संघर्षातून उभा राहिलेला भारताचा शिक्षणदीपस्तंभ: ‘फिजिक्सवाला’- Physics Wallah

अलख पांडे यांची प्रेरणादायी शैक्षणिक क्रांती
देशातील मोठ्या उद्योगपती, अभिनेते, डॉक्टर किंवा राजकारण्यांच्या संपत्तीबद्दल आपण नेहमी ऐकतो. पण एका सामान्य शिक्षकाने अब्जोंची कंपनी उभी करून देशभरातील विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवला, ही प्रेरणादायी गोष्ट आहे ‘फिजिक्सवाला’चे संस्थापक अलख पांडे यांची. अतिशय साधारण परिस्थितीतून आलेल्या या तरुणाने आपल्या जिद्दीने, सातत्यपूर्ण मेहनतीने आणि अनोख्या शिकवण्याच्या शैलीने लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला. एडटेक क्षेत्रात त्यांचं नाव आज सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं आहे.
कधीकाळी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणारा, कधी वर्गात उभा राहून विद्यार्थ्यांना शिकवणारा, तर कधी यूट्यूबवर मोफत शिकवून विद्यार्थ्यांचा मित्र बनणारा हा मुलगा पुढे एका प्रचंड साम्राज्याचा सहसंस्थापक बनेल, हे कोणालाही वाटलं नव्हतं. त्यांची जिवंत, मजेदार आणि समजण्यास सोपी शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवत गेली आणि हळूहळूच त्यांचा अब्जावधींच्या ‘युनिकॉर्न’ कंपनीपर्यंतचा रोमांचक प्रवास सुरु झाला.
आजच्या लेखात आपण अलख पांडे यांच्या एका साध्या शिक्षकापासून देशातील सर्वात मोठ्या एडटेक युनिकॉर्नपैकी एक घडवणाऱ्या त्यांच्या क्रांतिकारक प्रवासावर एक नजर टाकणार आहोत.
बालपणातील संघर्ष आणि स्वप्नांची उंच भरारी
अलख पांडे यांना लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. पथनाट्ये, शालेय सादरीकरणे,या सगळ्यात भाग घेत त्यांनी कला जगतातील दारं उघडून पाहिली. पण घरची कठीण परिस्थिती त्यांना वेगळ्या मार्गावर घेऊन गेली. आठवीत असतानाच त्यांनी ट्युशन घेण्यास सुरुवात केली. चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारा हा मुलगा पुढे नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांचा विश्वासू शिक्षक आणि मार्गदर्शक बनेल, याची कल्पना कदाचित कोणालाही नव्हती.
घरची आर्थिक अवस्था इतकी कठीण होती की अलख आणि त्यांच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आई-वडिलांना स्वतःचं घरदेखील विकावं लागलं. पण अडचणींनी त्यांची पावलं थांबवली नाहीत,उलट त्यांच्या जिद्दीला आणखी धार मिळाली. दहावीत ९१% आणि बारावीत ९३.५% गुण मिळवत त्यांनी HBTI, कानपूर येथे बी.टेकमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणासाठीचं हे पाऊल पुढे त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे नवी दिशा देणार होतं आणि इथूनच त्यांच्या पुढच्या महत्वाच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली.
एका छोट्या खोलीतून उभा राहिलेला ‘फिजिक्सवाला’
बी.टेक करत असतानाच अलख पांडे यांनी आपल्या क्लासरूममधील शिकवणीचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यांच्या शिकवण्याची शैली पूर्णपणे वेगळी आणि आकर्षक होती,अवघड संकल्पना अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगणं, मजेदार ॲक्शन आणि ऊर्जेनं भरलेलं प्रेझेंटेशन. विद्यार्थ्यांना हवी असलेली तीच पद्धत अलख यांनी दिली, आणि त्यामुळे त्यांचे व्हिडिओ झपाट्याने लोकप्रिय होऊ लागले. थोड्याच काळात व्ह्यूज वाढले, सबस्क्राइबर्सची संख्या उंचावली आणि एक साधा शिक्षक यूट्यूबवरील ‘स्टार टीचर’ म्हणून ओळख मिळवू लागला.
२०१७ मध्ये प्रयागराजमधील एका छोट्याशा खोलीत अत्यंत मर्यादित साधनांनी त्यांनी ‘फिजिक्सवाला’ची पायाभरणी केली. एक बोर्ड, एक कॅमेरा आणि प्रचंड इच्छाशक्ती,इतक्याच गोष्टींवर आधारलेलं हे छोटसं स्वप्न पुढे लाखो विद्यार्थ्यांचा आधार ठरलं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू लागलं.
कोरोना काळात मिळाली अभूतपूर्व लोकप्रियता
तीन वर्षे विनामूल्य व्हिडिओ देणाऱ्या अलख पांडे यांनी करोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून स्वतःचं ॲप सुरू केलं. अत्यंत कमी फी मध्ये त्यांनी JEE आणि NEET ची कोचिंग उपलब्ध करून दिली. महागड्या कोचिंग संस्थांच्या स्पर्धेतही विद्यार्थ्यांसाठीची त्यांची खरी तळमळ, त्यांचं ज्ञान आणि विश्वासार्हता यामुळे ‘फिजिक्सवाला’ वेगाने लोकप्रिय होऊ लागलं. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी या ॲपचा आधार घेत आपल्या शैक्षणिक प्रवासाची वाटचाल सुरू केली.
या काळात अलख सरांचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना केवळ समजण्यास सोपेच नव्हते, तर मजेशीर, उत्साही आणि प्रेरणादायीही वाटू लागले. त्यांच्या शिकवण्याची शैली तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण करू लागली, आणि त्यांचे क्लासेस विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा व आत्मविश्वासाचा स्रोत बनले. कोरोनाकाळात मिळालेल्या या प्रचंड लोकप्रियतेने त्यांच्या कामाला नवा वेग दिला, आणि यानंतर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला प्रत्येक पुढचा पाऊल ठाम, प्रभावी आणि न थांबणारा ठरला.
मोठ्या ऑफर्स नाकारून स्वतःचा मार्ग निवडणारा शिक्षक
लोकप्रियता वाढत असताना अलख पांडे यांच्या कामाची दखल मोठ्या एडटेक कंपन्यांनी घ्यायला सुरुवात केली. अनअकॅडमीने त्यांना तब्बल ४० कोटींचे वार्षिक पॅकेज ऑफर केले होते. इतकंच नाही, तर त्यांच्या ‘फिजिक्सवाला’मधील १०% हिस्सा ७५ कोटींना खरेदी करण्याची मोठी ऑफरही देण्यात आली. कोणत्याही तरुणासाठी ही स्वप्नवत संधी असू शकली असती, पण अलख यांच्या मनात वेगळंच ध्येय होतं.
त्यांच्यासाठी पैसा नव्हता तर विद्यार्थ्यांचं भविष्य, शिक्षणाचा प्रसार आणि त्यांच्या मूल्यांची जपणूक अधिक महत्त्वाची होती. म्हणूनच त्यांनी या दोन्ही आकर्षक ऑफर्स ठामपणे नाकारल्या. स्वतःचा मार्ग, स्वतःची ओळख आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, परवडणारे शिक्षण हेच त्यांचं ध्येय राहिलं. आणि याच निर्णयाने ‘फिजिक्सवाला’ला पुढे एका ऐतिहासिक उंचीवर पोहोचवण्याची ताकद दिली.
भारतातील पहिली ‘डिजिटल-फर्स्ट’ एडटेक युनिकॉर्न कंपनी
२०२० मध्ये ‘फिजिक्सवाला’ची कंपनी नोंदणीकृत झाली आणि त्याचा प्रगतीचा वेग झपाट्याने वाढू लागला. IIT BHU पदवीधर आणि अलख पांडे यांचे सहकारी प्रतीक माहेश्वरी व्यवस्थापन सांभाळू लागले, तर अलख पांडे पूर्णपणे शिक्षणात गुंतले. आज फिजिक्सवालाकडे ५००+ शिक्षक, १००+ टेक एक्स्पर्ट्स, १०९ शहरांतील १९८ सेंटर्स, ९९ मिलियन यूट्यूब सबस्क्राइबर्स आणि २,८८७ कोटींचे वार्षिक उत्पन्न आहे. या मेहनतीमुळे फिजिक्सवाला आज १.१ बिलियन डॉलर नेटवर्थ असलेली युनिकॉर्न कंपनी बनली आणि भारतीय एडटेक क्षेत्रात ही एक ऐतिहासिक पायरी ठरली आहे.
फिजिक्सवाला IPO ही भारतीय एडटेकसाठी एक ऐतिहासिक क्षण मानली जाते. पहिली ‘डिजिटल-फर्स्ट’ एडटेक कंपनी म्हणून IPO घेणे म्हणजे शिक्षकांपासून स्टार्टअप्सपर्यंत सर्वांसाठी प्रेरणेची नवी दारे उघडण्यासारखं आहे. फिजिक्सवालाने सिद्ध केले की लहान शहरांतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळू शकते, शिक्षकांनाही मान, सन्मान आणि योग्य कमाई मिळू शकते, आणि भारत जागतिक स्तरावर एडटेक क्रांतीचे नेतृत्व करू शकतो.
मित्रांनो, अलख पांडे यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, स्वप्नं आणि कठोर परिश्रमांनी विणलेलं एक प्रेरणादायी गीत आहे, जिथे एका मुलाने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आशेचा उजेड दिला. आज ते केवळ एक शिक्षक नाहीत, तर भारताच्या नव्या शिक्षणयुगाचे दीपस्तंभ बनले आहेत. त्यांची कहाणी हे सांगते की शिक्षणाच्या पायावर उभं राहिलेलं स्वप्न कधीही अपयशी ठरत नाही, आणि जिद्द, सातत्य आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे कोणतीही मर्यादा पार करता येते.
आणखीन वाचा:
- मुंबईची झोपडपट्टी ते दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
- ५,००० रुपये उसने घेऊन उभारली १७,००० कोटींची कंपनी: पी. रामचंद्रन यांचा संघर्ष आणि “उजाला” साम्राज्य.
- इडली विक्रेता ते पंचतारांकित हॉटेलांचा मालक- विठ्ठल कामत




