व्यवसाय की नोकरी ? – शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी कि व्यवसाय
वयाची १८-२२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी का व्यवसाय करावा हा कोड्यात टाकणारा प्रश्न सर्व तरुणांना पडत असतो. कारण आईवडिलांवर अवलंबून राहण्याचे सोडून स्वतःच्या कर्तृत्त्वाने जगात आपला ठसा उमटवण्याचे हे वय असते. उमेद असते, आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी हवे ते करण्याची तयारी असते. पण आपल्याला काय हवे हे मात्र समजत नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरुन एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर पुढे काय करणार, नोकरी की व्यवसाय? ह्या प्रश्नाला मिळालेली काही उत्तरे.
१. नोकरी करणार कारण घरची परिस्थिती व वातावरण व्यवसायाला अनुकूल नाही. शिवाय भांडवलसुध्दा नाही.
२. काही काळ नोकरी करणार, मग स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरु करणार आहे. काही दिवस नोकरी केली, तर भांडवल उभारणी करता येईल.
३. व्यवसायच करणार आहे काहीतरी. काहीही झाले तरी व्यवसायच करायचा.
आता वरील तीनही प्रकारच्या तरुणांच्या मताचे विश्लेषण करु या. पहिल्या प्रकारात एकतर त्या तरुणाला नोकरीच करायची असते, मात्र व्यवसाय न करण्याची काही कारणे तो पुढे करत असतो. नोकरीची सुरुवातसुध्दा अगदी तुटपुंज्या उत्त्पन्नावर होते. मग पुढे त्या उत्त्पन्नात फार वेगाने वाढ होते असेही काही नाही. असे तरुण जीवनभर Rat Race मध्ये अडकून पडतात. नोकरी, पगार, घर, घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, आरोग्य असे नेहमीचे प्रश्न सोडवतच आयुष्य पुढे सरकत असते. त्यात फार उल्लेखनीय असे काही घडत नाही. पण ह्या चक्रात अडकलेला माणूस सहजी बाहेर पडत नाही. हा निर्णय घेण्याची काही कारणे आहेत त्यामध्ये जोखीम घेण्याचे धाडस नसणे, इच्छाशक्तीचा अभाव व न्यूनगंड ही काही महत्त्वाची कारणे आहेत. ह्यावर थोड्याफार प्रयत्नांनी मात करता येते.
दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तींना काही काळ नोकरी करुन भांडवल उभे करायचे असते. काही प्रमाणात उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावायचा असतो. ह्या व्यक्तींना कमी प्रमाणात जोखीम घ्यायची असते. हेही थोड्याफार फरकाने पहिल्या प्रकारच्या व्यक्तीसारखी सुरुवात करतात. मग पगार, संसाराचे प्रश्न व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे Rat Race मध्ये अडकतात व बाहेर पडायची इच्छा असूनही बाहेर पडत नाहीत व पहिल्या प्रकारच्या व्यक्तीप्रमाणे ह्यांचे पण आयुष्य फिरत राहते. स्वतः पैसे कमावणे हा भांडवल उभे करण्याचा केवळ एकमेव मार्ग नाही. इतर अनेक मार्गांनी भांडवल उभे करता येते. भांडवल निर्मितीचे इतर मार्ग पुढे आपण पाहणार आहोत. भांडवला उभारणीच्या इतर पर्यायांनी जीवनात वेगाने पुढे जाण्याचा मार्ग सापडेल.
तिसऱ्या प्रकारचे तरुण हे काहीसे ठाम पण द्विधा मनस्थितीत असतात. ह्या तरुणांना अधिक खोलात जाऊन प्रश्न विचारले तेव्हा समजले की काहीतरी व्यवसाय करायचा म्हणजे कोणता व्यवसाय करावा? याचा पुसटसा अंदाजही यांनी बाधलेला नसतो. इच्छाशक्ती असते मात्र दिशा घ्यायला वेळ लागतो. सांगणारेही कुणी नसतात. मग स्वतःच्या अंदाजावर पुढे जाण्याचा प्रयत्न चालू होतो. हे तरुण खूप काही करण्याची उमेद ठेवतात. पुढे जाऊन त्यांना हवे ते करुनही दाखवतात.
मी काही जणांना “पाहिजे तेवढे भांडवल देतो, तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात?” असा प्रश्न विचारला की मग त्यांच्याकडे काही उत्तर नसते. भांडवल, मनुष्यबळ, प्रशिक्षण याचा पुरवठा बाहेरुन करता येतो. त्याचे असंख्य मार्गसुध्दा आहेत. मात्र व्यवसाय करण्यासाठी लागणारी वृत्ती स्वतःतच असायला हवी किंवा तिची जोपासना स्वतःहून करायला हवी. मग व्यवसाय यशाच्या शिखरावर नेता येईल.
नोकरी करताना उत्पन्नाच्या, खर्चाच्या मर्यादा पडतात. याउलट व्यवसायामध्ये २४ तास झोकून देऊन काम करता येते. शेकडो माणसांना काम देता येते. ती माणसे तुमच्यासाठी काम करत असतात. सुरुवातीची काही वर्षे संघर्ष केला, की मनाप्रमाणे उत्पन्न व पाहिजे तेवढा वेळ व्यवसायातून प्राप्त करता येतो. उत्पन्नात होणारी वाढ ही बांबूच्या रोपट्याप्रमाणे वेगाने होत असते. मनसोक्त जगण्याचा, स्वतःच्या स्वप्नांसाठी काम करण्याचा आनंद घेत व्यवसाय करणे हे नोकरीपेक्षा सरसच.
भारत हा तरुणांचा देश आहे. जगातील सर्वात जास्त तरुणांचा हा देश म्हणजे प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करुन घेत असतो. पण इथल्या तरुणाईला ह्या गोष्टीची कितपत जाणीव आहे हे जाणून घ्यावे लागेल. ह्या तरुणाईची अवस्था कस्तुरीमृगासारखी आहे. कस्तुरी ही मृगाच्या नाभीत असते. मृग कस्तुरी शोधण्यासाठी सर्व जंगलभर सैरावैरा धावत असतो. पण त्याला स्वतःच्या नाभीत असलेल्या कस्तुरीची जाणीव कधीच होत नाही. आपल्यातल्या अपार शक्तीची जाणीव फार कमी तरुणांना आहे. पुढील लेखामध्ये ही जाणीव प्राप्त करुन घेऊ.
- अमोल चंद्रकांत कदम, नवी अर्थक्रांती