तो काळ होता १९४२ चा, जेव्हा भारतातील पेंट्स इंडस्ट्री मध्ये फक्त काही परदेशी कंपन्या होत्या आणि भारतीय अशी शालिमार पेंट्स होती. त्यावेळी दुसरं महायुद्ध चालू होतं, ज्यामुळे भारताने बाहेरील देशांकडून रंगाची आयात पूर्णपणे थांबवली होती. आणि हीच संधी होती भारतीय रंग उद्योगांना वर येण्याची. ही संधी ओळखून चंपकलाल चोकसी या व्यापाऱ्याने वयाच्या २० व्या वर्षी आपल्या तीन मित्रांच्या साथीने १९४२ साली मुंबईमधील गिरगावात एका गॅरेजमध्ये Asian Paints ची सुरुवात केली. तो काळ असा होता जेव्हा सगळे पेंट उद्योग औद्योगिक पेंट्स विभागावर लक्ष केंद्रित करत होते आणि ही संधी चोकसी यांच्या सारख्या चाणाक्ष माणसाच्या लक्षात आली. भारतामध्ये सजावटीच्या किरकोळ पेंट विभागात वाढण्याची प्रचंड संधी आहे ही संधी चोकसी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीकिरकोळ सजावटीच्या क्षेत्रात शाश्वत असणारी व्यवसायाची वाट निवडली. त्यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावले. त्यांना अशा बाजारात आपले स्थान मिळवायचे होते, जिथे मूठभर व्यापाऱ्यांनी संपूर्ण भारताचा बाजार नियंत्रित केला होता. त्यानंतर त्यांनी मार्केटिंगसाठी बरेच वेगवेगळे प्रयोग केले जे ग्राहकांना आवडू लागले. ज्यामुळे १९५२ मध्ये त्यांनी २३ करोडचा टर्नओव्हर साध्य केला. आणि पुढे १९६७ मध्ये Asian Paints ही भारतातील क्रमांक १ ची पेंट्स उत्पादक कंपनी बनली आणि आपल्या गुणवत्तेमुळे तसेच अचूक हेरलेल्या संधीमुळे आजही Asian Paints आपले पहिले स्थान टिकवून आहे. आज एशियन पेंट्स भारतातील सर्वात मोठी तर आशियातील तिसरी मोठी पेंट कंपनी आहे. कंपनीची उलाढाल २० हजार कोटींपेक्षा जास्त असून ७६०० हून अधिक कर्मचारी कंपनीत काम करतात.