उद्योजकतादिनविशेषबिझनेस महारथी

“रंकाचा राजा’’ संघर्षातून उभारले यशस्वी साम्राज्य, लॅरी एलिसन यांचा प्रेरणादायी प्रवास 

आज आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांच्यावर “रंकाचा राजा” ही म्हण तंतोतंत लागू होते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील अनेक आव्हानांवर मात करून यश मिळवले आहे. ती व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे प्रख्यात उद्योजक आणि ओरॅकल कॉर्पोरेशनचे संस्थापक, “लॅरी एलिसन”.

लॅरी एलीसन आणि देव यांच्यात काय फरक आहे, यावर एक विनोदी प्रश्न विचारला जातो. उत्तर असं दिलं जातं की, “देवाला आपण लॅरी एलीसन आहोत असं वाटत नाही.” यावरूनच लॅरी एलीसन किती महत्वाकांक्षी व्यक्ती आहेत, याची कल्पना येते.लॅरी एलीसन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी नाव आहे. त्यांनी माहिती साठवणाऱ्या म्हणजेच डेटाबेस क्षेत्रात असा काही क्रांतिकारक बदल घडवला की, मायक्रोसॉफ्ट, आयबीएमसारख्या बलाढ्य कंपन्यांनाही त्यांची धडकी भरली होती. त्यांच्या नेतृत्वात, Oracle ने डेटाबेस व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती केली. हे तंत्रज्ञान व्यवसायांच्या आणि उद्योगांच्या केंद्रस्थानी आलं, ज्यामुळे जगभरातील डेटा व्यवस्थापनाचा चेहरामोहरा बदलला.

आज त्यांचा जन्मदिन… चला तर, त्यांचा आजवरचा जीवनप्रवास पाहूया. 

बालपण आणि प्रारंभिक जीवन 

लॅरी एलिसन यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. त्यांचे बालपण आणि प्रारंभिक जीवन संघर्षमयी होते. फ्लॉरेन्स स्पेलमन ही त्यांची १९ वर्षे वयाची आई अविवाहित होती. त्यांच्या जन्मानंतर काही दिवसातच त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाला सोडून दिले. लॅरी नऊ महिन्यांचे असताना त्यांना न्यूमोनिया झाला असताना आपल्याला आपल्या मुलाचा नीट सांभाळ करायला जमणार नाही असं वाटल्यामुळे त्यांच्या आईनं एलिसनला शिकागोमधल्या आपल्या लिलियन नावाच्या आत्याकडे सांभाळायला द्यायचं ठरवलं. लिलियन आणि लुईस एलिसन या नवरा-बायकोनं मग एलिसन नऊ महिन्यांचा असताना त्याला दत्तक घेतलं. त्याच्या नव्या आईने त्यांचं चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. त्यांनंतर त्यांची खरी आई त्यांना कधीच भेटली नाही. ती त्यांना जेव्हा ते ४८ वर्षाचे झाले आणि जगात त्यांचे बर्‍यापैकी नाव झाले होते तेव्हाच भेटली. अगदी हिंदी सिनेमांत दाखवतात तशी स्टोरी आहे ही…

लॅरींनी 1962 मध्ये अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात शिक्षणाला सुरुवात केली. मात्र, 1964 मध्ये त्यांच्या सावत्र आई म्हणजेच लिलियन याचं निधन झालं, आईच्या निधनानंतर लॅरी खूपच दुःखी झाले आणि त्यांनी  शिक्षण अर्धवट सोडले. लिलियनशी त्याचं  नातं खूप जिव्हाळ्याचं झालं होतं, परंतु लुई म्हणजेच त्यांचे सावत्र वडील यांच्यासोबत त्यांचे संबंध तणावपूर्ण होते. लुई त्यांना वारंवार म्हणत की, तू आयुष्यात कधीच काही साध्य करू शकणार नाही. त्यांच्या सावत्र वडिलांच्या अशा वागणुकीमुळे लॅरींचा स्वभाव हा लहानपनासुनच जिद्दी बनला आणि आता वडिलांना खोटं ठरवून काहीतरी करून दाखवायचा चंग त्यांनी लहापणापासूनच बांधला.

कठीण परिस्थितीतही लॅरीने धैर्य आणि जिद्द दाखवून पुढे प्रचंड यश मिळवले,  ते म्हणतात ना परिस्थिती कितीही कठीण असली, तरीही स्वप्नांवर विश्वास ठेवणं महत्वाचं असतं. लॅरीनेही हार मानली नाही. 1966 मध्ये शिकागो विद्यापीठात थोडा काळ शिकून त्यांनी आपल्या इच्छाशक्तीने पुढे पाऊल टाकलं. 

सुरुवातीचा संघर्ष 

1960 च्या दशकात संगणकाच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत होती. संगणकाविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती, आणि अनेक कंपन्यांना त्यांच्या कामांना सुलभ बनवण्यासाठी कुशल प्रोग्रामर्सची आवश्यकता होती. लॅरी यांनी शाळेत प्रोग्रामिंगचे धडे घेतले होते आणि त्यांच्या या आवडीमुळे त्यांनी त्या काळात १९६६ मध्ये, वयाच्या अवघ्या  २२ व्या वर्षी पहिला संगणक डिझाईन केला. त्या काळात संगणक आणि तंत्रज्ञान हे नवीन क्षेत्र होते, पण लॅरींनी याच क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचे ठरवले. कॅलिफोर्नियामध्ये येऊन त्यांनी संगणक डिझाईनशी संबंधित छोटे-मोठे काम करून आपले पोट भरायला सुरुवात केली. 

1973 मध्ये ॲम्पेक्स या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करायला सुरुवात केली, त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना तेथे नवीन सहकारी एड ओट्स आणि बॉब मायनर भेटले, त्यांच्या सोबतचा त्यांचा अनुभव कमालीचा राहिला,  नवी शिकवण घेतली आणि अनुभव मिळवला. मात्र, त्यांच्या यशाची भूक थांबली नाही. 1976 मध्ये त्यांनी ॲम्पेक्स सोडून प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्समध्ये काम करण्याचा निर्णय  घेतला आणि उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत, कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाचे नेतृत्व केले.

व्यवसायाची सुरुवात (Oracle ची मुहूर्तमेढ)

1977 मध्ये, एलिसन यांनी आपले सहकारी  मायनर आणि ओट्ससोबत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) ची स्थापना केली, जी सुरुवातीला इतर कंपन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रामिंग करण्यासाठी तयार करण्यात आली होती. मात्र, एलिसन यांना SDL द्वारे काहीतरी मोठं आणि क्रांतिकारक करायचं होतं. त्यांना ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ एडगर एफ. कॉड यांनी मांडलेल्या रिलेशनल डेटाबेस मॉडेलने खूप प्रेरणा दिली. या मॉडेलने मोठ्या प्रमाणात डेटाचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि जलद रिकव्हरी करण्याचे मार्ग दाखवले. एलिसन, मायनर आणि ओट्स यांनी या क्षेत्रात मोठ्या व्यावसायिक संधी ओळखल्या आणि त्यांनी डेटाबेस विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले

त्यांच्या या प्रयत्नांना अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएकडून (Central Intelligence Agency) करार मिळाला आणि त्यांनी व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम विकसित करण्यास सुरुवात केली. अखेर 1979 मध्ये, रिलेशनल सॉफ्टवेअर इंक. (आता Oracle) ने स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज (SQL) वापरणारा पहिला व्यावसायिक रिलेशनल डेटाबेस प्रोग्राम लॉन्च केला. या अभिनव डेटाबेस प्रोग्रामने त्याकाळात लोकप्रियता मिळवली आणि उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला.

संकटांवर मात

1982 मध्ये नाव बदलून ओरॅकल सिस्टिम कॉर्पोरेशन (नंतर ओरॅकल कॉर्पोरेशन) ठेवलेली कंपनी आपल्या नाविन्यपूर्ण आणि आक्रमक मार्केटिंगसाठी ओळखली गेली. 1980 च्या दशकात कंपनीची झपाट्याने वाढ झाली, आणि 1986 मध्ये कंपनीने सार्वजनिक होऊन यश मिळवलं. 1987 पर्यंत, ओरॅकल जगातील सर्वात मोठी डेटाबेस-व्यवस्थापन कंपनी म्हणून समोर आली. मात्र, 1990 मध्ये भागधारकाच्या खटल्यामुळे झालेल्या अंतर्गत ऑडिटमध्ये असं लक्षात आलं की कंपनीने आपल्या कमाईचा चुकीचा अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे स्टॉक बाजारात (share market) मोठी घसरण झाली. ओरॅकलच्या शेअरचा भाव जवळपास ८० टक्क्याहून पडला. 

संकटातून मार्ग काढण्यासाठी, लॅरी एलिसनने कंपनीच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना केली आणि 1992 च्या अखेरीस ओरॅकल पुन्हा आर्थिक स्थिरतेत आली. 1990 च्या दशकाच्या मध्यात, एलिसनला नेटवर्क कॉम्प्युटर (NC) नावाचा डेस्कटॉप पीसीचा स्वस्त पर्याय विकसित करून मायक्रोसॉफ्टशी स्पर्धा करण्याची संधी मिळाली. NC ही कल्पना पुढे क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सुरुवातीची चाचणी होती. परंतु, PC च्या सतत कमी होणाऱ्या किमती आणि NC च्या विकासातील विलंब यामुळे मायक्रोसॉफ्टने बाजारात वर्चस्व गाजवलं. 

त्यांची ही गोष्ट दाखवते की अपयश ही यशाच्या प्रवासात एक पायरी असते. प्रत्येक आव्हानातून शिकून, नव्या उमेदीने पुढे जाणं हेच खऱ्या उद्योजकाचं वैशिष्ट्य असतं. एलिसनची दूरदृष्टी, त्यांची  चिकाटी आणि त्यांच्या चुका स्वीकारण्याची तयारी हेच त्यांच्या  यशाचं गमक ठरलं.

यशाच्या शिखरावर

लॅरी एलिसनने इंटरनेटच्या प्रारंभिक काळात ओरॅकलला यशाच्या शिखरावर नेले. वर्ल्ड वाइड वेब (www) तंत्रज्ञानाशी सुसंगत उत्पादने विकसित करण्यावर भर देऊन, त्यांनी कंपनीची वाढ सुनिश्चित केली. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला, एलिसनने प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्या खरेदी करण्याचे आक्रमक धोरण अवलंबले, ज्यामुळे ओरॅकलची ताकद अधिकच वाढली.

पीपलसॉफ्ट (2005), सिबेल (2006), BEA (2008), आणि सन मायक्रोसिस्टम्स (2010) या मोठ्या कंपन्यासह अनेक कंपन्या ओरॅकलमध्ये विलीन झाल्या आणि आज  त्यांच्या दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयांमुळे ओरॅकल जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी बनली आहे.

एलिसन हे सिलिकॉन व्हॅलीतील सर्वात विशेष आणि  वेगळ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते, त्यांचे  उत्तुंग यश जगभरात कौतुकास पात्र ठरले. त्यांच्या व्यवसायातील धाडसी निर्णयांमुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे त्यांचे नाव आज अग्रगण्य उद्योजकांमध्ये गणले जाते. 2010 मध्ये प्रतिष्ठित अमेरिका चषक जिंकणारा संघ उभारून त्यांनी आपले नेतृत्व कौशल्य दाखवले. 2012 मध्ये, त्यांनी हवाईयन बेट लनाईचे 98 टक्के भाग विकत घेऊन, आपले भव्य स्वप्न साकार केले. त्या काळात त्यांची  वैयक्तिक संपत्ती सुमारे $40 अब्ज होती, ज्यामुळे ते  जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. सप्टेंबर 2014 मध्ये, एलिसनने Oracle चे CEO पद सोडले, परंतु कंपनीच्या प्रगतीसाठी कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) म्हणून योगदान देत राहिले . 

मित्रांनो, लॅरी एलिसन यांची जीवनकथा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अत्यंत गरिबीतून संघर्ष करत त्यांनी जगातील एक मोठं असणारं साम्राज्य उभं केलं. ‘अम्पॅक्स कॉर्पोरेशन’मध्ये काम करत असताना त्यांना ‘ओरॅकल’ची फक्त कल्पना सुचली होती आणि याच कल्पनेवर त्यांनी मेहनतीने कार्य केलं. आज ‘ओरॅकल’मध्ये १,२२,००० हून अधिक कर्मचारी काम करत असून कंपनीची एकूण संपत्ती ९१ बिलियन डॉलर्स आहे.

लॅरी एलिसन यांची संपत्ती सुमारे ५६ बिलियन डॉलर्स एवढी असून त्यांनी आपला प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू केला होता. त्यांच्या या यशस्वी प्रवासामध्ये त्यांनी अनेक आव्हानं पार केली. 

जगातील सर्वाधिक डेटा साठवणारी कंपनी उभारणारे आणि प्रचंड संपत्तीचे मालक लॅरी एलिसन हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. परंतु, एवढी मोठी कंपनी उभी करणारे आणि अफाट संपत्ती कमावणारे लॅरी एलिसन यांचा जीवनप्रवास अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. लहानपणी सोडून दिल्या गेलेल्या या मुलाने स्टीव्ह जॉब्स आणि बिल गेट्स यांच्या बरोबरीने यश मिळवले. त्यांचा प्रवास हा आपल्यासारख्या लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ते प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देतो.

आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत यापेक्षा आपला दृष्टिकोन आणि मेहनत कशी आहे, हेच आपल्या यशाचं खरं कारण असतं, हे लॅरी एलिसन यांच्या जीवनातून शिकायला मिळतं. जर तुम्हाला काहीतरी नवीन वेगळे अविश्‍वसनीय करायचे असेल, तर त्याची तयारी आता आणि लगेच करा असं लॅरी नेहमी सांगत असतात, त्यांच्या या प्रवासातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करावा, कारण शेवटी  यश मिळवण्यासाठी चिकाटी आणि प्रयत्न यांचीच गरज असते.

आणखीन वाचा:

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button