा सिनेमासुद्धा प्रदर्शित झाला.
मध्यप्रदेश मधील मुरैना जिल्ह्यातील मनोज कुमार यांनी बारावीमध्ये नापास झाल्यावर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे काही वर्ष टॅम्पो चालवला, रिक्षा चालवली, जे मिळेल ते ते काम करू लागले. ते ग्वाल्हेरला एका लायब्ररीत शिपाई म्हणून सुद्धा काम करायचे, तिथे त्यांची पुस्तकांशी मैत्री जमली. त्यावेळी अब्राहम लिंकनचं आत्मचरित्र वाचून ते इतके प्रभावीत झाले की, आयुष्यात हार मानायची नाही, शेवटपर्यंत लढायचं, लोकांसमोर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श निर्माण करायचा असं त्यांनी ठरवले. लायब्ररीत येणारे बरेचजन upsc चा अभ्यास करायचे. त्यांनी देखील ठरवलं की आपणही यूपीएससीचा अभ्यास करायचा. सगळ्यांना वाटायचं की; काय थापा मारतोय, बारावीत नापास झालाय आणि हा काय यूपीएससी क्रॅक करणार! पण ‘लहरों से डरकर नौका पर नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती!’ या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मनोज कुमार शर्मा दिल्लीला गेले. यूपीएससीचा अभ्यास चालू केला. दिवसरात्र अभ्यास केला खरा, मात्र सलग तिन्ही वेळा त्यांच्या पदरी अपयशच आले, मात्र तरीही त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत। अजून इर्षेने अभ्यास करू लागले आणि त्यांचा चौथा प्रयत्न यशस्वी ठरला. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पार करत करत ते मुलाखतीपर्यंत पोहोचले.
मुलाखती वेळी त्यांची थोडी कच्ची-पक्की इंग्रजी पाहून मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना विचारलं, ‘अरे तुला तर इंग्रजीच येत नाही, तर तू काम कसं करणार?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, भाषेचा आणि कामाचा काय संबंध, त्यावर ते मुलाखत घेणारे म्हणाले, ‘अरे तुला जर इंग्रजी बोलताच येत नसेल, तर लोकांचे प्रश्न तू कसे सोडवशील?’ त्यावर मनोज कुमार म्हणाले, ‘सर तुम्ही मला जर प्लॅस्टिकच्या ग्लासमधून पाणी दिलं, पण मी जर म्हटलं की, मला प्लॅस्टिकच्या ग्लासमधून नको काचेच्याच ग्लासमधून पाणी द्या. तर तुम्ही काय कराल? अर्थातच तुम्ही म्हणाल की, ग्लास कुठलाही असो, पण पाणी तेच आहे ना. मग काचेचा ग्लास असला काय किंवा प्लॅस्टिकचा असला काय. त्याची चव बदलणार नाहीच. अगदी तसंच माझी भाषा कोणतीही असो, त्याने माझ्या कामावर काय फरक पडणार आहे? मला जरी इंग्रजी अस्खलित बोलता येत नसले, तरी माझे काम मी सक्षमपणे व जबाबदारीने करू शकेन. यावर माझा विश्वास आहे” त्यांच्या या उत्तराने सर्वजण प्रभावित झाले आणि मनोज कुमार यांची निवड झाली.
तुमची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल, तर अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा देखील तुम्ही शोध लावू शकता; मात्र जर एखादी गोष्ट तुम्हाला करायचीच नसेल, तर ती टाळण्यासाठी हजारो कारणं तयार असतात. जर एक बारावी नापास मुलगा आयपीएस अधिकारी बनतो, तर तुम्हीसुद्धा तुमच्या मनासारखं नक्कीच करू शकता, फक्त त्यासाठी तुमची मेहनत असणं तितकंच गरजेचं आहे.
आणखी वाचा
- तुम्ही ज्यांच्या सहवासात असता तसेच तुम्ही बनता…
- यश मिळवण्यासाठी कल्पकता व शांत डोक पाहिजे
- दृष्टीकोन’ बदला आयुष्य बदलेल
- अती विचाराच्या रोगापासून दूर राहा
- फक्त तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता