दिनविशेष

राष्ट्रीय अभियंता दिवस आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे विश्वेश्वरय्या हे केवळ एक अभियंता नव्हते, तर त्यांनी भारताच्या औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले. त्यांची दूरदृष्टी आणि उत्तम तांत्रिक कौशल्य आजही अभियंते आणि तंत्रज्ञांसाठी आदर्श आहे.

विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबल्लापूर तालुक्यात १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम या गावचे रहिवासी होते, म्हणून त्यांचे आडनाव ‘मोक्षगुंडम’ असे पडले. त्यांचे वडील पंडित श्रीनिवास शास्त्री हे प्रकांड पंडित होते. त्यांना वेद, उपनिषद यांचा गाढा अभ्यास होता. विश्वेश्वरय्या लहानपणापासूनच अतिशय हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते.

सुरुवातीचे शिक्षण त्यांनी बंगळुरू येथील सेन्ट्रल कॉलेजमध्ये झाले. घरची आर्थिक परिस्थिती अस्थिर होती, त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं. मात्र, त्यांनी त्यांच्या अभ्यासातील सातत्य राखत बी. ए. च्या परीक्षेत संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या या यशाने प्रभावित  होऊन तत्कालीन म्हैसूर सरकारने त्यांना पुढील अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली. त्या शिष्यवृत्तीच्या बळावर विश्वेश्वरय्या यांनी पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी तीन वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या अडीच वर्षांत पूर्ण करून, नोव्हेंबर 1883 मध्ये एल. सी. ई. (लायसेन्सिएट सिव्हिल इंजिनिअरिंग)  म्हणजेच आजची बी.ई. सिव्हिल पदवी वयाच्या बाविसाव्या वर्षी प्रथम श्रेणीत आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. शिक्षण पूर्ण होताच, 1884 मध्ये त्यांची तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या वतीने  मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्ल्यू.डी.) असिस्टंट इंजिनिअर म्हणून पुण्यात सरळ नियुक्ती करण्यात आली. 

पुढे मुंबई सरकारच्या नोकरीत असताना विश्वेश्वरय्या यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी केली. 1893 मध्ये त्यांनी सिंध प्रांतातील सक्कर शहराला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न सोडवला. त्या काळात सिंधू नदीपासून पाणी पुरवण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नव्हती, त्यामुळे शहरात पाण्याची टंचाई होती. विश्वेश्वरय्या यांनी एक अभिनव योजना आखली, ज्याद्वारे सिंधू नदीपासून सक्करला पाणी मिळू लागले आणि हा प्रश्न कायमचा सुटला. याशिवाय, त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या एडनमधील छावणीसाठी मोठं काम केलं. एडन हा येमेन या देशातील एक वाळवंटी प्रदेश होता, जिथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. ब्रिटिश सरकारने या समस्येचे निराकरण करण्यासाठी एका कुशल अभियंत्याची मागणी केली होती आणि सरकारने विश्वेश्वरय्या यांची निवड केली. त्यांनी एडनपासून ६० मैलांवर असलेल्या ठिकाणाहून पावसाचे पाणी पुरवण्याची योजना तयार केली. या योजनेमुळे एडनमधील पाण्याची समस्या कायमची सुटली आणि ब्रिटिश सैन्याला दिलासा मिळाला.

त्यानंतर, त्यांनी शेतीसाठी एक क्रांतिकारक पद्धत विकसित केली. त्याकाळात शेतकरी कालव्याच्या पाण्याचा प्रमाणाच्या बाहेर मनमानी वापर करत होते, त्यावर कोणतेही नियंत्रण नव्हतं. तेव्हा विश्वेश्वरय्या यांनी या प्रश्नावर अभ्यास करून ब्लॉक सिस्टिम नावाची नवी पद्धत शोधली. सुरुवातीला शेतकऱ्यांनी या पद्धतीला विरोध केला, पण जसजशी त्यांना या योजनेची उपयुक्तता समजली, तसतसा विरोध मावळला. ब्लॉक सिस्टिममुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर अधिक नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केला आणि शेती व्यवसायात त्यांच्यामुळे विश्वास निर्माण झाला.

विश्वेश्वरय्या यांचे पुण्यात सुमारे चौदा-पंधरा वर्षे वास्तव्य होतं . पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे होतं. 1901-03 दरम्यान त्यांनी पुण्याजवळील खडकवासला धरणावर एक ऑटोमॅटिक गेट डिझाइन केलं. हे दरवाजे जलाशयातील पाणी विशिष्ट उंचीवर पोहोचले की, आपोआप उघडत आणि पाणी कमी झाले की बंद होत. त्याकाळात हे अत्याधुनिक तंत्रज्ञान एक आश्चर्य मानलं  जात होतं. तसेच पुणे शहराच्या भूमिगत सांडपाण्याची योजना सुद्धा त्यांनीच तयार केली. या योजनेमुळे शहरात सांडपाण्याचे व्यवस्थापन अधिक सुलभ झाले. त्यांच्या या योजनेला त्याकाळी एक अद्भुत यश मानले गेले.

पुण्याच्या जवळपास असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचे कामही विश्वेश्वरय्या यांनी केलं. त्यांनी ब्लॉक सिस्टिमचा प्रचार करून शेतकऱ्यांना या पद्धतीची महत्ता समजावली, ज्यामुळे पाणी वाचले आणि शेतीत अधिक उत्पादकता आली. त्यांनी पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोठे योगदान दिलं, ज्यामुळे शहराच्या विकासाची दिशा ठरवली गेली.

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी सरकारी नोकरीत असताना असाधारण कामगिरी केली होती. त्यांच्या कर्तृत्वाचा दर्जा आणि त्यांनी दाखवलेली कार्यक्षमता या गोष्टी सर्वत्र चर्चेचा विषय होत्या. परंतु, त्या काळात भारतीयांना इंग्रज सरकारने ठराविक मोठ्या  पदांवर जाण्याची परवानगी दिली नव्हती. जेव्हा विश्वेश्वरय्या यांनी चीफ इंजिनिअर पदासाठी पात्रता दाखवूनही त्यांना ते पद देण्यात आलं नाही, तेव्हा त्यांना एकप्रकारचा अपमान वाटला. कारण ते एकटे भारतीय होते आणि इंग्रज सरकारने हे पद केवळ गोऱ्या अधिकाऱ्यांसाठी राखून ठेवलेले होतं. त्याचं वेळी विश्वेश्वरय्या यांची पेन्शनसाठी आवश्यक असलेली नोकरीची सेवा मुदत पूर्ण होण्यासाठी काहीच महिने शिल्लक होते. मात्र, त्यांच्या स्वाभिमानी आणि तत्त्वनिष्ठ स्वभावाला हा अन्याय सहन होईना. त्यांना मुदत वाढवून मिळणार नाही याची कल्पना होती आणि पेन्शनसाठी आवश्यक कालावधी कमी राहिला होता, तरीही त्यांनी 1908 मध्ये सुपरिंटेंडेंट इंजिनिअर म्हणून नोकरीचा तातडीने राजीनामा दिला. हा निर्णय त्यांनी आपल्या मूल्यांवर ठाम राहून घेतला होता.

या निर्णयानंतर सर्वत्र मोठी चर्चा रंगली. त्यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. ब्रिटिश सरकारलाही विश्वेश्वरय्या यांच्या या निर्णयामुळे स्वतःचीच  लाज वाटली आणि त्यांनी इंग्लंडमधून खास परवानगी मिळवून पेन्शनचा नियम शिथिल केला, जेणेकरून विश्वेश्वरय्या यांना पेन्शन मिळू शकेल. विश्वेश्वरय्या यांचा राजीनामा आणि नोकरी सोडल्याची बातमी देशभरात पसरली होती. त्याचवेळी, हैदराबाद संस्थानकडून एक विशेष निमंत्रक विश्वेश्वरय्या यांना भेटण्यासाठी आला. त्या निमंत्रकाने त्यांना चीफ इंजिनिअर म्हणून त्याच पगारावर नोकरीसाठी नियुक्त करण्याचं पत्र दिलं. हे पत्र मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हैसूर संस्थानातूनही त्यांना एक पत्र मिळाले.

या पत्रात विश्वेश्वरय्या यांना चीफ इंजिनिअर म्हणून म्हैसूरमध्ये रुजू होण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. या दोन मोठ्या संस्थानांमधून आलेल्या प्रतिष्ठित प्रस्तावांमुळे विश्वेश्वरय्या मोठ्या पेचात सापडले होते. त्यांना कोणालाही दुखवायचं नव्हतं, परंतु त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परतण्याची इच्छा होती. त्यांच्या मनात म्हैसूरकडे परतण्याची ओढ होती. मात्र, त्याचवेळी हैदराबादमधील नद्यांच्या पूर समस्या गंभीर होत्या आणि त्या समस्येवर तातडीने उपाययोजना करणं आवश्यक होतं. म्हणूनच, विश्वेश्वरय्या यांनी एक समंजस निर्णय घेतला त्यांनी प्रथम हैदराबादमधील पूर समस्येवर उपाय काढण्याचं ठरवलं आणि त्यानंतर म्हैसूरला जाण्याचा विचार केला.

त्या काळात हैदराबाद शहरातील मूसी आणि ईसी या नद्यांना दरवर्षी येणाऱ्या महापुरांमुळे मोठी हानी होत होती. पुरामध्ये घरं, जनावरं वाहून जात होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी एम. विश्वेश्वरय्या यांनी या नद्यांवर धरणे बांधण्याची योजना आखली, ज्यामुळे महापुरांवर नियंत्रण मिळवता आलं. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर, 1909 साली त्यांनी म्हैसूर संस्थानात (आताचे कर्नाटक) मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारला.

म्हैसूरच्या महाराजांना विश्वेश्वरय्या यांची शिस्तबद्ध कामाची पद्धत खूप आवडली, म्हणून त्यांनी 1912 साली त्यांनी विश्वेश्वरय्या यांना  म्हैसूर संस्थानाचे दिवाण म्हणून नेमले. आपल्या कार्यकाळात विश्वेश्वरय्यांनी उद्योगधंद्यांमध्ये आधुनिक साधनांचा वापर करून सुधारणा घडवून आणल्या. भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स सारख्या मोठ्या कारखान्याची स्थापना केली, तसेच म्हैसूर राज्याच्या नियंत्रणाखाली रेल्वे व्यवस्थापन आणले. बँक ऑफ म्हैसूर सुरू केली आणि पर्यटन क्षेत्रात उत्तम दर्जाची हॉटेल्स उभारली.

त्यांनी कृष्णराजसागर धरणाचे बांधकाम पूर्ण केलं, ज्यामुळे म्हैसूर  राज्याला पुरेशी वीज आणि पाणी उपलब्ध झालं. याशिवाय, त्यांनी वृंदावन उद्यानाची निर्मिती करून राज्याला एक आकर्षक पर्यटनस्थळ दिलं. शिक्षणाची महती ओळखून, त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालये आणि वसतिगृहे उभारली. शेती, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण शिक्षण संस्था सुरू केल्या आणि म्हैसूरसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीने म्हैसूर संस्थानाची सर्वांगीण प्रगती घडून आली. विश्वेश्वरय्या  यांनी  आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे यशाचा कळस गाठला.

पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. विश्वेश्वरय्यांबद्दल म्हणाले होते, “He is an engineer of integrity, character, and broad national outlook.” 1 सप्टेंबर 1961 रोजी त्यांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या वेळी, पंडित नेहरूंनी आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून दिल्लीहून बंगलोरला जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रांवर त्यांच्या स्वतःची पोस्टाची तिकिटे चिकटवण्यात आली होती. 

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे एक महान अभियंता, द्रष्टे आणि विकासाचे प्रणेते होते. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे आणि भारताच्या औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्यांना भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला, परंतु त्यांचं कार्य आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतं. भारत सरकारने त्यांच्या जयंतीदिनी, म्हणजे १५ सप्टेंबरला अभियंता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ज्याद्वारे प्रत्येक अभियंत्याला त्यांच्या कार्याची ओळख पटते. विश्वेश्वरय्या हे शतायुषी होऊन निरामय जीवन जगले. इंग्रज सरकारने त्यांना सर, कैसर-ए-हिंद, के.सी.आय.ई. इत्यादी बहुमानांनी सन्मानित केलं.

आणखी वाचा

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button